गृह मंत्रालय

केंद्रीय गृह सचिवांनी ईशान्येकडील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा घेतला आढावा

Posted On: 07 JUL 2021 7:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 जुलै 2021

 

केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत देशाच्या ईशान्य भागातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

सर्व केंद्रशासित प्रदेश आणि ईशान्येकडील सर्व राज्यांमध्ये कोविड संसर्गाबाबत सक्रीय रुग्णांची  सद्यस्थिती आणि एकूण कल, कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर, रुग्णांचा पॉझिटीव्हिटी दर आणि लसीकरणाची स्थिती या मुद्द्यांसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. देशातील रुग्ण पॉझिटीव्हिटी दर 10% हून अधिक असलेल्या 73 जिल्ह्यांपैकी 46 जिल्हे ईशान्य प्रदेशात आहेत आणि तेथे विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे याची देखील नोंद घेण्यात आली.         

केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने 29 जून 2021 रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटल्यानुसार चाचण्या- संपर्कात आलेल्यांचा शोध-उपचार-लसीकरण आणि कोविड योग्य वर्तणुकीचे पालन या पाच कलमी धोरणाचे पालन करण्यावर केंद्रीय गृह सचिवांनी जोर दिला. ईशान्येकडील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाने जिल्हा आणि शहर पातळीवर परिस्थितीचे कठोर परीक्षण करावे आणि ज्या भागात रुग्णसंख्येत अचानक वाढ होण्याची चिन्हे दिसतील तेथे वेळेवर सुधारात्मक उपाययोजना कराव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण पॉझिटीव्हिटी दर जास्त आहे आणि रुग्णालयात अधिक प्रमाणात रुग्ण दाखल आहेत अशा जिल्ह्यांमध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाने टप्प्याटप्प्यांच्या स्वरुपात निर्बंध घालण्याचा विचार करावा. या बैठकीत कोविड-योग्य वर्तणुकीच्या पालनाची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा पुनरुच्चार करण्यात आला आणि यासाठी राजकीय नेते आणि सामाजिक संस्थाना या कामात सहभागी करून घेण्याचा सल्ला देण्यात आला.

ईशान्येकडील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, आरोग्य विभागाचे मुख्य सचिव उपस्थित होते. नीती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक आणि केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाचे तसेच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते.


* * *

M.Chopade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1733462) Visitor Counter : 236