आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

सर्वसामान्यपणे डेल्टा प्लस म्हटला जाणारा कोरोनाचा B.1.617.2.1 प्रकार अल्फा प्रकाराच्या तुलनेत 40-60 टक्के अधिक संक्रमणकारी : डॉ.एन.के.अरोरा, INSACOG चे सह-अध्यक्ष


“ICMR ने याविषयी हाती घेतलेल्या अभ्यासानुसार, सध्याच्या लसी डेल्टा प्रकाराविरुद्ध प्रभावी कार्य करतात”

“अधिकाधिक लोकांनी लस घेतली आणि कोविड-योग्य वर्तणुकीचे पालन केले तर भविष्यकाळात येणाऱ्या लाटा नियंत्रित तसेच प्रलंबित करता येतील”

विषाणूच्या डेल्टा प्रकाराने होणारा आजार अधिक गंभीर आहे का हे सांगता येणे कठीण आहे- डॉ.एन.के.अरोरा

Posted On: 19 JUL 2021 4:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जुलै 2021

INSACOG अर्थात द इंडिअन सार्स-को व्ही–2 जिनोमिक्स कॉन्सॉर्टीयमचे सह-अध्यक्ष डॉ.एन.के.अरोरा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कोरोना विषाणूच्या विविध प्रकारांच्या चाचण्या आणि नंतरचा पाठपुरावा यासाठी आखून दिलेल्या प्रमाणित कार्यान्वयन पद्धती (SOP) डेल्टा प्रकाराला मोठ्या प्रमाणात संक्रमणकारी करण्यासाठी कारणीभूत घटक, त्याचा प्रसार रोखण्यासाठी जनुकीय परीक्षणाचा उपयोग याबद्दल तपशीलवार माहिती दिली आणि आणि कोविड-योग्य वर्तणुकीचे पालन करण्याच्या महत्वाचा पुनरुच्चार केला.

INSACOG अर्थात द इंडिअन सार्स-को व्ही–2 जिनोमिक्स कॉन्सॉर्टीयम हा कोविड-19 महामारीच्या संदर्भात या विषाणूच्या संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारणासाठी स्थापन करण्यात आलेला भारत सरकारचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा जैवतंत्रज्ञान विभाग, ICMR अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि CSIR अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळ यांच्या 28 प्रयोगशाळांचा संघ आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 25 डिसेंबर2020 ला INSACOG ची स्थापना केली.

नुकताच INSACOG चा विस्तार करण्यात आला. या विस्तारामागे कोणता विचार आहे?

या विषाणूची चिंताजनक रूपे आणि संसर्गाचा प्रसार यावर बारकाईने कलश ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांचा अधिक मोठ्या क्षेत्रावर फैलाव होण्याआधीच त्यावर  नियंत्रण मिळविता येईल.डिसेंबर 2020 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या संघात 10 प्रयोगशाळांचा समावेश होता. मात्र नुकत्याच आणखी 18 प्रयोगशाळा या संघात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

SARS-CoV-2 च्या विषाणूचा जनुकीय परीक्षणात्मक अभ्यास करणे आणि संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारणाची हाती आलेली माहिती, वैद्यकीय तसेच साथरोगविषयक उपलब्ध आकडेवारी यांचा एकमेकांशी परस्परसंबंध जोडून विषाणूचे हे प्रकार अधिक संक्रमणकारी आहेत की नाहीत, ते सामान्य प्रतिकारशक्तीवत मात करू शकतात का किंवा तीव्र संसर्ग करू शकतात का, लसीच्या प्रभावाला खिंडार पडू शकतात का आणि सध्याच्या निदान विषयक चाचण्यांचा वापर करून त्यांचा संसर्ग निश्चित करता येऊ शकतो का हे पाहण्यासाठी प्रयोगशाळांचे  सशक्त जाळे निर्माण करणे हा या विस्तारामागचा उद्देश होता.

त्यानंतर NCDC अर्थात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र या माहितीचे विश्लेषण करते. संपूर्ण देशाचे अनेक भौगोलिक विभाग पाडण्यात आले असून प्रत्येक प्रयोगशाळेकडे एका विशिष्ट विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. आम्ही एकूण 180 ते 190 समूह तयार केले आहेत आणि प्रत्येक समूहात सुमारे 4 जिल्हे समाविष्ट केले आहेत. नियमित स्वरुपात तपासणीसाठी घेतलेले नमुने आणि ज्यांच्या आजाराने गंभीर स्वरूप धारण केले आहे, तीव्र संसर्ग झाला आहे आणि इतर अनेक वेगळी वैद्यकीय लक्षणे आहेत अशा रुग्णांचे नमुने गोळा करून क्रमनिर्धारणासाठी प्रादेशिक प्रयोगशाळांकडे पाठविले जातात. देशातील प्रयोगशाळांची जनुकीय क्रमनिर्धारणाची सध्याची क्षमता आता प्रतिमास 50,000 नमुने इतकी आहे. यापूर्वी प्रतिमास 30,000 नमुने तपासण्याची त्यांची क्षमता होती.

विषाणूच्या विविध रूपांची चाचणी करून मागोवा घेण्यासाठी देशात कोणत्या प्रकारची यंत्रणा उपलब्ध आहे?

भारतामध्ये एकात्मिक रोग तपासणी कार्यक्रमाची (IDSP) उत्तम प्रकारे स्थापित यंत्रणा आहे. नमुने गोळा करणे आणि विविध जिल्हे किंवा संरक्षणात्मक ठिकाणांहून प्रादेशिक जनुकीय क्रमनिर्धारण प्रयोगशाळांकडे (RGSL)पाठविणे यातील समन्वय साधण्याची जबाबदारी IDSP पार पाडते. चिंताजनक रूपे (VoC) आणि विषाणूंची दखलपात्र रूपे  (VoI) तसेच  धोकादायक दखलपात्र रूपे आणि उत्परिवर्तन झालेली इतर रूपे यांचे जनुकीय क्रम निर्धारण  निश्चित करणे आणि ओळख पटविणे यासाठी RGSLs जबाबदार असतात. विषाणूंची दखलपात्र रूपे  (VoI) आणि चिंताजनक रूपे (VoC) यांच्याबाबतची माहिती थेट केंद्रीय तपासणी विभागाकडे सादर केली जाते जेणेकरून राज्य तपासणी अधिकाऱ्याशी समन्वय साधून या नमुन्यांतील वैद्यकीय-साथ रोग संबंध निश्चित करता येतील. हे नमुने नंतर नियुक्त जैव-बँकेकडे पाठविले जातात.

सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत महत्त्वाच्या अशा जनुकीय उत्परिवर्तनाची ओळख निश्चित झाल्यानंतर RGSLs ही माहिती शास्त्रीय आणि वैद्यकीय सल्लागार गटाकडे (SCAG) सादर केली जाते. विषाणूच्या महत्त्वाच्या धोकादायक रूपांविषयी तसेच इतर उत्परिवर्तनीय रूपांविषयी  SCAG मध्ये चर्चा केली जाते आणि गरज वाटली तर ते नमुने अधिक तपासणीसाठी केंद्रीय तपासणी विभागाकडे पाठविले जातात.

संबंधित माहिती आणि नमुन्यांतील वैद्यकीय-साथ रोग संबंध NCDC चा भाग असलेल्या IDSP कडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला, ICMR अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि CSIR अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळ यांना, जैवतंत्रज्ञान विभागाला आणि संबंधित राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात येते.

शेवटी, विषाणूची नवीन उत्परिवर्तित रूपे, चिंताजनक रूपे यांचे प्रयोगशाळेत संवर्धन केले जाते, त्यांचा शास्त्रीय अभ्यास हाती घेऊन या रूपांची संसर्ग करण्याची क्षमता, विषारीपणा, लसीची या रूपांच्या बाबतीत परिणामकारकता आणि या रूपांचे प्रतिकारशक्तीला चकवा देण्याचे गुणधर्म याबाबत अधिक माहिती मिळविली जाते. 

जगाच्या चिंतेचा विषय म्हणून डेल्टा रूपावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रकाराला इतके गंभीर का म्हटले जाते?

B.1.617.2 म्हणजे डेल्टा हे कोविड-19 विषाणूचे एक रूप आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये भारतात सर्वात प्रथम या प्रकाराचा शोध लागला आणि हा प्रकार भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार मानला जातो, नव्या रुग्णांपैकी 80%रुग्ण विषाणूच्या याच प्रकाराने बाधित झालेले दिसून आले. या रूपाचा उगम महाराष्ट्रात झाला आणि त्याने उत्तरेला, देशाच्या पश्चिम भागाला धरून वाटचाल केली, आणि नंतर देशाच्या मध्यवर्ती आणि पूर्वेकडील देशांमध्ये त्याचा संसर्ग आढळून आला.

या विषाणूच्या पुष्ठ्भागावरील टोकदार भागातील प्रथिनांमध्ये झालेल्या उत्परिवर्तनामुळे ते विषाणूला पेशीच्या पुष्ठ्भागावरील ACE2 रिसेप्टर्सशी अधिक घट्टपणे बांधून ठेवतात त्यामुळे त्याचे अधिक उत्तम संक्रमण होते आणि हा विषाणू मानवी प्रतिकारक्षमतेला चांगल्या प्रकारे चकवा देऊ शकतो. कोरोना विषाणूच्या पूर्वी प्रचलित असलेल्या अल्फा प्रकारापेक्षा हा डेल्टा प्रकार 40 ते 60 टक्के अधिक संक्रमणकारी आहे आणि आता तो युनायटेड किंगडम, अमेरिका आणि सिंगापूरसह जगातील 80 हून अधिक देशांमध्ये पोहोचला आहे.

विषाणूच्या इतर रुपांपेक्षा डेल्टा अधिक गंभीर आजाराला कारणीभूत आहे का ?

डेल्टा प्रकारामध्ये झालेली काही उत्परिवर्तने अनेक केंद्रबिंदू असलेला प्रजीव समूह निर्माण कारी शकतात असे अभ्यासाअंती दिसून आले आहे. त्याशिवाय, मनुष्य पेशीवर हल्ला केल्यावर तो वेगाने स्वतःची प्रतिरूपे तयार करतो. त्यामुळे फुफ्फुसांसारख्या अवयवांमध्ये शक्तिशाली दाह निर्माण होतो. मात्र, डेल्टा प्रकाराने अधिक गम्भेर आजार होतो अस निश्चितपणे सांगणे कठीण आहे. या प्रकाराने  भारतात, दुसऱ्या लाटेमुळे बाधित वयोगट आणि मृत्यू यांचे एकूण चित्र पहिल्या लाटेसारखेच आहे.

डेल्टा प्रकारापेक्षा डेल्टा प्लस प्रकार अधिक धोकादायक आहे का?

डेल्टा प्लस रूपाचे AY.1 आणि AY.2 हे प्रकार  आतापर्यंत महाराष्ट्र, तामिळनाडू,आणि मध्य प्रदेशमधील 55 ते 60 रुग्णांमध्ये आढळून आले आहेत.नेपाळ, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, पोलं आणि जपान या देशांमध्ये AY.1 हा प्रकार अधिक प्रमाणात दिसून आला असून त्यामानाने AY.2  हा प्रकार कमी वेळा दिसून आला आहे.

विषाणूच्या डेल्टा रुपाविरुद्ध लस प्रभावीपणे कार्य करते का?

होय, सध्या देण्यात येणाऱ्या लसी डेल्टा प्रकारांविरुद्ध प्रभावी असल्याचे ICMR ने यासंदर्भात केलेल्या अभ्यासावरून दिसून आले आहे.

देशाच्या काही भागांत अजूनही बाधितांमध्ये वाढ दिसून येत आहे. असे का?

देशाच्या बहुतेक भागात आता कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून येत आहे, काही भागांमध्ये,विशेषतः ईशान्येकडील भागात आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये चाचण्यांचे पॉझिटीव्हिटी दर जास्त दिसत आहेत, त्यापैकी बरेचसे डेल्टा रूपाने बाधित असू शकतील असे आहेत.

कोरोनाच्या भविष्यातील लाटा थांबविता येतील का?

हा विषाणू संवेदनक्षम आणि संसर्गाची जास्त प्रमाणात शक्यता असलेल्या लोकांना बाधित करतो. लोकसंख्येचा मोठा भाग बाधित केल्यावर या विषाणूचा संसर्ग कमी होताना दिसतो मात्र कोविड झाल्यामुळे लोकांमध्ये निर्माण झालेली नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर तो पुन्हा हल्ला करतो.विष्णूच्या अधिक संसर्गक्षम प्रकारांची निर्मिती झाली तर बाधितांची संख्या वाढते. याचाच अर्थ असा की, लोकसंख्येचा मोठा भाग या विषाणूच्या ज्या रूपाप्रती अधिक संवेदनशील आहे त्या रूपाने हल्ला केला तर पुढची लाट येणे क्रमप्राप्त आहे.

दुसरी लाट अजून ओसरली नाही. अधिकाधिक लोकांचे लसीकरण झाले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या लोकसंख्येच्या लक्षणीय भागाचे लसीकरण होईपर्यंत सर्वांनीच कोविड-योग्य वर्तणुकीचे आचरण केले तर भविष्यात येणाऱ्या लाटांवर नियंत्रण मिळविता येईल आणि त्या थोपविता येतील.

कोविड-19 संसर्गाला थांबविण्यासाठी लोकांनी लसीकरण करून घेणे आणि कोविड-योग्य वर्तणुकीचे आचरण करणे आवश्यक आहे.

 

 

 

 

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1736795) Visitor Counter : 874