माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारताने, आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी सुरु केले सुविधा कार्यालय; एकाच ठिकाणी मिळणार सर्व परवानग्या : श्री प्रकाश जावडेकर
74 व्या कान्स चित्रपट महोत्सवात आभासी भारतीय विभागाचे माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी केले उद्घाटन
Posted On:
06 JUL 2021 6:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जुलै 2021
महामारीतून जग लवकरच बाहेर येईल आणि लोकांची पावले पुन्हा चित्रपटगृहाकडे वळतील अशी आशा माहिती आणि प्रसारण मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली. ते आज 74 व्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. 74 व्या कान्स चित्रपट महोत्सवात आभासी भारतीय विभागाचे त्यांनी उद्घाटन केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारने फिक्कीच्या सहकार्याने याचे आयोजन केले आहे. यंदा दुसऱ्या वर्षी अशा आभासी विभागाचे आयोजन केले गेले. मात्र या उद्योगात सर्वात महत्वाचे आहे सर्जनशीलता, प्रतिभा, तंत्रज्ञान आणि यातील सर्वोत्तम भारत प्रदान करतो असे जावडेकर म्हणाले. आभासी भारतीय विभाग अर्थात व्हर्चुअल इंडीया पॅव्हिलियन, भविष्यातील सिनेविश्वावर चर्चा करण्याचे, त्यासाठी एकत्र येण्याचे हक्काचे ठिकाण बनू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतातील 500 हून अधिक ठिकाणी आंतरराष्ट्रीय सिनेमांचे चित्रीकरण होत असल्याचे त्यांनी सांगितले.आतंरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांना भारताकडे आकर्षित करण्यासाठी भारत सरकारने अनेक पावले उचलली आहेत. “ एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळतील असे सुविधा कार्यालय आता आम्ही सुरु केले आहे” असे त्यांनी सांगितले. हॉलीवूडच्या अनेक चित्रपटांचे व्हीएफएक्स अॅनिमेशन भारतात होते, जगभरातील सिनेमांमधील भारताचे योगदान सातत्याने वाढत असल्याचेही श्री जावडेकर म्हणाले.
“कान्स चित्रपट महोत्सव हा सर्जनशीलतेचा, प्रतिभेचा महोत्सव आहेच, त्याबरोबरीने एक व्यवसायाचेही ठिकाण आहे. कान्स चित्रपट महोत्सव ही बाजारपेठ जगभरातील चित्रपट निर्मात्यांना मोठी संधी उपलब्ध करते. या महामारी नंतर चित्रपट चांगला व्यवसाय करतील आणि अनेक चित्रपटांचे ओटीटी व्यासपीठासाठी चित्रीकरण झाल्याचे ते म्हणाले.
कान्स चित्रपट महोत्सव जगासाठी भारतीय सिनेमाचे द्वार असल्याचे भारताचे फ्रान्स आणि मोनॅकोचे राजदूत श्री जावेद अश्रफ यांनी सांगितले. कोविडच्या व्यत्यय आणि त्यामुळे विलगीकरणात पडावे लागल्यानंतर जागतिक सिनेसृष्टीशी पुन्हा जोडले जाण्याची संधी हा महोत्सव देईल असेही ते म्हणाले. “अंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणे आणि ओटीटी माध्यमाचा स्थानिक चित्रपट उद्योगावर असलेल्या प्रभावाचा दाखला देत भारत चित्रीकरणासाठी उत्तम ठिकाण आहे याचा प्रचार करण्याकरता ही चांगली संधी आहे. भारतीय सिनेमा आपल्या विविधता, वारसा, खुलेपणा यांचा आरसा आहे. स्वतंत्र देश म्हणून आपला प्रवास भारतीय सिनेमाने उत्तमरित्या सादर केला आहे असे ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे म्हणाले की भारत चित्रपट बनवणाऱ्या सर्वात मोठ्या निर्मात्यांपैकी एक आहे. ते म्हणाले, “महामारीमुळे उदभवलेल्या आव्हानांचा सामना करत असूनही आपण इंडिया पॅव्हेलियनमध्ये चित्रपट निर्मितीतील प्रगतीबरोबरच आपला सांस्कृतिक आणि चित्रपटविषयक वारसाही दाखवत आहोत. यावर्षी सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या उत्सवाबरोबरच भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या उत्सवाची सुरुवात असल्याचेही ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर यांनी सांगितले की महामारीच्या काळात सिनेमाने आपल्याला एकत्र जोडून ठेवले आहे. हा महोत्सव आपल्याला सिनेमातील सर्वोत्कृष्ट पाहण्याची अफाट संधी देतो आणि भारतीय चित्रपट निर्मात्यांना उत्तम प्रतिभा आणि आशय जगभरात सामायिक करण्याची संधीही देतो .
लेखक, कवी आणि सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी म्हणाले की, चित्रपट दिग्दर्शकांसह भारतीय सिनेमा आज प्रादेशिक सिनेमावर लक्ष केंद्रित करून योग्य दिशेने जात आहे. “आज भारतीय प्रेक्षक अधिक सक्रिय रसिक झाले आहेत आणि महामारीने सिनेमाच्या जगाचा शोध घेण्याला अधिक गती दिली आहे. भारतीय चित्रपटात एक मंथन सुरु आहे, ”असे ते पुढे म्हणाले.
चित्रपट निर्माते आणि शिक्षणतज्ज्ञ; मुक्ता आर्ट्स लिमिटेडचे अध्यक्ष सुभाष घई म्हणाले की सिनेमा हे भारतीय लोकांचे पहिले प्रेम आहे, कारण चित्रपट मनोरंजन करतो, प्रबोधन करतो, आणि म्हणूनच तो आपल्या जीवनाचा भाग प्रतिबिंबित करतो. . “कान्स चित्रपट महोत्सव हे आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी एक उत्तम केंद्र आहे. भारतातील तरुण लोक करिअर म्हणून मोठ्या उत्साहाने सिनेमाची निवड करत आहेत आणि नवीन कल्पना घेऊन येत आहेत जे खूप प्रोत्साहनदायक आहे, ” असे ते पुढे म्हणाले.
बालाजी टेलिफिल्म्सच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक एकता कपूर म्हणाल्या की भारत एक आशय निर्मिती करणारे राष्ट्र म्हणून ओळखले जातो. आणि भारतीय चित्रपटाच्या कथेत आपल्याकडे स्थानिक स्वाद आहे. “भारतीय आशय हे नेहमीच भारताचे सॉफ्ट अॅम्बेसेडर राहिले आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याबाबत बरेच आकर्षण आहे. सहकार्य कोणत्याही कंपनीसाठी पुढे जाण्याचा मार्ग आहे आणि भारतात अनेक संधी आहेत, ”असे त्यांनी सांगितले.
उदय सिंग, सह-अध्यक्ष, फिक्की चित्रपट मंच आणि एमडी, एमपीए-इंडिया यांनी या कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.
M.Chopade/S.Kane/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1733166)
Visitor Counter : 430
Read this release in:
Tamil
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada