मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
जागतिक दुग्ध दिनानिमित्त केंद्रीय मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्री गिरीराज सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आभासी कार्यक्रमाचे आयोजन
दुग्धविकास क्षेत्रासाठी ‘गोपाल रत्न’ या राष्ट्रीय पारितोषिकाची केंद्रीय मंत्र्यांकडून घोषणा
दुग्धविकास क्षेत्र देशातील 8 कोटींहून अधिक पशुपालक शेतकऱ्यांचा उपजीविकेचा स्त्रोत – केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह
Posted On:
01 JUN 2021 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2021
जागतिक दुग्ध दिनानिमित्त आज केंद्रीय मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्री गिरीराज सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक आभासी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दर वर्षी जून महिन्याचा पहिला दिवस जागतिक दुग्ध दिन म्हणून साजरा केला जातो.
या कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी गुरेपालन आणि दुग्धालय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी ‘गोपाल रत्न’ या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांची सुरुवात करत असल्याची घोषणा केली. हे पुरस्कार तीन विविध श्रेणींसाठी दिले जातील (i)सर्वोत्कृष्ट गुरे पालक शेतकरी, (ii) सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (AIT) आणि (iii) सर्वोत्कृष्ट सहकारी दुग्धव्यवसाय संस्था किंवा दूध उत्पादक कंपनी किंवा अन्न उत्पादक संघटना. या पारितोषिकासाठी पात्र शेतकरी, सहकारी दुग्ध व्यवसाय संस्था तसेच AI तंत्रज्ञ ऑनलाईन अर्ज सदर करू शकतात आणि यासंबंधित पोर्टल 15 जुलै 2021 पर्यंत अर्ज स्वीकारण्यासाठी खुले असेल अशी माहिती त्यांनी दिली. पारितोषिक प्राप्त व्यक्ती आणि संस्थांची नावे 31 ऑक्टोबर 2021 रोजी जाहीर केली जातील.
ई-गोपाल अॅपचे उमंग मंचाशी एकत्रीकरण करत असल्याची घोषणा देखील त्यांनी केली, या मुळे उमंग मंचाच्या 3 कोटी 10 लाख वापरकर्त्यांना ई-गोपाल अॅप वापरता येऊ शकेल. ई-गोपाल अॅप (उत्पादनशील गुरांच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्यासाठीचे अॅप) हे शेतकऱ्यांना थेट वापरता येईल असे व्यापक प्रजाती सुधारणा विपणन तसेच माहिती केंद्र असून 10 सप्टेंबर 2020 रोजी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले होते.
आजच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, जागतिक पातळीवर दूध उत्पादन करणाऱ्या सर्व देशांमध्ये भारत अग्रणी आहे. वर्ष 2019-20 मध्ये देशात 198.4 दशलक्ष टनांहून अधिक दुधाचे उत्पादन झाले. वर्ष 2018-19 मध्ये दूध व्यवसायामध्ये तत्कालीन मूल्यानुसार 7.72 लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली, जी त्या वर्षीच्या गहू आणि तांदूळ यांच्या एकत्रित उलाढालीहून अधिक होती.
गेल्या सहा वर्षांच्या काळात, देशातील दूध उत्पादनात दर वर्षी सरासरी 6.3% ची वाढ झाली आहे तर या काळात जागतिक पातळीवरील दूध उत्पादन दर वर्षी फक्त 1.5% ने वाढत आहे, याचा देखील त्यांनी उल्लेख केला. ते पुढे म्हणाले की, आपल्या देशातील दूध उत्पादन क्षेत्र 8 कोटींहून अधिक दूध उत्पादक शेतकऱ्यांना उपजीविकेचे साधन पुरविते आणि यापैकी बहुतांश मुख्यतः छोटे आणि दुर्लक्षित, भूमिहीन मजूर आहेत. सुमारे 2 कोटींहून अधिक दूध उत्पादक शेतकरी सहकारी दूध उत्पादक संस्थांच्या माध्यमातून एकत्र आले आहेत आणि 1लाख 94 हजार सहकारी दूध उत्पादक संस्था दूध उत्पादन करणाऱ्या गावांमधून दूध संकलन करीत आहेत.
आजच्या आभासी कार्यक्रमात, केंद्रीय मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास राज्य मंत्री डॉ.संजीव कुमार बलियान आणि प्रताप चंद्र सारंगी यांचीदेखील भाषणे झाली. या कार्यक्रमाला, अनेक शेतकरी, दूध फेडरेशनचे सदस्य, सहकारी दूध उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी, विद्वान संशोधक, प्रशासक इत्यादी आभासी पद्धतीने उपस्थित राहिले.
* * *
S.Tupe/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1723475)
Visitor Counter : 279