आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या मात्रांचा 20 कोटीचा टप्पा भारताने केला पार


कोविड - 19 लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून 130 दिवसात भारताने गाठला हा मैलाचा टप्पा

हा टप्पा गाठणारा भारत हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश

60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 42 टक्के लोकसंख्येला कोविड -19 लसीची किमान एक मात्रा प्राप्त

Posted On: 26 MAY 2021 5:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 मे 2021

 

कोविड -19 लसीकरण मोहिमेत आज भारताने महत्त्वाचा मैलाचा टप्पा गाठला आहे. आज सकाळी 7 वाजता प्राप्त आकडेवारीनुसार मोहिमेच्या  130 व्या दिवशी भारतातील कोविड लसीकरणाने 20 कोटींचा टप्पा (एकूण 20,06,62,456 मात्रांपैकी 15,71,49,593 पहिली मात्रा तर 4,35,12,863 दुसरी मात्रा ) पार केला आहे. 

भारतातील  कोविड -19 लसीकरण मोहीम जगातली आतापर्यंतची सर्वात मोठी लसीकरण मोहीम असून तिची सुरुवात पंतप्रधानांच्या हस्ते 16 जानेवारी  2021ला झाली आहे. 

केवळ 130 दिवसात हा टप्पा गाठणारा भारत हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश आहे. अमेरिकेने 124 दिवसात  20 कोटींचा टप्पा पार केला होता. 

याशिवाय 'अवर वर्ल्ड इन डेटा' आणि इतर वृत्तांनुसार कोविड - 19 लसीकरणातील आघाडीच्या देशांमध्ये ब्रिटनने 168 दिवसात 5.1 कोटींचा टप्पा पार केला. ब्राझीलने 128 दिवसात 5.9 कोटी तर जर्मनीने 149 दिवसात 4.5 कोटी लसींचा टप्पा गाठला. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत 45 वर्षांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 34 टक्के व्यक्तींना कोविड -19 प्रतिबंधक लसीची  किमान 1 मात्रा मिळाली  आहे. त्याचप्रमाणे भारतातील 60 आणि त्या  वर्षांवरील व्यक्तींपैकी 42 टक्क्यांहून अधिक जणांना  कोविड - 19 लसीची  किमान 1 मात्रा मिळाली  आहे. 

भारत सध्या, आपल्या  कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये  तीन लसींचा उपयोग करत आहे. यामध्ये, सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाज या कंपनीची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची  कोवॅक्सिन या दोन भारतात तयार लसींचा समावेश आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांकडून (DCGI) आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेली रशियाची  स्पुटनिक V ही तिसरी लस असून काही खासगी रुग्णालयांमध्ये तिचा उपयोग केला जात असून आगामी काळात तो वाढण्याची अपेक्षा आहे. 

130 दिवसांपूर्वी 16 जानेवारी रोजी सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात, कोविड- 19 लसीकरणाबाबतच्या  राष्ट्रीय तज्ज्ञ गटाने आरोग्य सेवेतल्या व्यक्ती  आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांना  (दोन्ही सरकारी आणि खाजगी क्षेत्र) यांना प्राधान्य दिले. लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा 1 मार्च 2021 पासून सुरू झाला. यात  सर्वात जोखमीच्या  वयोगटातील व्यक्तींना संरक्षण देण्यावर लक्ष केंद्रित केले गेले.  या प्राधान्य वयोगटात 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या विशिष्ठ सह्व्याधी असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. यात व्यापकता आणून  1 एप्रिल 2021 रोजी 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. तिसर्‍या टप्प्यात 1 मे 2021 रोजी' उदार मूल्यनिर्धारण आणि वेगवान राष्ट्रीय कोविड- 19 लसीकरण धोरण’ स्वीकारण्यात आले असून या धोरणाच्या अंतर्गत, 18 वर्षांवरील प्रत्येकजण कोविड-19 लसीकरणासाठी पात्र आहे.

 

* * *

N.Chitale/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1721914) Visitor Counter : 251