अल्पसंख्यांक मंत्रालय

अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडून हजच्या तयारीचा आणि लसीकरणाच्या स्थितीचा आढावा


लसीकरणाबाबतच्या अफवांचे खंडन करण्यासाठी आणि साशंकता दूर करण्यासाठी जागरुकता मोहीम सुरू करणारः नक्वी

राज्य हज समित्या, वक्फ बोर्ड, केंद्रीय वक्फ परिषद, मौलाना आझाद शिक्षण मंच, महिला बचतगट यांना मोहिमेत सहभागी करणार

Posted On: 10 JUN 2021 5:54PM by PIB Mumbai

मुंबई, 10 जून 2021

 

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मुंबईत हज हाऊसमध्ये हज 2021च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. जरी आम्ही आमची सर्व तयारी केली असली तरी भारत सरकार सौदी अरेबिया सरकारच्या निर्णयानुसार कार्यवाही करेल, असे नक्वी यांनी यावेळी स्पष्ट केले. काही देश त्यांच्या नागरिकांना हज 2021 साठी पाठवू शकत नाहीत, मात्र आम्ही सौदी अरेबिया सरकारच्या सोबत ठामपणे उभे आहोत आणि सौदी अरेबिया सरकार जो निर्णय घेईल त्या निर्णयानुसार पुढचे पाऊल उचलू असे त्यांनी सांगितले. आमच्या नागरिकांचे आरोग्य आणि कल्याण यांना आमचे प्राधान्य आहे आणि मानवतेला देखील आहे, असे नक्वी या बैठकीनंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत म्हणाले.

भारतात सुरू असलेल्या लसीकरणाबद्दल लोकांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या अफवांचे खंडन करण्यासाठी आणि लसीकरणाबाबत असलेली साशंकतेची भावना दूर करण्यासाठी एक देशव्यापी मोहीम सुरू करण्यात येईल आणि त्यामध्ये विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांना सहभागी करून घेण्यात येईल, अशी माहिती नक्वी यांनी दिली. राज्यांच्या हज समित्या, वक्फ बोर्ड, त्यांच्याशी संबंधित संघटना, केंद्रीय वक्फ परिषद, मौलाना आझाद शिक्षण मंच आणि इतर सामाजिक आणि शैक्षणिक संस्था या मोहिमेचा भाग असतील, असे नक्वी म्हणाले.

महिला बचत गटांनाही या मोहिमेत सहभागी केले जाईल,  असे त्यांनी सांगितले. कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी या संघटना आणि महिला बचत गट लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन देतील आणि त्यांना लसी घेण्यासाठी प्रवृत्त करतील. “ जान है तो जहान है”  असे या मोहिमेचे नाव असेल आणि ही मोहीम विशेषत्वाने गावांमध्ये आणि देशाच्या दुर्गम भागात सुरू केली जाईल.

यावेळी त्यांनी काही गावांना भेटी दिल्यावर आलेल्या अनुभवांची माहिती दिली. जागरुकतेच्या अभावामुळे लोकांमध्ये लसीकरण करून घेण्याबाबत साशंकतेची भावना आहे. दुर्दैवाने काही संकुचित मनोवृत्तीचे घटक लोकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रम आणि भीती निर्माण करत आहेत. ते केवळ लोकांचे आरोग्य  आणि कल्याण याचे शूत्र नाहीत तर ते देशाचे देखील शत्रू आहेत, अशा शब्दात नक्वी यांनी अशा प्रवृत्तींबाबत नाराजी व्यक्त केली.

अशा गोष्टी एखाद्या राज्यात असोत किंवा आणखी इतर राज्यात असोत, सरकार हे लोकांचे असते, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. सर्व प्रकारचे संभ्रम आणि भीती दूर करणे आणि आपले स्वतःचे लसीकरण करून घेणे आणि इतरांना देखील त्यासाठी प्रोत्साहित करणे ही आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे, याकडे नक्वी यांनी लक्ष वेधले.

देशात लसींचा किंवा इतर कोणत्याही अत्यावश्यक सामग्रीचा तुटवडा नसेल अशी हमी त्यांनी दिली. यापूर्वीच 24.3 कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे, असे ते म्हणाले. अनेक प्रगत देशांच्या तुलनेत आपल्याकडील वैद्यकीय सुविधांची संख्या अपुरी असली तरी आम्ही आमच्याकडच्या ऑक्सिजन, व्हेन्टीलेटर्स आणि इतर अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची क्षमता वाढवली. अशी माहिती त्यांनी दिली.

हज 2021साठी देशात सुरु असलेल्या तयारीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की भारतीय हज समितीने दिलेल्या निर्देशांच्या आणि सौदी अरेबियाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक नियमांच्या आधारे लसीकरणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.

दरवर्षी मक्केच्या पवित्र शहरात 25 लाखांपेक्षा जास्त लोक हज यात्रा करतात. गेल्या वर्षी कोविड-19 महामारीमुळे सौदी अरेबिया सरकारने त्याच देशात राहणाऱ्या विविध देशांच्या नागरिकांपुरतेच “ मर्यादित हज” चे आयोजन करण्याची घोषणा केली होती. भारताचे सौदी अरेबियामधील राजदूत डॉ. औसाफ सईद, जेद्दाहमधील भारताचे कौन्स्युल जनरल शाहीद आलम आणि केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. भारतीय हज समितीचे सीईओ एम ए खान आणि इतर अधिकारी देखील उपस्थित होते.


* * *

M.Chopade/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1725999) Visitor Counter : 175