विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

देशाच्या विविध जिल्ह्यात 850 ऑक्सिजन सयंत्रे उभारण्यात येत असल्याची संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या सचिवांची माहिती

Posted On: 14 JUN 2021 5:28PM by PIB Mumbai

 

कोविड-19 विरोधातल्या लढ्यात देशाच्या ऑक्सिजनबाबतच्या आवश्यकता पूर्ण करण्याच्या दृष्टीने, देशाच्या विविध जिल्ह्यात, पीएम केअर्स निधीतून  850 ऑक्सिजन सयंत्रे उभारण्यात येत असल्याची माहिती,डीआरडीओ अर्थात  संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे सचिव  डॉ सी सतीश रेड्डी यांनी दिली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या  आझादी का अमृत महोत्सवव्याख्यानमालेत ते बोलत होते.

आवश्यकता भासेल तेव्हा सर्व प्रकारचे सहाय्य करण्यासाठी डीआरडीओ सज्ज असल्याचे सांगून डीआरडीओनेकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांच्या मदतीसाठी पुरवलेल्या फिरत्या  रुग्णालयाप्रमाणे आणखी रुग्णालये सज्ज राहतील असेही त्यांनी सांगितले.

अनेक शहरात कोविड-19 समर्पित तात्पुरती रुग्णालये उभारण्यात आली.  जोडता येणारे सुटे भाग असणाऱ्या या रुग्णालयांना फिरती रुग्णालये संबोधण्यात  येत असून विषाणू या रुग्णालयाबाहेर जाणार नाही अशी त्यांची रचना असल्याचे ते म्हणाले. जर तिसरी लाट आली तर सर्व रुग्णालये रुग्णभार पेलतील आणि या दृष्टीने केंद्र सरकार संबंधीत विविध घटकांशी चर्चा करत आहे, असे डॉ रेड्डी यांनी सांगितले.

संरक्षण क्षेत्रात, डीआरडीओ, प्रामुख्याने प्रगत तंत्रज्ञानात  संशोधन करण्याबरोबरच जनतेला उपयुक्त ठरणारे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर  किफायतशीर किमतीतले उच्च दर्जाचे तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा यांनी केंद्र सरकार आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने महामारीविरोधातल्या लढ्यासाठी उचलेल्या पावलांची माहिती दिली. त्याचबरोबर लसी सुरक्षित ठेवण्याबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यात पोचण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांची माहिती दिली. महामारीविरोधातल्या लढ्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता महत्वाची भूमिका कशी बजावू शकते याबाबतही त्यांनी विवेचन केले.

देशाच्या कानाकोपऱ्यात लस पोचवण्यासाठी आणि लसीची साठवण करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केल्याचे त्यांनी सांगितले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पन्नास वर्षांचा प्रवास उलगडताना हा प्रवास प्रदीर्घ राहिल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या प्रगती आणि विकासासाठी युवकांच्या प्रतिभेची जोपासना आणि सहाय्य करण्याच्या दृष्टीने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे स्थान विकसित करण्यात आल्याचे ते म्हणाले. 

***

Jaydevi PS/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1726998) Visitor Counter : 225