रेल्वे मंत्रालय

शून्य कार्बन उत्सर्जनासह भारतीय रेल्वे जगातील “सर्वात मोठी हरित रेल्वे” होण्याच्या मार्गावर

Posted On: 04 JUN 2021 7:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जून 2021

 

भारतीय रेल्वे विभाग जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे होण्याच्या दिशेने युध्द पातळीवर काम करत असून 2030 सालापूर्वी “संपूर्णपणे शून्य कार्बन उत्सर्जक” बनण्याकडे मार्गक्रमण करीत आहे. नव्या भारताच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी पर्यावरणस्नेही, कार्यक्षम, किफायतशीर, वक्तशीर आणि प्रवासी तसेच मालवाहतूक करणारे आधुनिक साधन व्हावे या संपूर्ण संकल्पनेला अनुसरून रेल्वे कार्य करीत आहे. मोठ्या प्रमाणात विद्युतीकरण, पाणी तसेच कागद यांचे जतन करण्यापासून ते रेल्वे मार्गांवर जखमी होण्यापासून प्राण्यांचा बचाव करण्यापर्यंत विविध प्रयत्नांच्या माध्यमातून पर्यावरण उत्तम राखण्याच्या दृष्टीने रेल्वे कार्यरत आहे.   

पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल असलेले आणि प्रदूषण कमी करण्यास मदत करणारे रेल्वेचे विद्युतीकरण 2014 पासून 10 पट वाढले आहे. वेगवान पद्धतीने विद्युत कर्षणाचे आर्थिक लाभ कमावत रेल्वेने 2023 पर्यंत उर्वरित सर्व ब्रॉड गेज रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करून ब्रॉड गेज मार्गांचे 100% विद्युतीकरणाचे लक्ष्य गाठण्याची योजना आखली आहे. गाडीतील वीज पुरवठ्यासाठी हेड-ऑन-जनरेशन यंत्रणा, जैव-शौचालये आणि एलईडी दिवे यांच्यामुळे रेल्वे प्रवाशांना तुलनात्मकरित्या अधिक आरामदायी ठरणाऱ्या आणि पर्यावरणाबाबत अधिक सहृदय ठरणाऱ्या प्रवासाच्या प्रकारात स्वतःला रुपांतरीत करते.

भारतीय रेल्वेचे मालवाहतूक मार्ग दीर्घकालीन कमी कार्बन उत्सर्जन आराखड्यासह हरित वाहतूक जाळे म्हणून विकसित होत आहेत, ज्याद्वारे रेल्वेला उर्जेच्या बाबतीत अधिक कार्यक्षम आणि कार्बन-स्नेही तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि पद्धतींचा स्वीकार करणे शक्य होईल.

हरित प्रमाणीकरण आणि पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी:

भारतीय रेल्वेमध्ये हरित उपक्रम सुलभपणे राबविण्यासाठी 2016 मध्ये रेल्वे विभाग आणि भारतीय उद्योग महासंघ यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. रेल्वेचे 39 वर्कशॉप्स, 7 उत्पादन एकके, 8 लोको शेड्स आणि 1 स्टोअर्स डेपो आता ‘ग्रीनको’ प्रमाणपत्र धारक आहेत. यामध्ये 2 प्लॅटीनम 15 सुवर्ण आणि 18 रौप्य श्रेणीधारकांचा समावेश आहे.

हरित प्रमाणीकरण मुख्यतः पर्यावरणाशी थेट संबंध असणाऱ्या उर्जा संवर्धनसंबंधी उपाययोजना, पुनर्नवीकरणीय उर्जेचा वापर, हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात कपात, जल संवर्धन, कचरा व्यवस्थापन, भौतिक संवर्धन, पुनर्वापर, इत्यादी मापदंड लावून केलेल्या मूल्यामापनावर आधारित असते. 3 प्लॅटीनम, 6 सुवर्ण आणि 6 रौप्य श्रेणीसह  19 रेल्वे स्थानकांनी देखील हरित प्रमाणीकरण दर्जा  मिळविला आहे. याखेरीज रेल्वेच्या आणखी 27 इमारती, कार्यालये, परिसर आणि इतर आस्थापनांना देखील 15 प्लॅटीनम, 9 सुवर्ण आणि 2 रौप्य श्रेणीसह हरित प्रमाणपत्र मिळाले आहे. याशिवाय, 600 हून अधिक रेल्वे स्थानकांनी गेल्या दोन वर्षांत आयएसओ:14001 हे पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी प्रमाणपत्र मिळविले आहे. एकूण 718 स्थानके आयएसओ:14001 प्रमाणपत्रासाठी निश्चित करण्यात आली आहेत.   

पर्यावरण शाश्वतता अहवालाच्या पुस्तिकेसाठीची लिंक


* * *

M.Chopade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1724496) Visitor Counter : 55