पंतप्रधान कार्यालय

संसदेच्या 2021 मधील पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातिला पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 19 JUL 2021 11:13AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 19 जुलै 2021

मित्रांनो, मी तुम्हां सर्वांचे स्वागत करतो आणि तुम्हां सर्वांनी कोविड लसीची किमान एक मात्रा घेता आली आहे अशी अपेक्षा करतो. मात्र, लस घेतल्यानंतर देखील, मी माझ्या सर्व मित्रांना विनंती करतो, माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की, आपण सर्वांनी कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करण्यात सहकार्य द्यावे. कोरोना लस ही दंडावर म्हणजे बाहुवर टोचून घ्यावी लागते आणि जेव्हा आपण बाहूवर ही लस टोचून घेतो तेव्हा आपण सर्व बाहुबली म्हणजे सशक्त होतो आणि कोरोना आजाराशी लढण्यासाठी आपल्या दंडावर लस टोचून घेणे हा बाहुबली होण्यासाठीचा एकमेव उपाय आहे. 

कोरोना विरुद्धच्या लढाईत लस टोचून घेऊन आतापर्यंत 40 कोटींहून अधिक लोक बाहुबली झाले आहेत. यापुढील काळात देखील, लसीकरणाचे कार्य आपण अत्यंत वेगाने पुढे नेत आहोत. या कोरोना महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले आहे, समस्त मानवजातीला वेढून टाकले आहे आणि म्हणूनच या महामारीविरुद्धाच्या लढाईत काही नव्या गोष्टी अंतर्भूत करता याव्या, सध्याच्या व्यवस्थेमध्ये काही चुका अथवा त्रुटी राहून गेल्या असतील तर त्यांची दुरुस्ती करता यावी  आणि कोरोना विरुद्धच्या या लढाईत सर्वांनी एकत्र येऊन समर्थपणे एकमेकांसोबत  आगेकूच करावी या उद्देशाने संसदेत देखील या महामारीबाबत साधक बाधक चर्चा होईल, या विषयाला प्राधान्य देऊन त्याबाबत विचार मंथन घडेल, सदनातील सर्व मान्यवर सदस्यांकडून व्यवहार्य  सूचना केल्या जातील अशी आमची अपेक्षा आहे. 

सभागृहातील सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की त्यांनी जर उद्या संध्याकाळी मला त्यांचा थोडा मोकळा वेळ दिला तर मी त्यांना महामारीबद्दल आपल्याकडे सध्या असलेली सगळी माहिती त्यांना तपशीलवारपणे देऊ शकेन. सरकारला संसदेच्या सभागृहात तसेच सभागृहाबाहेर देखील सर्व नेत्यांशी चर्चा करायची आहे कारण या विषयासंदर्भात मी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सतत भेटी घेऊन चर्चा करत आहे. विविध प्रकारच्या मंचांवर महामारीबाबत सर्व प्रकारचा उहापोह होत आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे की आता अधिवेशन सुरु आहे तर त्यानिमित्ताने प्रत्यक्ष भेट घेऊन या विषयावर समोरासमोर बसून चर्चा करण्याची संधी घ्यावी .

मित्रांनो, या अधिवेशनात परिणामकारक निर्णय घेतले जावे, साधक बाधक चर्चा घडावी, जनतेला सरकारकडून ज्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत ती देता यावी यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. मी सर्व माननीय खासदारांना, सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की त्यांनी सरकारला अगदी झोंबणारे प्रश्न विचारावेत, कठोरपणे जाब विचारावा मात्र, सरकारला शांतपणे उत्तरे देण्याची संधी देखील द्यावी. या सवाल जबाबातून जनतेपर्यंत खरी माहिती पोहोचल्यामुळे लोकशाही सशक्त होते, जनतेचा लोकप्रतिनिधींवरचा विश्वास देखील वाढतो, देशाच्या विकासाची गती वाढते आणि त्याचसोबत प्रगतीचा वेग देखील वाढतो.  

   

मित्रांनो, या अधिवेशनात पूर्वीप्रमाणे व्यवस्था नसेल. बहुतेक सर्वांचे लसीकरण झालेले असल्यामुळे सर्वजण एकत्र बसून काम करणार आहेत. मी तुम्हां सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि प्रत्येकाने आपापली व्यवस्थित काळजी घ्यावी अशी कळकळीची विनंती करतो. आपण सर्वजण एकदिलाने देशवासीयांच्या आशा- आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करूया.

मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.

***

 JaideviPS/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1736709) Visitor Counter : 330