पंतप्रधान कार्यालय

इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या आभासी सत्रामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत पंतप्रधानांनी दिला आश्चर्याचा सुखद धक्का


इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द केल्याबद्दल विद्यार्थी- पालकांनी या उत्स्फूर्त सत्रात पंतप्रधानांचे मानले आभार

Posted On: 03 JUN 2021 9:41PM by PIB Mumbai

शिक्षण मंत्रालयाच्या वतीने इयत्ता 12 वीचे  विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यासाठी आयोजित केलेल्या आभासी सत्रामध्ये  उत्स्फूर्तपणे  सहभागी होत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आश्चर्याचा सुखद धक्का दिला. सीबीएसईच्या 12 वीच्या  परीक्षा रद्द केल्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण मंत्रालयाने हे  सत्र आयोजित केले होते. पंतप्रधानांनी आपल्या बोलण्याची सुरुवात करताना सांगितले की, “आशा आहे की मी तुमच्या ऑनलाईन चर्चेत  व्यत्यय आणलेला  नाही” यामुळे पंतप्रधान आपल्यामध्ये आश्चर्यकारकरित्या सहभागी झाल्याचे पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. त्यानंतर श्री. मोदी यांनी, परीक्षेचा दबाव  नसलेल्या आणि परीक्षेपासून सुटका झाल्यामुळे आरामात असलेल्या  विद्यार्थ्यांसमवेत हलकेफुलके  क्षण व्यतीत केले. त्यांनी वैयक्तिक किस्से सांगून विद्यार्थ्यांना चिंतामुक्त  केले. जेव्हा पंचकुला येथील एका विद्यार्थ्याने गेल्या अनेक दिवसांपासून असलेल्या परीक्षेच्या ताणतणावाबद्दल सांगितले, तेव्हा पंतप्रधानांनी त्याला त्याच्या निवासस्थानाच्या क्षेत्राबद्दल विचारले आणि सांगितले की, ते ही बराच काळ या क्षेत्रामध्ये राहिले आहेत.

मुले पंतप्रधानांसोबत खुलेपणाने बोलली आणि  त्यांनी त्यांच्या चिंता आणि मते मुक्तपणे व्यक्त केली. हिमाचल प्रदेशच्या सोलन येथील एका विद्यार्थ्याने महामारीच्या  दरम्यान परीक्षा रद्द केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आणि चांगला निर्णय घेतल्याबद्दल प्रशंसा केली. उपस्थित विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थीनीने  खंत व्यक्त करीत सांगितले की,  काही लोक मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे इत्यादी कोविड प्रतिबंधासाठीच्या शिष्टाचारांचे पालन करीत नाहीत. तिने आपल्या परिसरात आयोजित केलेल्या जनजागृती उपक्रमांचे देखील तपशीलवार वर्णन केले. विद्यार्थ्यांमध्ये महामारीच्या धोक्याबद्दल चिंता  असल्याने त्यांना परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे एक दिलासा मिळाला.त्यापैकी बहुतेकांनी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. पालकांनीही हा निर्णय अत्यंत सकारात्मकतेने घेतला. मनमोकळ्या आणि पोषक चर्चेच्या भावनेने पंतप्रधानांनी उत्फुर्तपणे आपल्या भावना व्यक्त करत, सर्व पालकांना चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

परीक्षा रद्द झाल्यानंतर अचानक निर्माण झालेल्या पोकळीविषयी पंतप्रधानांनी  विचारले असता ,एका विद्यार्थ्याने उत्तर दिले की, "सर, तुम्ही म्हणाला होता की, परीक्षा हा उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे, त्यामुळे परीक्षांबद्दल माझ्या मनात भीती नव्हती'' गुवाहाटी येथील एका विद्यार्थिनीने पंतप्रधानांच्या ‘एक्झाम  वॉरियर्स’ या  पुस्तकाला  श्रेय दिले जे पुस्तक ती  दहावीपासूनच वाचत आहे. या अनिश्चित काळाचा सामना करण्यात योगाभ्यासाची मोठी मदत झाल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी योगाभ्यासाचा उल्लेखही यावेळी केला.

हा संवाद इतका उत्स्फूर्त होता की, पंतप्रधानांना चर्चासत्र पुढे नेण्यासाठी योजना आखावी लागली. परस्परसंवादाचा  समन्वय साधण्याच्या दृष्टीनें त्यांनी  सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा ओळख क्रमांक कागदाच्या तुकड्यावर लिहायला सांगितले. उत्साही विद्यार्थ्यांनी आनंदाने या तंत्राचे अनुसरण केले.चर्चेचा  विषय व्यापक करण्याच्या दृष्टीने, परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाच्या चर्चेव्यतिरिक्त  वेगळ्या प्रकारच्या चर्चेसाठी पंतप्रधानांनी मार्गदर्शन केले. याला  विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी प्रतिसाद देत नृत्य, युट्यूब संगीत वाहिन्या, व्यायाम आणि राजकारणापासूनच्या विविध गोष्टीं सांगितल्या. पंतप्रधानांनी त्यांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्त त्यांच्याशी संबंधित विशेष क्षेत्राच्या संदर्भात संशोधन करून निबंध लिहिण्यास सांगितले.

कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेदरम्यान , लोकसहभागातून आणि सांघिक कार्याद्वारे विद्यार्थ्यानी दाखविलेल्या संघभावनेबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.  पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना विचारले की,  ते आयपीएल, चॅम्पियन्स लीग पाहतील की ऑलिम्पिक किंवा आंतरराष्ट्रीय योग दिनाची वाट पाहतील, त्यावर एका विद्यार्थिंनीने  उत्तर दिले की, तिला आता महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला आहे.त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्यानंतरच्या  कालावधीचा योग्य वापर करण्यास सांगितले.

***

DY/Sonal C/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1724304) Visitor Counter : 153