पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या गुजरातमधील लाभार्थ्यांशी संवाद
पूर्वी, स्वस्त धान्य योजनांचे अर्थसाह्य आणि व्याप्ती वाढत असे, मात्र त्या प्रमाणात भूकबळी आणि कुपोषणाच्या प्रमाणात घट झाली नाही-पंतप्रधान
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरु झाल्यापासून लाभार्थ्यांना आधीपेक्षा जवळपास दुप्पट अन्नधान्याचा लाभ-पंतप्रधान
कोरोना महामारीच्या काळात 80 कोटींपेक्षा अधिक लोकांना मोफत अन्नधान्य; योजनेसाठी 2 लाख कोटी रुपयांचा खर्च- पंतप्रधान
शतकातील सर्वात मोठ्या संकटाच्या काळातही एकही नागरिक उपाशी राहिला नाही- पंतप्रधान
गरिबांना रोजगार देण्यास आज सरकारचे सर्वोच्च प्राधान्य- पंतप्रधान
आपल्या खेळाडूंचा नवा आत्मविश्वास आज नव्या भारताची ओळख ठरतो आहे- पंतप्रधान
देशाची 50 कोटींच्या विक्रमी लसीकरणाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल-पंतप्रधान
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात राष्ट्र उभारणीसाठी नवी प्रेरणा घेण्याची प्रतिज्ञा करूया- पंतप्रधान
Posted On:
03 AUG 2021 4:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानममंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या गुजरातमधील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी गुजरातमध्ये आज एका सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की गुजरातमधील लाखों कुटुंबांना आज पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य मिळत आहे. या मोफत धान्यामुळे, गरीबांवरचा ताण कमी झाला असून, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे, कुठलेही संकट आले, तरीही, देश आपल्यासोबत आहे, अशी भावना गरिबांच्या मनात निर्माण करायला हवी असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.
स्वातंत्र्यानंतर, जवळपास प्रत्येक सरकार गरिबांना स्वस्त धान्य देण्याचे वचन देत होते. स्वस्त शिधा योजनेसाठीची आर्थिक तरतूद आणि योजनेची व्याप्ती दरवर्षी वाढत गेली. मात्र, त्याचा जेवढा परिणाम व्हायला हवा होता, तेवढा न होता, तो अत्यंत मर्यादित राहिला, असे पंतप्रधानांनी नमूद केले. देशातील अन्नधान्य साठा वाढत होता, मात्र त्या प्रमाणात भूकबळी आणि कुपोषण कमी झाले नाही. याचे एक मुख्य कारण म्हणजे, अन्न वितरणाच्या प्रभावी व्यवस्थेचा अभाव, असे त्यांनी सांगितले. ही स्थिती बदलण्यासाठी 2014 नंतर नव्याने सुरुवात करण्यात आली. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत, कोट्यवधी बनावट लाभार्थी शोधून, त्यांना योजनेबाहेर काढण्यात आले. शिधापत्रिकेला आधार कार्डशी जोडण्यात आले. यामुळे , देशात शतकातील सर्वात मोठे संकट येऊनही, कोणीही नागरिक उपाशी राहिला नाही, असे पंतप्रधान म्हणाले. टाळेबंदीच्या काळात जेव्हा उपजीविकेला धोका निर्माण झाला होता, व्यापार-उंदयोग ठप्प झाले होते, अशा काळातही सर्वाना धान्य मिळाले. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले. महामारी च्या काळात 80 कोटींपेक्षा जास्त लोकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करुन दिले आहे. त्यासाठी सरकार 2 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करत आहेत, असे मोदी म्हणाले.
2 रुपये/किलो गव्हाचा, 3 रुपये/किलो तांदूळ या धान्याच्या निश्चित कोट्याशिवाय, प्रत्येक लाभार्थ्याला पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत दिले जात आहे, असे त्यांनी सांगितले. म्हणजेच, शिधापत्रिकेच्या एकूण दुप्पट धान्य, आज लाभयार्थ्याना मोफत मिळत आहे. ही योजना दिवाळीपर्यंत सुरु राहणार आहे. एकही गरीब व्यक्ती उपाशी झोपणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. स्थलांतरित मंजूरांची विशेष काळजी घेत त्यांच्या साठी एक देश, एक शिधापत्रिका योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असल्याबद्दल पंतप्रधानानी गुजरात सरकारचे कौतूक केले.
आज देश पायाभूत सुविधांवर भरमसाठ पैसा खर्च करत आहे, त्याच वेळी सर्वसामान्य माणसाचे जगणे सुखकर व्हावे, यासाठी उद्योगस्नेही वातावरण निर्मितीचे नवे आयाम स्थापन करत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
आज गरिबांना रोजगार देणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. गरिबांना सक्षम करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. यात, 2 कोटींपेक्षा अधिक गरीब कुटुंबाना हक्काची घरे मिळाली आहे, 10 कोटी कुटुंबाना शौचालये मिळाली आहे. त्याचप्रमाणे, जन धन योजनेत त्यांचा समावेश झाल्याने, ती बँकिंग क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आली आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.
कोणत्याही घटकाच्या सक्षमीकरणासाठी, आरोग्य, शिक्षण, सुविधा, आणि प्रतिष्ठेचे जीवन त्यांना मिळावे यासाठी सातत्याने परिश्रम करावे लागतात. आयुष्मान भारत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षण, रस्ते, मोफत गॅस आणि वीज जोडणी, मुद्रा योजना, स्वनिधी योजना या सर्व योजना गरिबांना प्रतिष्ठेचे जीवन जागता यावे या दिशेने केलेले प्रयत्न आहेत. तसेच, सक्षमीकरणाचे माध्यम बनले आहे, असे त्यांनी सांगितले.
आज गुजरातसहित देशभर अशी अनेक कामे सुरु आहेत ज्यामुळे देशवासियांचा आणि प्रत्येक प्रदेशाचा आत्मविश्वास वाढतो आहे आणि या आत्मविश्वासामुळेच, आपण प्रत्येक आव्हानाचा सामना करु शकतो, प्रत्येक स्वप्न पूर्ण करु शकतो आहोत, असे त्यांनी सांगितले.
भारताच्या, ऑलिंपिक पथकाविषयी बोलताना ते म्हणाले, की सध्या जगभरात, शतकात एखादे वेळीच येणारे मोठे संकट पसरले असतानाही, यंदा सर्वाधिक खेळाडूंची ऑलिंपिकसाठी निवड झाली. आपले खेळाडू केवळ ऑलिंपिकसाठीच पात्र ठरले नाहीत, तर, त्यांनी आपल्यापेक्षा क्रमवारीत वरच्या स्थानावर असलेल्या खेळाडूंना मागे टाकत त्यांनी उत्तम कमगिरी केली आहे, करत आहेत.
भारतीय खेळाडूंचा उत्साह, खेळण्याप्रतीची अत्युच्च आवड आणि निष्ठा, तसेच भारतीय खेळाडूंची उमेद आज सर्वोच्च स्थानी आहे. जेव्हा गुणवत्तेची योग्य पारख करुन त्याला प्रोत्साहन दिले जाते, तेव्हाच हा आत्मविश्वास येतो, असे मोदी म्हणाले. आज हा आत्मविश्वासकहा नव्या भारताची ओळख ठरला आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
हाच आत्मविश्वास सर्वानी कोरोनाविरुद्धच्या लढाईत तसेच आपल्या लसीकरण मोहिमेतही कायम ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. या जागतिक महामारीच्या वातावरणात आपली सतर्क वृत्ती कायम ठेवावी, असेही ते म्हणाले.
आज देश 50 कोटी लसीकरणाच्या मैलाच्या दगडाकडे वेगाने वाटचाल करत असल्याचे सांगत, ते म्हणाले, की गुजरातदेखील साडे तीन कोटी लसीच्या मात्रा देण्याचा टप्पा पूर्ण करण्याच्या जवळ आहे. लसीकरणाच्या गरजेवर भर देत, मास्क लावणे, गर्दीची ठिकाणे टाळणे आजही कटाक्षाने पाळले गेले पाहिजे.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात, देशवासियाना अमृतमहोत्सवानिमित्त, देशात राष्ट्रबांधणीची नवी प्रेरणा जागृत करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. 75 व्या वर्षांनिमित्त आपण सर्वजण ही प्रतिज्ञा करुया, असे आवाहन त्यांनी केले. गरीब, श्रीमंत, स्त्री-पुरुष, वंचित, सर्वाना समान अधिकार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
गेल्या वर्षी या योजनेअंतर्गत सुमारे 948 लाख मेट्रिक टन अन्नधान्य वितरण केले गेले, जे सुरक्षा योजनेअंतर्गत नियमित मिळणाऱ्या धान्यापेक्षा 50% अधिक होते. 2020-21 या वर्षात 2.84 लाख कोटी रुपये अन्न अनुदानापोटी देण्यात आले.
गुजरातमधील 3.3 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना, 25.5 लाख मेट्रिक टन धान्य वितरित करण्यात आले.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक देश, एक शिधापत्रिका योजना देशातल्या 33 राज्यात लागू करण्यात आली आहे.
S.Tupe/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1741891)
Visitor Counter : 757
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam