गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
प्रधानमंत्री आवास योजना – शहरी अंतर्गत 3.61 लाख घरे बांधण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी
राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांची कामगिरी जाणण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना – शहरी –पुरस्कार 2021 – शंभर दिवसांचे आव्हान’ याचा प्रारंभ
Posted On:
09 JUN 2021 11:57AM by PIB Mumbai
‘जागतिक गृहनिर्माण तंत्रज्ञान आव्हान- भारत’ अंतर्गत सुचीमध्ये समाविष्ट असलेले टेक्नोग्रहीवरचे ई मोड्यूल जारी
प्रधानमंत्री आवास योजना – शहरी अंतर्गत 3.61 लाख घरे बांधण्यासाठीच्या 708 प्रस्तावाना, केंद्र सरकारने 8 जून 2021 ला मंजुरी दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजना – शहरीच्या, सीएसएमसी अर्थात केंद्रीय मंजुरी आणि देखरेख समितीच्या नवी दिल्लीत झालेल्या 54 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 13 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
आवास योजना – शहरी –पुरस्कार 2021 – शंभर दिवसांचे आव्हान’ याचाही गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी प्रारंभ केला. राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि नागरी स्थानिक संस्थांची उत्तम कामगिरी आणि योगदान यांची प्रशंसा करण्यासाठी आणि लाभार्थींना अभियानाची यशस्वी अंमल बजावणी आणि निकोप स्पर्धा निर्माण करण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात.
कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेतली सीएसएमसीची ही पहिली बैठक होती.सर्वांसाठी घर या अंतर्गत 2022 पर्यंत भारतातल्या शहरी भागातल्या सर्व पात्र लाभार्थींना पक्के घर पुरवण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला सरकार देत असलेले महत्व यातून प्रतिबिंबित होते.
सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये मंजुरीची मागणी पूर्ण झाली आहे. वापर झालेला नाही अशा निधीचा उपयोग आणि दिलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण होईल याची खातरजमा करणे यावर प्रामुख्याने भर राहील असे दुर्गा शंकर मिश्रा यांनी बैठकीत सांगितले.
विविध कारणानी प्रकल्पात सुधारणा करण्याचे प्रस्ताव राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी दिले आहेत.
यासह आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजना – शहरी अंतर्गत 112.4 लाख घरे बांधण्यासाठीच्या प्रस्तावाना मंजुरी देण्यात आली असून 82.5 लाख निर्माणाधीन तर 48.31लाख घरे पूर्ण झाली किंवा हस्तांतरित करण्यात आली आहेत. आवास योजना – शहरी अंतर्गत 7.35 लाख कोटी रुपयांची एकूण गुंतवणूक करण्यात आली असून केंद्रीय सहाय्य 1.81 लाख कोटी रुपयांचे असून त्यापैकी 96,067 कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला आहे.
जागतिक गृहनिर्माण तंत्रज्ञान आव्हान- भारत’ अंतर्गत सुचीमध्ये समाविष्ट असलेले टेक्नोग्रहीवरचे ई मोड्यूल यावेळी जारी करण्यात आले. या मोड्यूलमध्ये कल्पक बांधकाम तंत्रज्ञानावरच्या लर्निंग टूल्सचा समावेश आहे. कल्पक बांधकाम तंत्रज्ञान क्षेत्रात संबंधितांची क्षमता वृद्धी करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे.
हरियाणातल्या पंचकुला इथे नव्याने बांधण्यात आलेल्या पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्घाटन सचिवानी केले.नोकरदार महिलांच्या वसतीगृहासाठी भाडे तत्वाने याचा उपयोग केला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना – शहरी अंतर्गत तंत्रज्ञान उप अभियानांतर्गत 6 पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण झाले असून देशाच्या विविध भागात 7 प्रकल्प बांधण्यात येत आहेत.
***
Jaydevi PS/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1725574)
Visitor Counter : 297