आयुष मंत्रालय

आंतरराष्ट्रीय योगदिन 2021 च्या उत्सवानिमित्त शुभारंभाच्या कार्यक्रमांचे आयोजन


‘नमस्ते योगा’ॲपचेही उद्‌घाटन

Posted On: 12 JUN 2021 2:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2021

 

येत्या 21 जून ला साजऱ्या होणाऱ्या सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक विशेष ऑनलाईन कार्यक्रम शुक्रवारी  रात्री आयोजित करण्यात आला होता. या कर्टन रेझर कार्यक्रमानिमित्त अनेक नामवंत योग गुरु आणि योग अभ्यासकांसह दोन केंद्रीय मंत्रीदेखील या ऑनलाईन व्यासपीठावर एकत्र आले होते. आपल्या वैयक्तिक हितासाठी तसेच मानवतेच्या कल्याणासाठी जागतिक समुदायाने योगाभ्यासाचा अवलंब करावा, असे आवाहन या सर्व मान्यवरांनी केले. यावेळी योगाला समर्पित अशा ‘नमस्ते योगा’ या ॲपचेही उद्‌घाटन करण्यात आले.

आयुष मंत्रालयाने, मोरारजी देसाई राष्ट्रीय योगसंस्थेच्या सहकार्याने हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि आयुष विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री किरेन रीजीजू यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यंदाच्या योगदिनाची संकल्पना, घरी रहा, योगाभ्यास करा’ अशी असल्याचे सांगत त्याचे महत्व दोन्ही नेत्यांनी विशद केले. तर, कार्यक्रमात उपस्थित असलेले जागतिक कीर्तीचे आध्यात्मिक गुरु आणि योगगुरु, श्री श्री रविशंकर, सद्गुरू जग्गी वासुदेव, ब्रह्मकुमारी सिस्टर शिवानी आणि स्वामी चिदानंद सरस्वती यांनी योगाच्या विविध वैशिष्ट्यांची माहिती दिली. यात दैनंदिन योगाभ्यासासोबतच, योगाचे सखोल आध्यात्मिक पैलू आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी योगाभ्यासाची मदत याविषयीही त्यांनी माहिती दिली. याशिवाय इतर अनेक मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या वेळी बोलतांना प्रकाश जावडेकर म्हणाले की, योग हा निरोगी आणि आनंदी आयुष्याचा मार्ग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, केंद्र सरकार, समाजाच्या सर्व क्षेत्रात योगाभ्यासाचा प्रसार करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दूरदर्शनवर एक विशेष 10 दिवसांची मालिका चालवली जाणार आहे, अशी माहिती आयुष मंत्री किरेन रीजीजू यांनी दिली. या मालिकेचा मध्यवर्ती संदेश ‘घरी रहा, योगाभ्यास करा’ हा आहे. सध्याच्या कोविड काळाच्या संदर्भाने हा संदेश महत्वाचा असल्याचे ते म्हणाले. आरोग्य सुविधा आणि व्यवस्थापन, तसेच, आजार प्रतिबंधनासाठी योगाचे महत्व आज सर्वांनाच जाणवले आहे, असे रीजीजू यावेळी म्हणाले.

या शुभारंभाच्या कार्यक्रमात दूरदर्शनवर आज, म्हणजेच 12 जूनपासून 21 जूनपर्यंत रोज संध्याकाळी सात वाजता दाखवल्या जाणाऱ्या योगविषयक कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.

 

S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1726511) Visitor Counter : 188