रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रांसाठीचे नियम केले जारी


नवे नियम 1 जुलै 2021 पासून लागू होतील

Posted On: 11 JUN 2021 3:43PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रांसाठी अनिवार्य असलेले नवे नियम जारी केले आहेत. हे नियम 1 जुलै 2021 पासून लागू होणार आहेत. अशा चालक प्रशिक्षण केंद्रांमध्ये नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना योग्य प्रशिक्षण आणि माहिती देण्यासाठी याची मोठी मदत होईल. मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रांसाठीचे महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:-

1.     उमेदवारांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी हे केंद्र सर्व आवश्यक प्रतिरूपे आणि समर्पित चालन चाचणी मार्ग यांनी सज्जित असणे आवश्यक आहे.

2.     मोटार वाहन कायदा,1988 मधील नियमानुसार या केंद्रांमध्ये दोषनिवारक आणि उजळणी अभ्यासक्रम यांचे प्रशिक्षण घेता येऊ शकेल.

3.     या केंद्रांमधील चाचणीत यशस्वीपणे उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना, वाहन चालविण्याचा परवाना मिळविताना सध्या प्रादेशिक वाहतूक कार्यालयात (RTO) घेतल्या जाणाऱ्या वाहन चालविण्याच्या चाचणी परीक्षेतून सूट दिली जाईल. त्यामुळे अशा  मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रांमधून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या चालकांना  वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यात मदत होईल.

4.     या केंद्रांना उद्योग-विशिष्ट विशेष प्रशिक्षण देण्याची देखील परवानगी देण्यात आली आहे.

कुशल चालकांची टंचाई भारतीय रस्तेमार्ग क्षेत्राला भेडसावणाऱ्या अनेक मोठ्या समस्यांपैकी एक आहे आणि रस्तेविषयक नियमांचे योग्य ज्ञान नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रस्ते अपघात होत आहेत. सुधारित मोटार वाहन कायदा, 2019 च्या 8 व्या विभागातील तरतुद केंद्र सरकारला चालक प्रशिक्षण केंद्रांच्या मान्यतेबाबत नियम तयार करण्याची क्षमता प्रदान करते.

***

Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1726236) Visitor Counter : 357