युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
ऑलिंपिक पदकविजेती पी.व्ही. सिंधूचे मायदेशी अविस्मरणीय स्वागत
पी व्ही सिंधू भारतासाठी प्रेरणास्त्रोत असून, देशासाठी खेळण्याचे स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक भारतीयाला प्रेरित करणारी खेळाडू- अनुराग सिंग ठाकूर
पी व्ही सिंधू भारतातील सर्वोत्तम ऑलिंपिक खेळाडुंपैकी एक : क्रीडा मंत्री
Posted On:
03 AUG 2021 9:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2021
ठळक वैशिष्ट्ये :
- केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, जी किशन रेड्डी, आणि निशीथ प्रामाणिक हे देखील पी व्ही सिंधूच्या सत्कार समारंभाला उपस्थित
- माझे हे स्वप्न साकार करण्यासाठी मला कायम पाठिंबा देणारे, आणि त्याग करणारे माझे पालक तसेच माझ्या खेळावर मेहनत घेणारे माझे प्रशिक्षक यांची मी मन:पूर्वक आभारी आहे: पी व्ही सिंधू
ऑलिंपिक पदक विजेती बॅडमिंटन पटू पी व्ही सिंधू आज मायदेशी परतल्यावर, नवी दिल्लीत, क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते तिचे शानदार स्वागत करण्यात आले. टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेत, तिची प्रतिस्पर्धी हे बिंग जियाओ हिचा पराभव करत सिंधूने कांस्य पदक जिंकले. ऑलिंपिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामन, केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य भारत विकास मंत्री जी किशन रेड्डी तसेच क्रीडा आणि युवा व्यवहार राज्यमंत्री नितीष प्रामाणिक हे देखील ठाकूर यांच्या सोबत सिंधुच्या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना ठाकूर म्हणाले, “पी व्ही सिंधु भारताच्या सर्वोत्तम ऑलिंपिक खेळाडू आहे. ती भारताची आदर्श, प्रेरणा आहे आणि देशासाठी खेळू इच्छिणारा प्रत्येक भारतीय तिच्याकडून प्रेरणा घेत आहे. तिची अतुलनीय कामगिरी म्हणजे, दोन सलग ऑलिंपिक मध्ये पदक पटकावणे, पुढच्या पिढीच्या खेळाडूंना प्रेरणा देत राहील. सरकारच्या लक्ष्यीत ऑलिंपिक मंच योजनेने आपल्या खेळाडूंना पदक जिंकण्यास मदत केली आहे, हे तिच्या यशातून सिद्ध होते. टोक्यो ऑलिंपिकला जाण्यापूर्वी ती पंतप्रधान मोदींना भेटली आणि तिने पदक जिंकताच, सर्वात पहिले त्यांनी फोन करुन तिचे अभिनंदन केले. तिच्या नेत्रदीपक कामगिरीने 130 कोटी भारतीय रोमांचित झाले आहेत!”
चेहऱ्यावरून आनंद ओसंडत असलेल्या सिंधुने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले, “माझ्या सर्व चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते. जारी आम्ही तिथे मैदानात चाहते आणि प्रेक्षकांविना खेळलो, तरीही, मला खात्री आहे की भारतातल्या लक्षावधी चाहत्यांनी मला इथून पाठिंबा दिला आणि त्यांच्या या शुभेच्छांमुळेच मला आज हे यश मिळाले आहे. मला सातत्याने पाठिंबा देणारे आणि माझ्यासाठी अनेक त्याग करणारे माझे पालक तसेच माझ्या खेळावर मेहनत घेणारे माझे प्रशिक्षक यांनी माझे हे स्वप्न साकार होण्यास मदत केली आहे. त्यांचेही मी आज आभार मानते.
यावेळी संबोधित करताना श्रीमती निर्मला सीतारामन म्हणाल्या की, सिंधू एक महान क्रीडापटू आहे आणि तिने वारंवार स्वतःला हे सिद्ध केले आहे.काटेकोरपणे तयारी, गचीबोवली येथे जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण सुविधा, एक उत्तम प्रशिक्षक, कौटुंबिक आधार आणि सिंधूची स्वतःची चिकाटी, धैर्य यांचे तिच्या यशात योगदान आहे."तो एक दिवस होता ज्या दिवशी सर्व भारतीयांना निरपेक्ष प्रेरणा आणि उत्तेजन मिळाले'', असे त्या म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, '' काय प्रेरणा आहे ही.. ! काय उत्तेजन आहे हे ..! ही प्रेरणा आणि उत्तेजन येणाऱ्या पिढ्यांसाठी असेल''.
या प्रसंगी बोलताना श्री रेड्डी म्हणाले, ''टोक्यो ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेमधे पी. व्ही सिंधूने जिंकलेले पदक अनेकांसाठी प्रेरणादायी कहाणी आहे- दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे आणि सलग दोन ऑलिम्पिक खेळांमध्ये पदके जिंकणारी ती एकमेव भारतीय आहे. या आकडेवारीमागे आयुष्यभराची उत्कट भावना , धैर्य आणि त्याग आहे. पहाटेचा सराव आणि रात्री उशिरापर्यंतचा व्यायाम ही बरीच वर्षे तिच्यासाठी "नेहमीची सामान्य" गोष्ट होती. एक तेलुगु मुलगी आणि हैदराबादीला हे साध्य करताना पाहून एक तेलुगू म्हणून, माझे हृदय अभिमानाने भरून येते. ते पुढे म्हणाले की, , सिंधूचे यश केवळ 65 लाख हैदराबादवासी किंवा 6.5 कोटी तेलगू भाषक किंवा 65 कोटी
भारतीय महिला आणि मुलींनाच नव्हे तर संपूर्ण भारताला प्रेरणा देईल.या नेत्रदीपक यशाबद्दल मी पुन्हा एकदा तिचे अभिनंदन करतो ”
कार्यक्रमात बोलताना श्री. प्रामाणिक म्हणाले, ''सलग दुसरे ऑलिम्पिक पदक मिळवून देणारी पहिली भारतीय महिला बनून इतिहास रचल्याबद्दल पी. व्ही. सिंधूचे कौतुक, तिचे समर्पण, प्रामाणिकपणा, नम्रता आणि क्रीडा भावना सर्वांसाठी प्रेरणादायी राहील. भारताला तुझा अभिमान आहे. ''
सरकारने गेल्या ऑलिम्पिक कालावधीसाठी सिंधूला सुमारे 4 कोटी रुपयांचा निधी दिला होता, ज्यात हैदराबादमधील प्रशिक्षण शिबिरांसह 52 आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा प्रवास समाविष्ट आहे.याशिवाय, तेलंगणा सरकारच्या सहकार्याने, ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेच्या आधी गचीबोवली स्टेडियममध्ये तिला प्रशिक्षण देण्याची सोय केली.
24 जुलै रोजी 49 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकणाऱ्या भारोत्तोलक मीराबाई चानू नंतर टोक्यो 2020 मध्ये पदक मिळवून मायदेशी परतणारी सिंधू दुसरी भारतीय खेळाडू आहे.मुष्टियोद्धा लव्हलिना बोर्गोहेनने 69 किलो गटात पदक निश्चित केले आहे , बुधवारी उपांत्य फेरीत तुर्कीच्या बुसेनाझ सुरमेनेली हिच्याशी तिचा सामना होणार आहे.
M.Chopade/R.Aghor/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1742063)
Visitor Counter : 290