पंतप्रधान कार्यालय

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या उत्तर प्रदेशातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद

Posted On: 05 AUG 2021 6:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2021

नमस्कार,

आज आपल्या सर्वांशी संवाद साधून खूप समाधान वाटले.समाधान याचे की दिल्लीहून धान्याचा जो एकेक दाणा पाठवला होता, तो प्रत्येक लाभार्थ्याच्या ताटात पोचतो आहे. समाधान याचेही, की आधीच्या सरकारांच्या काळात, उत्तरप्रदेशात गरिबांच्या अन्नाची जी लूट होत होती, त्यासाठी आता कुठलाही मार्ग उरलेला नाही. उत्तरप्रदेशात आता ज्या प्रकारे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची अंमलबजावणी केली जात आहे, ती नव्या उत्तरप्रदेशाची ओळख आणखी भक्कम करत आहे. मला तुमच्याशी बोलतांना खूप आनंदही होत होता. ज्या हिमतीने आपण सगळे बोलत होतात, ज्या विश्वासाने बोलत होता, त्यामुळे फार चांगले वाटले. तसेच, आपल्या प्रत्येक शब्दातून सच्चेपणा जाणवत होता. त्यामुळेही मला खूप समाधान मिळाले. आपल्या सर्वांसाठी काम करण्याचा माझा उत्साह आज आणखी दुणावला आहे. चला, आपण अशा गप्पा कितीही वेळ मारू शकतो, पण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूया.

आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आहेत आणि कर्मयोगीही आहेत. असे आमचे योगी आदित्यनाथजी, उत्तरप्रदेश सरकारमधले आमचे सर्व मंत्रीगण, संसदेतील माझे सहकारी, सर्व खासदार-आमदार, महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने उत्तरप्रदेशाच्या कानाकोपऱ्यातून इथे एकत्र जमलेले माझे बंधू आणि भगिनी...

 ऑगस्टचा हा महिना भारताच्या इतिहासात, अगदी सुरुवातीपासून नवनव्या कामगिरीची, यशाची भर घालतो आहे. असे वाटते आहे, की भारताच्या विजयाची सुरुवात झाली आहे. त्यातही आजची ही पाच ऑगस्ट आणखी विशेष ठरली आहे. खूप महत्वाची ठरली आहे. इतिहासात या तारखेची नोंद अनेक दशके केली जाणार आहे. पाच ऑगस्टलाच, दोन वर्षांपूर्वी भारताने एक भारत, श्रेष्ठ भारत ही भावना अधिक सशक्त केली होती. सुमारे सात दशकांनंतर दोन वर्षांपूर्वी पाच ऑगस्टलाच, कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक अधिकार आणि प्रत्येक सुविधेचा पूर्ण हक्क प्रदान करण्यात आला होता. याच पाच ऑगस्टला गेल्या वर्षी कोट्यवधी भारतीयांनी शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, भव्य राम मंदिराच्या दिशेने पहिले पाऊल टाकले होते. आज अयोध्येत अत्यंत वेगाने राममंदिराची उभारणी होत आहे. आणि आज पाच ऑगस्ट ही तारीख आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा उत्साह आणि आनंद घेऊन आली आहे. आजच, ऑलिंपिकच्या मैदानावर, देशाच्या युवा हॉकी संघाने, आपले गतवैभव पुन्हा एकदा मिळवण्याच्या दिशेने एक मोठी झेप घेतली आहे. जवळपास चार दशकांनी हा सुवर्णक्षण आपण अनुभवतो आहोत. जो हॉकी खेळ कधीकाळी आपल्या देशाची ओळख होता, आज त्या खेळातील गौरव, वैभव पुन्हा मिळवण्यासाठी एक मोठी भेट आपल्या युवकांनी आपल्याला दिली आहे. आणि आज हाही एक योगायोग आहे, की आजच उत्तरप्रदेशातील 15 कोटी लोकांसाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन झाले आहे. गरीब कुटुंबातील माझ्या बंधू-भगिनींना, 80 कोटींपेक्षा जास्त लोकांना अन्नधान्य तर जवळपास एका वर्षांपासून मोफत मिळत आहे. मात्र विशेष म्हणजे या कार्यक्रमात सहभागी होत, आपल्या सर्वांचे दर्शन करण्याची संधी मला आज मिळाली आहे

 बंधू आणि भगिनींनो,

एकीकडे आपला देश, आपल्या देशातील तरुण, भारतासाठी नव्या सिद्धी मिळवत आहेत, विजयाचे गोल वर गोल मारत आहे, त्याचवेळी देशात काही लोक असे आहेत, जे राजकीय स्वार्थासाठी अशा गोष्टी करत आहेत, ज्यांच्याकडे पाहून वाटतय, ते जणू ‘सेल्फ गोल’ करण्यातच गुंतले आहेत. देशाला काय हवे आहे, देश काय मिळवतो आहे, देशात परिवर्तन कसे घडते आहे, या सगळ्याशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. हे लोक केवळ आपल्या स्वार्थासाठी देशाचा बहुमूल्य वेळ, देशाची भावना, दोन्हीचे नुकसान करत आहेत. आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे लोक भारताच्या संसदेचा, लोकभावनांची अभिव्यक्ति असलेल्या पवित्र स्थळांचा सातत्याने अपमान करत आहेत. आज संपूर्ण देश, मानवतेवर आलेल्या सर्वात मोठ्या, 100 वर्षात पहिल्यांदाच आलेल्या संकटातून बाहर पडण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे, प्रत्येक नागरिक त्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहेत. आणि हे लोक मात्र, देशहिताची कामे कशी अडवता येतील, याचीच जणू स्पर्धा करत आहेत.

मात्र मित्रांनो, हा महान देश, आणि इथली महान जनता अशा स्वार्थी आणि देशहितविरोधी राजकरणासाठी  ओलीस राहू शकत नाही, राहणार नाही. या लोकांनी देशाचा विकास रोखण्याचा, कितीही प्रयत्न केला, तरीही आता हा देश थांबणार नाही. ते संसदेचे कामकाज थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र 130 कोटी जनता, देश पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येक संकटाला आव्हान देत, देश प्रत्येक आघाडीवर वेगाने वाटचाल करतो आहे. फक्त गेल्या काही आठवड्यातले आपले विक्रम बघा, आणि बघा, जेव्हा देश नवनवे विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी काही लोक संसदेचे कामकाज थांबवण्याचा प्रयत्न करत होते. गेल्या काही आठवड्यातले आपले विक्रम बघितले तर  भारताचे सामर्थ्य आणि यश चारीबाजूंनी झळकताना आपल्याला दिसतील. ऑलिंपिक मध्ये भारताचे अभूतपूर्ण प्रदर्शन संपूर्ण देश उत्साहाने बघतो आहे. भारत लसीकरणाच्या बाबतीतही 50 कोटींचा टप्पा लवकरच पूर्ण करण्याच्या जवळ आहे. बघता बघता आपण हा टप्पा देखील पार करु. या कोरोंना काळात देखील भारतीय उद्योग नवनवी शिखरे पादाक्रांत करतो आहे. जुलै महिन्यात जीएसटी संकलन असो किंवा मग आपली निर्यात असो, आपण नव्या उंचीवर पोहोचतो आहोत. जुलै महिन्यात एक लाख 16 हजार कोटी रुपये जीएसटी संकलन झाले, ज्यावरून,अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावर येत असल्याचेच सिद्ध होत आहे. दुसरीकडे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एक महिन्यात भारताची निर्यात अडीच लाख कोटींपेक्षा अधिक झाली आहे.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हा आकडा अडीच लाख कोटींच्यापुढे या महिन्यात गेला आहे. कृषी निर्यातीमध्ये आपण दशकांनंतर दुनियेतल्या अव्वल 10 देशांमध्ये स्थान मिळवले आहे. भारताला कृषी प्रधान देश असे म्हटले जाते. भारताचा गौरव, देशाची पहिली ‘मेड इन इंडिया’ विमानवाहक युद्धनौका विक्रांतने आपली सागरी चाचणी सुरू केली आहे. प्रत्येक आव्हानाला तोंड देत भारताने लडाखमध्ये जगातल्या  सर्वात उंच ‘मोटरेबल’ रस्त्याचे निर्माण कार्य पूर्ण केले आहे. अलिकडेच भारताने ई-रूपीचा प्रारंभ केला आहे. या ई-रूपीमुळे नजीकच्या भविष्यात डिजिटल भारत अभियानाला बळकटी मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या उद्दिष्टाने कल्याणकारी योजना सुरू केल्या जातात तो हेतू पूर्ण करण्यासाठी अगदी परिपूर्ण मदत होऊ शकणार आहे.

मित्रांनो,

जे लोक फक्त आपल्या पदासाठी त्रासले आहेत, ते आता भारताला रोखू शकत नाहीत. नवीन भारत, पद नाही तर पदक जिंकून संपूर्ण दुनियेवर छाप टाकत आहेत. नवीन भारतामध्ये पुढे जाण्याचा मार्ग परिवारामुळे नाही तर परिश्रमाने तयार होतो. आणि म्हणूनच, आज भारताचा युवक म्हणतोय - भारत पुढे वाटचाल करतोय, भारताचा युवक पुढची वाटचाल करतोय.

मित्रांनो,

या साखळीमध्ये योगी जी आणि त्यांच्या सरकारने आज हा जो कार्यक्रम ठेवला आहे, त्याला आणखीनच जास्त महत्व आहे. या कठीण काळामध्ये, घरामध्ये अन्नधान्य पोहोचू शकले नाही, असे एकाही गरीबाचे घर असता कामा नये. सर्व गरीबांच्या घरामध्ये अन्नधान्य पोहोचणे सुनिश्चित करणे अतिशय गरजेचे आहे.

मित्रांनो,

शंभर वर्षामध्ये अशा प्रकारचे महामारीचे प्रचंड संकट आलेले नाही. या महामारीने अनेक देशांना आणि दुनियेतल्या अब्जावधी लोकांना, संपूर्ण मानवजातीलाच विविध आघाड्यांवर आपल्या जणू कब्जामध्ये घेतले आहे. आणि ही महामारी आता सर्वात मोठी, त्रासदायक आव्हाने निर्माण करीत आहे. भूतकाळामध्ये आपण अनुभव घेतला आहे की, ज्यावेळी देशाला सर्वात आधी या प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागत होता, त्यावेळी देशाची संपूर्ण व्यवस्थाच अतिशय वाईट प्रकारे डळमळून जात होती. सगळी व्यवस्थाच बिघडून जात होती. लोकांचा विश्वासही डळमळीत होत होता. परंतु आज भारत, भारताचा प्रत्येक नागरिक संपूर्ण ताकदीनिशी या महामारीचा सामाना करीत आहे. वैद्यकीय सेवांशी संबंधित पायाभूत सुविधा असो, दुनियेतली सर्वात मोठी मोफत लसीकरणाची मोहीम असो, अथवा भारतवासियांना भूकबळीपासून वाचविण्यासाठी सुरू केलेले सर्वात मोठे अभियान असो, लाखो, कोट्यवधी रूपयांचे हे कार्यक्रम आज भारतात यशस्वीपणे राबविले जात आहेत आणि भारत पुढची मार्गक्रमणा करीत आहे. महामारीच्या या संकटामध्ये, भारताने मोठ्या संख्येने रोजगार निर्माण करणारे लोक आणि मोठ-मोठे पायाभूत सुविधा देणारे महाप्रकल्पांचे कामही थांबवले नाही. उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेशातल्या लोकांनी देशाचे सामर्थ्‍य  वाढविण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम केले, याचा मला आनंद होत आहे. उत्तर प्रदेशात सुरू असलेले महामार्गांचे काम, द्रूतगती मार्गांचे काम आणि मालवाहू समर्पित मार्गिका आणि संरक्षण मार्गिका यासारख्या प्रकल्पांची कामे ज्या वेगाने पुढे नेली जात आहे, ते पाहिले म्हणजे लक्षात येते,  लोकांनी अवघड काळातही केलेल्या कामाचे ते  जीवंत उदाहरण आहे.

मित्रांनो,

इतकी संकटे आली असताना आज अन्नधान्यापासून ते इतर खाद्यसामुग्रीच्या किंमतींमुळे संपूर्ण जगामध्ये गोंधळ माजला आहे. अशा काळात आपल्याला माहिती आहे, अगदी कमी प्रमाणात जरी पूर आला तरी, दूध आणि भाजीपाला यांचे भाव कितीतरी वाढतात. थोडीफार गैरसोय झाली तर महागाई किती वाढते. आपल्यासमोरी खूप मोठी आव्हाने आहेत. परंतु मी आपल्या गरीब मध्यम वर्गातल्या बंधू-भगिनींना विश्वास देवू इच्छितो. महागाई पूर्ण नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. अर्थात हे कामही तुम्ही सर्वांनी सहकार्य केले तर सहजपणे होऊ शकणार आहे. कोरोनाकाळामध्येही शेती आणि शेतीसंबंधित कामे थांबवली गेली नव्हती. संपूर्ण दक्षता घेऊन कृषी कार्ये करण्यात आली होती. शेतकरी बांधवांना बियाणांपासून ते खतापर्यंत आणि त्यानंतर आलेल्या पिकाची  विक्री करण्यात कोणतीही अडचण येवू नये, यासाठी योग्य त्याप्रकारे सर्व नियोजन, व्यवस्था करण्यात आली होती. त्याचा परिणाम असा झाला की, आपल्या शेतकरी बांधवांनी विक्रमी उत्पादन घेतले आणि सरकारनेही एमएसपीने अन्नधान्य खरेदी करण्याचे नवीन विक्रम स्थापित केले. आणि आपल्या योगीजींच्या सरकारने तर गेल्या चार वर्षांमध्ये एमएसपीने धान्य खरेदी करण्यामध्ये दरवर्षी नवनवीन विक्रम स्थापन केला आहे. उत्तर प्रदेशामध्ये यावर्षी गहू आणि धान खरीदेमध्ये गेल्यावर्षीच्या तुलने जवळपास दुप्पट संख्येने शेतकरी बांधवांना एमएसपीचा लाभ मिळाला आहे. उत्तर प्रदेशात 13 लाखांपेक्षा जास्त शेतकरी परिवारांना त्यांच्या उत्पादित मालासाठी जवळपास 24 हजार कोटी रूपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरीत करण्यात आले आहेत.

मित्रांनो,

केंद्र आणि उत्तर प्रदेश राज्य सरकार, असे डबल इंजिन असल्यामुळे सामान्य जनतेला  सुविधा देऊन त्यांच्या सशक्तीकरणासाठी निरंतर प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोना काळ असतानाही गरीबांना सुविधा देण्याचे अभियान काही मंदावले नाही. उत्तर प्रदेशमध्ये आत्तापर्यंत 17 लाखांपेक्षा अधिक ग्रामीण आणि शहरी गरीब परिवारांना स्वतःचे पक्के घरकुल मंजूर झाले आहे. लाखो गरीब परिवारांच्या घरांमध्येच शौचालयाची सुविधा दिली गेली आहे. जवळपास अडीच कोटी गरीब परिवारांना उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस जोडणी आणि लाखो कुटुंबाना विजेची जोडणी दिली आहे. प्रत्येक घराला नळाव्दारे पाणी पोहोचवण्याच्या मोहीमेचे कामही उत्तर प्रदेशात वेगाने केले जात आहे. गेल्या दोन वर्षांच्या आत उत्तर प्रदेशातल्या 27 लाख ग्रामीण कुटुंबांपर्यंत नळाव्दारे पाणी पोहोचविण्यात आले आहे.

बंधू आणि भगिनींनो,

डबल इंजिनाच्या सरकारने हे सुनिश्चित केले आहे की, गरीब, दलित, मागास, आदिवासी यांच्यासाठी बनलेल्या योजना वेगाने कार्यान्वित केल्या जाव्यात. प्रधानमंत्री स्वनिधी योजनाही याचेच एक मोठे उदाहरण आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये, या कोरोनाकाळामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, त्यामध्ये पदपथावरील विक्रेते, फेरीवाले, हातगाडीचालक अशा कष्टकरी बंधू-भगिनींच्या उपजीविकेची गाडी योग्य मार्गावर यावी, यासाठी त्यांना बँकेशी जोडण्यात आले आहे. अतिशय कमी काळामध्ये या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशातल्या जवळपास 10 लाख बांधवांना या योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मित्रांनो,

मागील दशकांमध्ये उत्तर प्रदेशची कायम कुठली ओळख होती, उत्तर प्रदेशचा कसा उल्लेख केला जायचा तुम्हाला आठवतच असेल. उत्तर प्रदेशकडे नेहमीच राजकारणाच्या चष्म्यातून पाहिले गेले. उत्तर प्रदेश देशाच्या विकासातही आघाडीची  भूमिका पार पाडू शकते याची  चर्चा देखील होऊ दिली गेली नाही.  दिल्लीच्या  सिंहासनाचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, याचे स्वप्न पाहणारे अनेक लोक आले आणि गेले. मात्र अशा लोकांनी कधीही हे लक्षात ठेवले नाही की भारताच्या समृद्धीचा मार्ग देखील उत्तर प्रदेशातून जातो. या लोकांनी  उत्तर प्रदेशला केवळ राजकारणाचे  केंद्र बनवून ठेवले. कुणी  वंशवादासाठी, कुणी आपल्या कुटुंबासाठी, कुणी आपल्या राजकीय स्वार्थासाठी उत्तर प्रदेशचा केवळ वापर केला. या लोकांच्या मर्यदित राजकारणात भारताच्या एवढ्या मोठ्या राज्याला भारताच्या आर्थिक प्रगतीशी जोडलेच नाही. काही लोक नक्कीच  समृद्ध झाले, काही कुटुंबे देखील समृद्ध झाली.

या लोकांनी उत्तर प्रदेशला नव्हे तर स्वतःला समृद्ध केले. मला आनंद आहे की आज उत्तर प्रदेश,अशा लोकांच्या दुष्टचक्रातून बाहेर पडून पुढे मार्गक्रमण करत आहे. दुहेरी इंजिनच्या  सरकारने उत्तर प्रदेशच्या  सामर्थ्याला  संकुचित नजरेने पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला आहे. उत्तर प्रदेश भारताच्या विकास इंजिनचे सत्ताकेंद्र बनू शकतो हा  आत्मविश्वास गेल्या काही वर्षात निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशच्या इतिहासात प्रथमच  सामान्य युवकांच्या स्वप्नांची चर्चा होत आहे. उत्तर प्रदेशच्या  इतिहासात प्रथमच गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर प्रदेशच्या  इतिहासात प्रथमच  गरीबांना सतावणाऱ्या, दुर्बल घटकांना घाबरवणाऱ्या, धमकवणाऱ्या आणि अवैध कब्जा करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

ज्या व्यवस्थेला भ्रष्टाचार आणि घराणेशाहीची कीड लागली होती , त्यात सार्थक बदल घडण्यास सुरुवात झाली आहे. आज उत्तर प्रदेशात हे सुनिश्चित केले जात आहे की जनतेच्या वाट्याचा एक-एक पैसा थेट जनतेच्या खात्यात जाईल, जनतेला लाभ होईल. आज उत्तर प्रदेश गुंतवणुकीचे केंद्र बनत आहे. मोठमोठ्या कंपन्या आज उत्तर प्रदेशात येण्यासाठी आकर्षित होत आहेत. उत्तर प्रदेशात पायाभूत विकासाचे मोठे प्रकल्प तयार होत आहेत, औद्योगिक कॉरिडोर तयार होत आहेत, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

उत्तर प्रदेश, इथले मेहनती लोक , आत्मनिर्भर भारत, एक वैभवशाली भारताच्या निर्मितीचा खूप मोठा आधार आहेत. आज आपण स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करत आहोत, स्वातंत्र्याचा अमृत  महोत्सव साजरा करत आहोत. हा महोत्सव केवळ  स्वातंत्र्याचा  उत्सव नाही. तर आगामी  25 वर्षांसाठी मोठी लक्ष्य , मोठ्या संकल्पांची संधी आहे. या  संकल्पांमध्ये  उत्तर प्रदेशची खूप मोठी भागीदारी आहे, खूप मोठी जबाबदारी आहे मागील दशकांमध्ये उत्तर प्रदेश जे साध्य करू शकला नाही ते आता साध्य करण्याची वेळ आली आहे. हे दशक एक प्रकारे उत्तर प्रदेशच्या  गेल्या 7  दशकांची तूट भरून काढण्याचे दशक आहे. हे काम उत्तर प्रदेशचे सामान्य युवक , आपल्या मुली,  गरीब, दलित, वंचित, मागास वर्गाची  पुरेशी भागीदारी आणि त्यांना उत्तम संधी दिल्याशिवाय शक्य होणार नाही. सबका साथ, सबका विकास आणि  सबका विश्वास याच मंत्रानुसार आपण पुढे जात आहोत. अलिकडच्या काळात शिक्षणाशी संबंधित घेतलेले दोन मोठे निर्णय असे आहेत ज्याचा  उत्तर प्रदेश खूप मोठा लाभार्थी होणार आहे. पहिला निर्णय इंजीनियरिंगच्या शिक्षणाशी संबंधित आहे. इंजीनियरिंग आणि तांत्रिक शिक्षणाशी संबंधित अभ्यासात उत्तर प्रदेशमधील गावातील आणि गरीबांची मुले मोठ्या प्रमाणात भाषेच्या समस्येमुळे वंचित राहत होती. आता या अडचणी संपल्या आहेत. हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये  इंजीनियरिंग आणि तांत्रिक शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरु होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत उत्तम अभ्यासक्रम ,  श्रेष्ठ पाठ्यक्रम तयार करण्यात आला आहे. देशातील अनेक राज्यांच्या संस्थांनी ही सुविधा लागू करायला सुरुवात केली आहे.

बंधू आणि भगिनींनो,

आणखी एक महत्वाचा निर्णय वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित आहे. वैद्यकीय शिक्षण पद्धतीत अखिल भारतीय कोट्यातून इतर मागासवर्गीय आणि मागासांना आरक्षणाच्या कक्षेतून वगळण्यात आले होते. ह्या परिस्थितीत बदल करण्यासाठी आपल्या सरकारने यात इतर मागासवर्गीयांना 27% आरक्षण दिले आहे. इतकेच नव्हे तर सामान्य वर्गातील गरीब कुटुंबातील मुलांसाठी जे 10% आरक्षण आहे ते देखील याच सत्रापासून लागू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊन जी गरिबांची मुले डॉक्टर होऊ इच्छितात त्यांना डॉक्टर होण्याचा मार्ग खुला झाला आहे. गरीब वर्गातील मुलांना या क्षेत्रात बुद्धिमत्ता गाजविण्याची संधी मिळेल आणि समाजातील प्रत्येक वर्गाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी, अधिक उत्तम कामगिरी करून दाखविण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

बंधू आणि भगिनींनो,

उत्तर प्रदेशातील आरोग्य क्षेत्रात गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय कार्य झाले आहे. कोरोनासारखी जागतिक महामारी जर चार पाच वर्षांपूर्वी आली असती तर त्यावेळी उत्तर प्रदेशाची काय स्थिती झाली असती याची जरा कल्पना करून पहा. त्यावेळी तर साधारण सर्दी-ताप, कॉलरा सारखे आजार देखील जीवघेणे होते. आज उत्तर प्रदेश कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या क्षेत्रात सुमारे सव्वा पाच कोटींच्या टप्प्यावर पोहोचणारे पहिले राज्य म्हणून स्थापित होऊ घातले आहे. हा टप्पा देखील अशा परिस्थितीत गाठला आहे की जेव्हा भारतात तयार झालेल्या लसीबद्दल केवळ राजकारणासाठी विरोध करण्याच्या उद्देशाने काही लोकांनी अफवा पसरविल्या, खोट्या गोष्टींचा प्रचार केला. मात्र उत्तर प्रदेशातील विचारी जनतेने प्रत्येक अफवा, प्रत्येक असत्य मानायला नकार दिला. उत्तर प्रदेश राज्य, ‘सर्वांना लस- मोफत लस’ अभियान यापुढे आणखी वेगाने राबवेल असा मला विश्वास वाटतो. त्याबरोबरच, राज्यातील जनता मास्क आणि सहा फुटांचे शारीरिक अंतर राखण्याच्या नियमांचे पालन करण्यात निष्काळजीपणा करणार नाही याचीदेखील माला खात्री आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. येणारा काळ तर उत्सवांचा काळ आहे. दिवाळीपर्यंत सणासुदींची लयलूट आहे. म्हणून आम्ही ठरविले आहे की या सणांच्या काळात देशातील कोणत्याही गरीब कुटुंबाला त्रास होता कामा नये. आणि म्हणूनच मोफत अन्नधान्य वितरणाचा उपक्रम दिवाळीपर्यंत असाच सुरू राहील. मी पुन्हा एकदा, येणाऱ्या सर्व उत्सवांसाठी तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही सर्वजण निरोगी रहा, तुमचे कुटुंब निरोगी राहो. खूप खूप धन्यवाद!!

 

MC/RA/SB/SK/SC/PM

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1742880) Visitor Counter : 338