पंतप्रधान कार्यालय

कोविड -19 परिस्थितीबाबत ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद


ईशान्येकडील राज्यांप्रती असलेल्या पंतप्रधानांच्या विशेष आस्थेचे आणि काळजीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक आणि कोविड महामारीची परिस्थिती हाताळताना वेळेवर केलेल्या कार्यवाहीबद्दल त्यांचे मानले आभार

कोविड 19 विषाणूच्या सर्व उत्परिवर्तनाचा मागोवा घेण्याकरिता कडक नजर ठेवण्यावर पंतप्रधानांनी दिला भर

योग्य खबरदारी न घेता हिल स्टेशनवर गर्दी करण्यापासून कडक ताकीद

तिसर्‍या लाटेला कसे रोखता येईल हा आपल्या मनातला मुख्य प्रश्न असला पाहिजे: पंतप्रधान

लसीकरणाविरोधातले गैरसमज दूर करण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक संस्था, ख्यातनाम व्यक्ती आणि धार्मिक श्रद्धास्थान असलेल्या संस्थांची मदत घ्या: पंतप्रधान

‘सर्वांसाठी मोफत लस’ मोहिमेत ईशान्य प्रांत महत्वाचा आहे: पंतप्रधान

नुकत्याच मंजूर झालेल्या 23,000 कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे वैद्यकीय पायाभूत सुविधा सुधारण्यास मदत होईलः पंतप्रधान

पीएम केअर्स अंतर्गतचे ऑक्सिजन प्रकल्प पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती

Posted On: 13 JUL 2021 4:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 जुलै 2021


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड -19 परिस्थितीबाबत ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या संभाषणामध्ये नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, मेघालय, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. कोविड महामारीची परिस्थिती हाताळताना वेळेवर केलेल्या कार्यवाहीबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी ईशान्येकडील राज्यांबद्दलच्या पंतप्रधानांच्या विशेष आस्थेबद्दल आणि काळजीबद्दल त्यांचे कौतुक केले. या संभाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त केंद्रीय गृह, संरक्षण, आरोग्य, ईशान्य प्रांत विकास व अन्य मंत्री उपस्थित होते.

या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यातील लसीकरणाच्या प्रगतीची माहिती दिली आणि दुर्गम भागात लसी घेण्याबाबत कोणती पावले उचलली जातात याची माहिती दिली. लस घेण्यात टाळाटाळ करण्याच्या मुद्दय़ावर आणि त्यावर मात करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत त्यांनी यावेळी   चर्चा केली. कोविड प्रकरणे अधिक चांगल्याप्रकारे हाताळण्यासाठी त्यांनी वैद्यकीय पायाभूत सुविधांमधील सुधारणांचा आणि पीएम केअर्स फंडच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पाठिंब्यासंबंधी लेखाजोखा दिला. कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यांच्या राज्यातील प्रकरणांची संख्या खाली आणण्यासाठी वेळीच कारवाई करण्याचे आश्वासन या मुख्यमंत्र्यांनी दिले.

दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी माहिती दिली मात्र यामुळे कोणीही गाफील राहून काळजी घेण्यात कसूर न करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले की, देशातील काही भागात संक्रमित रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. चाचणी, शोध, पाठपुरावा आणि लसीकरणाच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. केंद्रीय आरोग्य सचिवांनी देशातील कोविड प्रकरणांचा आढावा घेतला आणि ईशान्येकडील काही राज्यातील उच्च संक्रमण दराविषयी चर्चा केली. वैद्यकीय ऑक्सिजनच्या पुरवठ्यास चालना देण्यासाठी कोणती पावले उचलली गेली याची माहिती त्यांनी दिली तसेच लसीकरणाच्या प्रगतीचा आढावाही त्यांनी दिला.

या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी दुर्गम भूप्रदेश असूनही महामारीविरोधात लढा देताना केलेल्या कठोर परिश्रमांबद्दल तसेच चाचणी, उपचार आणि लसीकरणाच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी जनता, आरोग्य कर्मचारी आणि ईशान्येकडील सरकारांचे  कौतुक केले.

पंतप्रधानांनी काही जिल्ह्यांमधील वाढत्या संक्रमणांच्या  घटनांबाबत चिंता व्यक्त केली आणि हे संकेत समजून सूक्ष्म पातळीवर कठोर कार्यवाही करण्याची गरज व्यक्त केली. परिस्थितीशी सामना करताना सूक्ष्म प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा वापर करण्यावर त्यांनी पुन्हा भर दिला. यासंदर्भात गेल्या दीड वर्षात गाठीशी जमलेल्या अनुभवांचा आणि सर्वोत्तम पद्धतींचा पुरेपूर उपयोग करण्यास त्यांनी सांगितले.

या विषाणूचे वेगवान उत्परिवर्तन होण्याचे प्रकार लक्षात घेता पंतप्रधानांनी उत्परिवर्तनाचे काटेकोर निरीक्षण करण्याचा आणि त्याच्या विविध प्रकारांचा मागोवा ठेवण्याचा सल्ला दिला. उत्परिवर्तन आणि त्यांच्या परिणामांचा अभ्यास तज्ज्ञ करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड योग्य वर्तनावर भर देताना अशा परिस्थितीत प्रतिबंध आणि उपचार ही महत्वपूर्ण बाब असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षित शारीरिक अंतर, मास्क आणि लस यांची उपयुक्तता स्पष्ट असण्यावर त्याचप्रमाणे, चाचणी, शोध आणि उपचार करण्याचे धोरण ही एक सिद्ध रणनीती आहे यावर मोदींनी भर दिला.

पर्यटन आणि उद्योगांवर महामारीचा परिणाम झाल्याचे मान्य करीत पंतप्रधानांनी योग्य ती खबरदारी न घेता हिल स्टेशनवर गर्दी करण्याच्या विरोधात कडक इशारा दिला. तिसऱ्या लाटेच्या आगमनापूर्वी लोकांना मौजमजा करायची आहे या युक्तिवादाचे खंडन करताना ते म्हणाले की तिसरी लाट स्वबळावर येणार नाही हे समजून घेण्याची गरज आहे. ते म्हणाले की, तिसरी लाट कशी थोपवायची हा आपल्या मनातला मुख्य प्रश्न असावा. निष्काळजीपणा आणि गर्दी टाळण्यासाठी तज्ज्ञ वारंवार इशारा देत आहेत कारण यामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. टाळण्यायोग्य गर्दी रोखण्यासाठी महत्वपूर्ण सल्ला दिला.

पंतप्रधान म्हणाले की केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी मोफत लस’ या मोहिमेमध्ये ईशान्येकडील राज्ये अंतर्भूत आहेत  आणि आम्हाला लसीकरणाच्या प्रक्रियेस गती देणे आवश्यक आहे. लसीकरणाविषयीच्या  गैरसमजांना सामोरे जाण्यासाठी पंतप्रधानांनी सामाजिक, शैक्षणिक संस्था, ख्यातनाम व्यक्ती आणि धार्मिक श्रद्धास्थान असलेल्या संस्थांची मदत घेण्यास सांगितले. ज्या भागात विषाणूचा प्रसार अपेक्षित आहे अशा ठिकाणी लसीकरण मोहिमेस गती देण्यास सांगितले.

चाचणी व उपचारांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी 23,000 कोटी रुपयांच्या पॅकेजला नुकत्याच केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मंजुरीचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की हे पॅकेज ईशान्येकडील आरोग्याच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासही  मदत करेल. हे पॅकेज ईशान्येकडील चाचणी, निदान, जनुकीय क्रमनिर्धारण या प्रक्रिया वेगवान करेल. ईशान्येकडील राज्यात खाटांची संख्या, ऑक्सिजन सुविधा व बाल आरोग्य पायाभूत सुविधा लवकरच वाढवण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. पीएम केअर्सच्या माध्यमातून देशात शेकडो ऑक्सिजन प्रकल्प स्थापित केले जात आहेत आणि ईशान्य प्रांतातसुद्धा जवळपास 150 प्रकल्प उपलब्ध असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. हे प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची विनंती पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना केली.

ईशान्येकडील भौगोलिक परिस्थितीमुळे तात्पुरते रुग्णालय उभारण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. तालुका स्तरावरील रुग्णालयात पोहोचणार्‍या ऑक्सिजन प्लांट्स, आयसीयू प्रभाग, अतिदक्षता विभाग आदी नवीन यंत्रांना कुशल मनुष्यबळाची गरज असेल हे जाणून ऑक्सिजन संयंत्रांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. केंद्र सरकारकडून सर्व मदतीची ग्वाही त्यांनी दिली.

देशात दररोज 20 लाख चाचण्यांची क्षमता लक्षात घेता पंतप्रधानांनी प्राधान्याने बाधित जिल्ह्यातील चाचण्यांच्या पायाभूत सुविधा वाढवण्याची गरज अधोरेखित केली. चाचणी ऐच्छिक असली तरी ती करण्याचा आग्रह करण्यावर त्यांनी जोर दिला. सामूहिक प्रयत्नांनी आम्ही हा प्रसार नक्कीच रोखू अशी अपेक्षा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

 

 

* * *

Jaydevi PS/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1735088) Visitor Counter : 291