पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी कोविड-19 संबधित परिस्थितीबद्दल काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधलेला संवाद
Posted On:
16 JUL 2021 7:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2021
नमस्कार !
कोरोना विरुद्ध देश या लढाईतील अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर आपण सर्वांनी आपापले म्हणणे मांडलेत. दोन दिवसांपूर्वीच नॉर्थ ईस्टच्या सर्व मुख्यमंत्र्यांसह याच विषयावर चर्चा करण्याची संधी मला मिळाली होती. कारण जिथे जिथे चिंताजनक परिस्थिती आहे प्रामुख्याने त्या त्या राज्यांसोबत मी याबद्दल चर्चा करत आहे.
मित्रहो,
गेल्या दीड वर्षात देशाने परस्पर सहकार्य आणि एकत्रित प्रयत्नांनी एवढ्या मोठया महामारीशी मुकाबला केला. ज्या प्रकारे सर्व राज्य सरकारे एकमेकांपासून शिकत गेली, आपल्यातील Best Practices समजून घेण्याचे कष्ट घेतले, एकमेकांना मदत करण्याचे प्रयत्न केले आणि आता आपण अनुभवान्ती असे म्हणू शकतो की पुढची लढाई जिंकता येणे आपल्याला शक्य आहे.
मित्रहो,
आपणा सर्वांनाच व्यवस्थित कल्पना आहे, की जेथे तिसरी लाट येण्याची शंका व्यक्त केली जात आहे अशा वळणावर आपण आज उभे आहोत. देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये रूग्णांची संख्या ज्याप्रकारे कमी झाली होती त्यामुळे सायकॉलॉजीकली काहीशी सुटकेची भावना जाणवत होती. हा डाऊनवर्ड ट्रेंड बघून देश लवकरच दुसऱ्या लाटेतून सावरेल अशी आशा काही तज्ञ व्यक्त करत होते. मात्र काही राज्यांमध्ये रुग्णांची वाढत असलेली संख्या अजूनही काळजीचे कारण ठरते आहे.
मित्रहो,
आज जेवढी राज्ये म्हणजे सहा राज्ये येथे जमली आहेत, या चर्चेत सामील झाली आहेत, गेल्या आठवड्यात 80 टक्के नवीन रुग्ण त्या राज्यांमधील आहेत. एकूण कोरोना मृत्यूंपैकी 84 टक्के मृत्यू या राज्यांमधले आहेत. सुरुवातीला तज्ञांना असे वाटत होते की जिथे दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली तिथे परिस्थिती इतर ठिकाणांच्या मानाने नियंत्रणात असेल. परंतु महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांमधील रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. हा आपल्या सर्वांसाठी, देशासाठी एक मोठा चिंतेचा विषय झालेला आहे. असाच कल जानेवारी-फेब्रुवारी म्हणजे दुसऱ्या लाटेच्या आधी आपल्याला आढळून येत होता. म्हणूनच, परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर हाताबाहेर जाईल अशी शंका साहजिकच येते. ज्या राज्यांमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे त्यांनी तत्परतेने उपाययोजना करत तिसऱ्या
लाटेचा धोका टाळला पाहिजे
मित्रहो,
तज्ञांचे म्हणणे आहे की बऱ्याच काळापासून सतत रुग्णांची संख्या वाढल्यामुळे कोरोना विषाणूमध्ये उत्परिवर्तन होण्याची शक्यता वाढते, नवीन व्हेरिएंटचा धोका वाढतो. त्यामुळे तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोनाविरूद्ध प्रभावी पावले उचलणे आवश्यक आहे. म्हणून तिसरी लाट थोपवण्यासाठी कोरोना विरुद्ध प्रभावी पावले उचलली जाणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपण आपल्या राज्यात वापरले आहे तेच धोरण उपयुक्त आहे. तसेच, संपूर्ण देशानेही तेच अंगिकारले आहे. त्याचा एक अनुभवसुद्धा आपण घेतलेला आहे. आपल्यासाठी सुद्धा ती तपासलेली आणि सिध्द झालेली रणनीती आहे. चाचण्या, रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध, उपचार आणि लस या रणनीती वर लक्ष केंद्रित करत आपल्याला पुढे जायचे आहे. आपल्याला मायक्रो कंटेनमेंट झोनवर विशेष लक्ष द्यायला हवे. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे, रूग्णांची संख्या जास्त आहे तेथे तेवढेचजास्त लक्ष दयायला पाहिजे. नॉर्थ ईस्टच्या मित्रांबरोबर आता मी बोलत होतो तेव्हा एक मुद्दा समोर आला की काही राज्यांनी लॉकडाऊन करण्याऐवजी मायक्रोकंटेनमेंट झोनवर जास्त भर दिला. त्यामुळे ती राज्ये परिस्थिती आटोक्यात आणू शकली.
चाचण्या करताना अशा जिल्ह्यांवर विशेष लक्ष देऊन संपूर्ण प्रदेशातसुद्धा चाचणी क्षमता अधिकाधिक वाढवता कसे येईल यावर काम झाले पाहिजे. ज्या जिल्ह्यांमध्ये, ज्या ज्या प्रदेशांमध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त आहे तिथे लससुद्धा आपल्यासाठी एक धोरणात्मक साधन आहे. लसीच्या परिणामकारक वापरामुळे कोरोनातून उद्भवणारे त्रास कमी होऊ शकतात. काही राज्ये आपल्याला जी विंडो मिळाली आहे, त्याचा वापर आपली RT-PCR टेस्टिंग क्षमता वाढवण्यासाठी करत आहेत. हे सुद्धा एक प्रशंसनीय आणि आवश्यक पाऊल आहे. RT-PCR टेस्टिंग जास्तीत जास्त होत असेल तर विषाणूला आळा घालण्यासाठी खूप परिणामकारक ठरू शकते.
मित्रहो,
नवीन आयसीयू बेड बनवणे, चाचणी क्षमता वाढवणे आणि संबंधित इतर खर्चांसाठी देशातील सर्व राज्यांना निधी दिला जात आहे. नुकतेच केंद्र सरकारने 23 हजार कोटी रुपयांहून जास्त आपत्कालीन कोविड प्रतिसाद पॅकेज जारी केले आहे. या बजेटचा उपयोग आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी व्हायला हवा. राज्यांमध्ये पायाभूत सुविधांमधील कमतरता वेगाने भरून काढण्यावर ध्यान दिले जावे. विशेषतः ग्रामीण भागात जास्त मेहनत करण्याची गरज आहे. त्याचबरोबर सर्व राज्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान यंत्रणा, नियंत्रण कक्ष आणि कॉल सेन्टर्स अधिक सशक्त करणेही तेवढेच आवश्यक आहे. त्यामध्ये नागरीकांना रिसोर्सेसचा डेटा, त्यांची माहिती पारदर्शक पद्धतीने मिळू शकते. रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना उपचारांसाठी इथे-तिथे जावे लागत नाही.
मित्रहो,
आपल्या राज्यांमध्ये जे 332 PSA प्लांटचे वाटप केले गेले आहे, त्यापैकी 53 सुरू झाले आहेत, अशी माहिती मला मिळाली आहे. हे ऑक्सीजन प्लांट लवकरात लवकर पूर्ण करा असे माझे सर्व राज्यांना आग्रहाचे सांगणे आहे. आपण कोणताही एक वरिष्ठ अधिकारी विशेषतः या कामासाठी नियुक्त करा आणि पंधरा-वीस दिवसातच मिशन मोडवर हे काम पूर्ण करून घ्या.
मित्रहो,
मुलांच्या बाबतीतही अजून एक चिंता आहे. मुलांना संसर्गापासून वाचवण्यासाठी आपल्याकडून पूर्ण तयारी असायला हवी.
मित्रहो,
गेल्या दोन आठवड्यांपासून युरोपातील अनेक देशांमध्ये एकदम वेगाने केसेस वाढत असल्याचे आपल्याला दिसत आहे. आपण पश्चिमेकडे पाहिले तर युरोपातील देश असो वा अमेरिका, पूर्व पाहिले तर बांगलादेश, म्यानमार, इंडोनेशिया, थायलंड या देशांमध्ये रुग्ण वाढत आहेत. कुठे चौपट, कोठे आठपट तर कुठे कुठे दहापट वाढ आढळते आहे. संपूर्ण जगासाठी आणि आपल्यासाठीसुद्धा ही एक धोक्याची सूचना आहे. एक मोठा अलर्ट आहे. लोकांना वारंवार ही आठवण करून द्यायला हवी की कोरोना आपल्यामधून गेलेला नाही. आपल्याकडे बहुतांश भागात अनलॉकनंतर जे चित्र दिसत आहे त्यामुळे चिंता अधिक वाढते आहे. आता नॉर्थ ईस्टमधील सर्व सहकाऱ्यांशी बोलत असताना मी याचा उल्लेख केला. त्या दिवशीही केला होता. त्या गोष्टीचा मी पुन्हा उल्लेख करतो. आज जी राज्ये इथे आहेत त्या राज्यांमध्ये कितीतरी मोठी महानगर शहरे आहेत, भरपूर घनदाट लोकसंख्या असलेली शहरे आहेत, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीला आळा घालण्यासाठी आपल्याला सजग, सतर्क आणि कडक व्हावे लागेल. सरकारांसह इतर राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच स्थानिक सोसायटी या सर्वांना सोबत घेऊन आपल्याला लोकांना सतत जागृत करत राहणे भाग आहे. आपल्या सर्वांचे व्यापक अनुभव याबाबतीत कामी येतील असा मला विश्वास आहे. या महत्त्वाच्या बैठकीसाठी आपण सर्वांनी वेळ काढला, यासाठी आपले खूप खूप आभार आणि आपण सर्व आदरणीय मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलात त्याप्रमाणे प्रत्येक क्षणी मी उपलब्ध आहे. आपला संपर्क होतच असतो. पुढेही मी सतत उपलब्ध असेनच. आपण सर्व मिळून मानवजातीला या संकटातून बाहेर काढण्यासाठी चालवलेल्या या मोहिमेद्वारे आपण आपापल्या राज्यांचाही बचाव करू शकू. आपणा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद!
S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1736270)
Visitor Counter : 217
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam