आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 लसीकरण : मिथके विरुद्ध वस्तुस्थिती
लसींचे वितरण पारदर्शकपणे केले जात असून त्यासाठी राज्याची लोकसंख्या, रुग्णसंख्या, राज्याची उपयोजन क्षमता व नासाडीचे प्रमाण या घटकांचा आधार घेतला जातो
Posted On:
24 JUN 2021 3:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जून 2021
भारताच्या राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमाला वैज्ञानिक आणि साथरोगविषयक पुराव्यांचा आधार असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचना व जगभरातील सर्वोत्तम कृतीसंच हे त्याच्या मुळाशी आहेत. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या तसेच जनतेच्या प्रभावी व कार्यक्षम सहभागानिशी यथासांग पद्धतशीर नियोजन करून या विराट कार्यक्रमाची अंमलबजावणी होत आहे.
मात्र, राज्यांना केले जाणारे कोविड-19 प्रतिबंधक लसींचे वितरण पारदर्शक नसल्याचा आरोप काही प्रसारमाध्यमांकडून केला जात आहे. या आरोपांना कोणताही ठोस आधार नसून, ते अपुऱ्या माहितीच्या आधारे केले जाणारे बिनबुडाचे आरोप आहेत.
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 लसींचे वितरण भारत सरकारकडून पारदर्शक पद्धतीनेच होत असल्याचे येथे स्पष्ट करण्यात येत आहे. भारत सरकारकडून होत असलेला लसींचा पुरवठा, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून होणारे लसींचे उपयोजन, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे शिलकी असलेल्या आणि वापरल्या न गेलेल्या लसींचे प्रमाण आणि आगामी पुरवठा या सगळ्याबद्दलची माहिती, पत्र सूचना कार्यालयामार्फत प्रसिद्धिपत्रकांच्या माध्यमातून नियमितपणे प्रसारित केली जाते. तसेच काही अन्य माध्यमातूनही ही माहिती प्रसिद्ध केली जाते.
कोविड-19 लसींचे वितरण पुढील विशिष्ट मापदंडांनुसार केले जाते :
- राज्याची लोकसंख्या
- रुग्णसंख्या/आजाराचा राज्यावरील भार
- राज्याची उपयोजन क्षमता
लसींच्या नासाडीचा वितरणावर विपरीत परिणाम होतो.
* * *
S.Tupe/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1730019)
Visitor Counter : 261