पंतप्रधान कार्यालय

जम्मू आणि काश्मीरच्या राजकीय पक्षांबरोबर मा.पंतप्रधानांच्या नेतृत्वात बैठक झाल्यानंतर राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांनी केलेल्या निवेदनाचा मराठी अनुवाद

Posted On: 24 JUN 2021 9:56PM by PIB Mumbai

जम्मू आणि काश्मीरच्या राजकीय पक्षांबरोबर मा.पंतप्रधानांच्या नेतृत्वात झालेल्या चर्चेचा नुकताच समारोप झाला. जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकशाहीचे बळकटीकरण आणि विकास होण्याच्या दिशेने हा अतिशय सकारात्मक प्रयत्न आहे. अतिशय खेळीमेळीच्या व स्नेहपूर्ण वातावरणात ही बैठक संपन्न झाली. भारताच्या लोकशाहीप्रती आणि भारताच्या संविधानाप्रती सर्वच पक्षांनी पूर्ण निष्ठा आणि पाठिंबा व्यक्त केला.

गृहमंत्री महोदयांनी सर्व नेत्यांना जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीतील सुधारणांची माहिती दिली.

मा.पंतप्रधानांनी प्रत्येक पक्षाची मते व सूचना अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतली. सर्व लोकप्रतिनिधींनी मोकळ्या मनाने आपापला दृष्टिकोन मांडल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. पंतप्रधानांनी या बैठकीदरम्यान दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला. जम्मू आणि काश्मीरमध्ये तळागाळापर्यंत लोकशाही पोहोचविण्यासाठी आपण साऱ्यांनी मिळून काम केले पाहिजे. दुसरे म्हणजे, जम्मू आणि काश्मीरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि तेथील प्रत्येक प्रदेशापर्यंत, प्रत्येक समुदायापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. यासाठी सहकार्याचे आणि जनसहभागाचे वातावरण असणे अत्यंत गरजेचे आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये पंचायती राज्य व्यवस्थेसाठी आणि अन्य स्थानिक संस्थांसाठीच्या निवडणुका अतिशय यशस्वी झाल्याचेही मा. पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केले. सुरक्षा स्थितीतही सुधारणा झाली आहे. निवडणुका संपल्यावर सुमारे 12,000 कोटी रुपये थेट पंचायतींपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे खेड्यांमध्ये विकासाची गती वाढली आहे.

पंतप्रधान म्हणाले, "आता जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रियेतील पुढचे महत्त्वाचे पाऊल आपण उचलले पाहिजे, ते म्हणजे विधानसभा निवडणुका. प्रत्येक प्रदेशाला आणि प्रत्येक समाजघटकाला विधानसभेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळेल अशा बेताने, मतदारसंघांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया वेगाने पार पडली पाहिजे."तसेच, दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना उचित प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

मतदारसंघांच्या पुनर्रचनेत प्रत्येकाचा सहभाग मिळण्यावरही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या प्रक्रियेत सहभागी होण्यास उपस्थित सर्व पक्षांनी मान्यता दिली आहे.

जम्मू-काश्मीरला शांतता आणि प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करता येण्यासाठी सर्व भागीदारांचे सहकार्य आवश्यक असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. जम्मू आणि काश्मीर आता हिंसेच्या दुष्टचक्रातून बाहेर पडून स्थैर्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जम्मू-काश्मीरच्या जनतेमध्ये नवी आशा आणि नवा आत्मविश्वास उदयाला आला आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

"हा विश्वास बळकट करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून अहोरात्र काम केले पाहिजे", अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. जम्मू-काश्मीरच्या लोकशाहीचे सशक्तीकरण आणि जम्मू-काश्मीरची प्रगती आणि समृद्धी यासाठी, आजची बैठक हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. आजच्या या बैठकीत सहभागी झाल्याबद्दल मी सर्व राजकीय पक्षांचे आभार मानतो.

धन्यवाद !

 



अस्वीकरण/स्पष्टीकरण- हा स्थूल अनुवाद आहे. मूळ निवेदन हिंदीमध्ये करण्यात आले होते.

***

ST/JW/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1730254) Visitor Counter : 157