पंतप्रधान कार्यालय

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त पंतप्रधानांचा संदेश


छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरंदरे यांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी आपण सर्वजण त्यांचे सदैव ऋणी  राहू : पंतप्रधान

शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य ’ हे मागास आणि वंचितांना न्याय देण्याचे तसेच  जुलूमशाहीच्या विरोधात लढ्याचे  एक अतुलनीय उदाहरण : पंतप्रधान 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, मी युवा इतिहासकारांना आवाहन करतो की, जेव्हा ते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास लिहितील तेव्हा त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंसारखीच गुणवत्ता कायम ठेवावी  : पंतप्रधान

Posted On: 13 AUG 2021 8:57PM by PIB Mumbai

 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेजी यांनी त्यांच्या आयुष्याच्या 100 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केले आहे. बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त आयोजित समारंभात बोलताना पंतप्रधान म्हणाले की,  बाबासाहेब पुरंदरे यांचे जीवन हे आपल्या ऋषीमूनींनी स्पष्ट केलेल्या सक्रिय आणि मानसिकदृष्ट्या दक्ष जीवनाचे  उदाहरण आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात त्यांचे शंभराव्या वर्षात पदार्पण हा आनंददायी  योगायोग असल्याचे त्यांनी नमूद केले.

बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या इतिहासात अमर झालेल्या व्यक्तींचा इतिहास लिहून दिलेले योगदान पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पंतप्रधान म्हणाले की, ''शिवाजी महाराजांचे जीवन आणि इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी आपण सर्वजण त्यांचे सदैव ऋणी राहू'' .श्री पुरंदरे यांना 2019 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे, तत्कालीन महाराष्ट्र शासनाने  2015 मध्ये त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव केला होता.मध्य प्रदेश सरकारने त्यांना कालिदास पुरस्कार देऊन मानवंदना दिली.

शिवाजी महाराजांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वावर भरभरून बोलताना पंतप्रधान  म्हणाले की, शिवाजी महाराज हे केवळ भारतीय इतिहासामधील एक मोठी व्यक्तीच  नाही तर  त्यांचा सध्याच्या भारतीय भूगोलावरही प्रभाव आहे. जर शिवाजी महाराज नसते तर आपली काय अवस्था झाली असती हा आपल्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळासमोरील  मोठा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय भारताचे स्वरूप, भारताचे  वैभव याची कल्पना करणे अशक्य आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात  काळात जे कार्य केले, तेच कार्य त्यांच्यानंतर त्यांच्यावर लिहिलेल्या गाथा , प्रेरणा आणि कथांनी केले आहे.  त्यांचे ‘हिंदवी स्वराज्य ’ हे मागास आणि वंचितांना न्याय देण्याचे आणि जुलूमाविरोधातील लढ्याचे  अतुलनीय उदाहरण आहे. वीर शिवाजींचे व्यवस्थापन, नौदल शक्तीचा वापर, त्यांचे जल व्यवस्थापन अजूनही अनुकरणीय  आहे, असे श्री मोदी म्हणाले.

बाबासाहेब पुरंदरे यांची शिवाजी महाराजांबद्दल असलेली अतूट भक्ती, त्यांच्या कार्यातून प्रतिबिंबित होते. त्यांचे कार्य  शिवाजी महाराजांना  आपल्या हृदयात साक्षात जिवंत करते ,असे पंतप्रधान म्हणाले. बाबासाहेबांच्या कार्यक्रमांना वैयक्तिकरित्या उपस्थित राहिलेल्या आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला. आणि तरुणांपर्यंत संपूर्ण वैभवशाली आणि प्रेरणादायी इतिहास पोहोचवण्याच्या पुरंदरे यांच्या उत्साहाची प्रशंसा केली. पंतप्रधान म्हणाले की, इतिहास त्याच्या खऱ्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवावा याकडे त्यांनी कायमच लक्ष दिले. देशाच्या इतिहासासाठी हे संतुलन आवश्यक आहे, त्यांची श्रद्धा आणि त्यांच्यातील साहित्यिकाने कधीही त्यांच्या इतिहासाच्या जाणिवांवर  परिणाम होऊ दिला नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मी युवा इतिहासकारांना आवाहन करतो की, जेव्हा ते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास लिहितील तेव्हा त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंसारखीच गुणवत्ता कायम ठेवावी , असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी गोवा मुक्ती संग्रामपासून ते दादरा  नगर हवेली स्वातंत्र्य संग्रामातील बाबासाहेब पुरंदरे यांच्या योगदानाचे स्मरण केले.

 

***

M.Chopade/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1745614) Visitor Counter : 383