पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान यांनी देशाला 201 सीएनजी प्रकल्प समर्पित केले आणि झाशीत पीएनजी पुरवठ्याचा प्रारंभ केला.
एमआरयूद्वारे सीएनजी वितरणाचे उद्घाटन;
फिरता ऊर्जा इंधन पुरवठा हे भारतातील भविष्य -केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन
Posted On:
08 JUN 2021 6:32PM by PIB Mumbai
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज देशभरातील गेल समूहाची 201 सीएनजी स्थानके देशाला समर्पित केली. प्रधान यांनी झाशीत पीएनजी अर्थात पाईप्ड नॅचरल गॅस पुरवठ्याचा प्रारंभ केला तर रायगड येथे वाहनांना इंधन भरण्यासाठी मोबाइल रिफिलिंग युनिट्स (एमआरयू) अर्थात फिरत्या इंधन पुरवठा युनिटचे उद्घाटन केले.
धर्मेंद्र प्रधान यांनी झाशीतील पीएनजी ग्राहक कुटूंबियांशी संवाद साधला . घरात पीएनजीचा अखंडित व स्वस्त पुरवठा केल्याबद्दल या कुटुंबीयांनी संतोष व्यक्त केला. प्रधान यांनी रायगड आणि दिल्लीतील एमआरयू ऑपरेटरांशी संवाद साधला आणि मोबाईल रिफिलिंग युनिट (एमआरयू) च्या माध्यमातून वाहनांमध्ये सीएनजी भरल्याचे पाहिले. आज उद्घाटन झालेले एमआरयू आयजीएल आणि महानगर गॅस लिमिटेडचे आहेत.
आतापर्यंत सीएनजी स्थानके आणि पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) सारख्या सुविधा महानगरांपुरत्या सीमित होत्या मात्र सरकारच्या प्रयत्नातून त्या आता देशभरातील शहरे व गावात पोहोचल्या आहेत असे यावेळी प्रधान यांनी सांगितले. मंत्री महोदय म्हणाले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हवामान बदल कमी करण्याच्या कारणासाठी वचनबद्ध आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांनी जगाला नेतृत्व दिले असून जगात भारताचे स्थान उंचावले आहे. नागरिकांचे जीवनमान सुलभ करण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांविषयीही त्यांनी माहिती दिली आणि म्हणाले की, आजचे उद्घाटन म्हणजे हरित भविष्य आणि लोकांचे राहणीमान अधिक सुलभ करण्याच्या दुहेरी उद्दिष्टांच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.
इंधन विक्रीचे भवितव्य हे फिरते असल्याचे प्रतिपादन करून त्यांनी या परिसंस्थेला चालना देण्यासाठी मोबाइल रिफिलिंग सीएनजी सुविधा उभारण्यासह विविध उपायांविषयी माहिती दिली. किफायतशीर तसेच शॉपिंग मॉल्स, कार्यालये आणि इतर ठिकाणी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने फायदेशीर अशा फिरत्या इंधन विक्रीच्या फायद्यांचीही त्यांनी माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, भविष्यात मोबाईल बॅटरी स्वॅपिंग देखील तयार केली पाहिजेत.
हायड्रोजन, सीबीजी, इथॅनॉल ब्लेंडेड पेट्रोल (ईबीपी) आणि एलएनजी यासारख्या स्वच्छ आणि हरित इंधनाचा अधिकाधिक अंगीकार आणि वापर करण्यावर मंत्रालय भर देत आहे असे प्रधान यांनी सांगितले.
इथॅनॉलचे उत्पादन आणि वितरण यासाठी ई -100 हा प्रायोगिक तत्वावरचा प्रकल्प भारताने देशभरात सुरू केला असून 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ते वचनबद्ध आहेत.
ते म्हणाले, कमी उत्सर्जन आणि स्वच्छ वातावरण सुनिश्चित करण्यासाठी डिझेल/पेट्रोल वाहनांचे सीएनजी/एलएनजी मध्ये रूपांतर करण्याची गरज आहे. त्या दिशेने, मोबाइल रिफिलिंग युनिट (एमआरयू) अद्याप पाइपलाइनद्वारे जोडलेले नसलेल्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी पारंपरिक सीएनजी स्थानके स्थापित करण्यासाठी सुयोग्य जमिनीची कमतरता आहे अशा ठिकाणी सीएनजीचा पुरवठा करण्यास मदत करेल. ते 1,500 किलो पर्यंत सीएनजी साठवू शकते आणि दररोज 150 ते 200 वाहनात इंधन भरू शकते.
***
S.Tupe/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1725384)
Visitor Counter : 268