पंतप्रधान कार्यालय

केंद्र पुरस्कृत तंत्रज्ञान संस्थांच्या संचालकांशी पंतप्रधानांनी साधला संवाद


तंत्रज्ञानाद्वारे जलद समाधान देण्यासाठीच्या युवा संशोधकांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांकडून कौतुक

लवचिक, निर्वेध, आणि विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार शिक्षणाच्या संधी देणाऱ्या शैक्षणिक पद्धतीच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज –पंतप्रधान

आपल्या तंत्रज्ञान आणि संशोधन-विकास संस्थांची, म्हणजेच भारताच्या ‘टेकएड’ची आगामी दशकांमधील भूमिका अत्यंत महत्वाची ठरेल-: पंतप्रधान

सध्या सुरु असलेल्या संशोधन आणि विकास प्रकल्पांची, विशेषतः कोविडशी संबंधित प्रकल्पांची पंतप्रधानांना दिली माहिती

Posted On: 08 JUL 2021 4:29PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्र सरकार पुरस्कृत तंत्रज्ञान शिक्षण संस्थांच्या संचालकांशी दूरदृश्य प्रणालीच्या मध्यमातून संवाद साधला. या संवादसत्रात 100 पेक्षा अधिक संस्थांच्या प्रमुखांनी सहभाग घेतला.

कोविड मुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी या संस्थांनी केलेल्या संशोधन आणि विकास कार्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले. विशेषतः समस्यांवर त्वरित समाधान शोधण्यासाठी युवा संशोधकांनी केलेल्या परिश्रमांची त्यांनी यथोचित दखल घेतली.

बदलते वातावरण आणि येणारी आव्हाने यांचा सामना करण्यासाठी सुसंगत असे उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान शिक्षण आपण अंगीकारण्याची गरज आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यासाठी संस्थांनी स्वतःमध्ये बदल करण्याची पुनर्मूल्यांकनाची गरज आहे, तसेच, देश आणि समाजाच्या सध्याच्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन, त्यानुसार, शिक्षणाचे-अध्ययनाचे पर्यायी आणि अभिनव मॉडेल विकसित करण्याची आवश्यकता आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. आपल्या उच्च शिक्षण तसेच तंत्रशिक्षण संस्थांनी सातत्याने होत असलेले परिवर्तन आणि नवनिर्माण, तसेच बदलांचा सामना करण्यासाठी सज्ज असतील असे युवक घडवण्याचे काम करावे, हे करतांना चौथ्या औद्योगिक क्रांतीचा विचार मनात ठेवावा, असे पंतप्रधानांनी सांगितले.

आपाल्याला आता, लवचिक, निर्वेध आणि विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार, शिक्षणाच्या संधी निर्माण करून देणारी शैक्षणिक पद्धत विकसित करण्याच्या दिशेने वाटचाल करायला हवी यावर मोदी यांनी भर दिला. असे शैक्षणिक मॉडेल विकसित करतांना, शिक्षणाची उपलब्धता, माफक दर, समानता आणि गुणवत्ता ही चार मूळ मूल्ये असावीत यावर पंतप्रधानांनी भर दिला होता.

उच्च शिक्षणात गेल्या काही दिवसात, झालेल्या सकल नोंदणी गुणोत्तरात झालेल्या सुधारणेचे पंतप्रधानांनी कौतुक केले, तसेच, उच्च शिक्षणात सकल हजेरीपट (नोंदणी) गुणोत्तर आणखी वाढवण्यासाठी डिजिटलीकरणाची भूमिका महत्वाची ठरू शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. डिजिटलीकरणामुळे सर्वांना उत्तम दर्जाचे शिक्षण माफक दरात मिळू शकेल. डिजिटलीकरणाला चालना देण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांनी या माध्यमातून सुरु केलेल्या ऑनलाईन पदवी आणी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसारखे उपक्रम चालवल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.

आपल्याला भारतीय भाषांमध्येही तंत्रज्ञान शिक्षण विकसित करण्यासाठी पोषक वातावरणनिर्मिती तयार करण्याची गरज असल्याचे पंतप्राधान म्हणाले. तसंच जागतिक जर्नल्स प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरित अशी सूचना त्यांनी केली.

आत्मनिर्भर भारत अभियान, येत्या 25 वर्षात, ज्यावेळी आपण स्वातंत्र्याचा शतकमहोत्सव साजरा करत असू देशातील सर्व घटकांच्या आशा आकांक्षांची पूर्तता करणारा पाया रचण्याचे काम करेल. येत्या काही दशकात भारतात, तंत्रज्ञान आणि संशोधन विकास संस्थाची म्हणजेच भारताच्या टेकएडची भूमिका अत्यंत महत्वाची ठरेल, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

आपण शिक्षणक्षेत्रासह, आरोग्य, कृषी, संरक्षण आणि सायबर तंत्रज्ञान क्षेत्रात, भविष्यातील समस्यांचा वेध घेणारे, त्यावर तोडगा काढणारे समाधान शोधण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले.

उच्चशिक्षण संस्थामध्ये, उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा असणे अत्यंत महत्वाचे आहे, ज्यामुळे कृत्रिम बुद्धीमत्ता, स्मार्ट उपकरणे, एकत्रित चालणाऱ्या रीएलीटी सिस्टीम आणि डिजिटल साधने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकतील, असे पंतप्रधान म्हणाले. आपण स्वस्त, व्यक्तीसापेक्ष आणि कृत्रिम बुद्धीमत्ता प्रणित शिक्षणावर भर द्यायला हवा, असे पंतप्रधान म्हणाले.

यावेळी झालेल्या चर्चेत, आयआयएससी बेंगळूरु  चे प्रा गोवर्धन रंगराजन, आयआयटी मुंबईचे सुभासीस चौधरी, आयआयटी मद्रास चे प्रा, भास्कर राममूर्ती, आणि आयआयटी कानपूरचे प्रा अभय करंदीकर यांनी पंतप्रधानांसमोर सादरीकरण केले आणि त्यांच्या संस्थेत सुरु असलेले विविध प्रकल्प, नवनवीन संशोधन तसेच शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. कोविडशी संबंधित संशोधनांविषयी, ज्यात, चाचण्यांसाठी नवे तंत्रज्ञान,ऑक्सिजन निर्मिती, कॅन्सर सेल थेरेपी, फिरती रूग्णालाये, हॉटस्पॉटचा अंदाज देणारी उपकरणे, व्हेंटीलेटर्स निर्मिती विकसित करण्याचाविषयीच्या उपक्रमांची त्यांना माहिती देण्यात आली. रोबोटिक्स, ड्रोन, ऑनलाईन शिक्षण, बॅटरी तंत्रज्ञान, अशा क्षेत्रात सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांना देण्यात आली. पंतप्रधानांना नव्या शैक्षणिक अभ्यासक्रमांची, विशेषत: ऑनलाइन अभ्यासक्रमांची देखील माहिती देण्यात आली. विशेषतः अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाच्या बदलत्या स्वरूपानुसार, विकसित केलेले अभ्यासक्रम त्यांना सांगण्यात आले.

केंद्रीय शिक्षण मंत्री आणि शिक्षणराज्यमंत्री देखील या चर्चासत्रात उपस्थित होते.

***

S.Tupe/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1733714) Visitor Counter : 337