आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

म्यूकरमायकॉसिस आजाराला बुरशीच्या रंगावरून न ओळखता मूळ नावानेच ओळखणे जास्त योग्य : एम्स चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया


कोविड-19 बाधित रुग्णांमध्ये आढळणारा बुरशीजन्य संसर्ग बहुतेकदा म्यूकरमायकॉसिस असतो

हा आजार स्पर्शातून पसरणारा अथवा संसर्गजन्य नाही

ऑक्सिजन उपचार आणि हा आजार होणे यात काहीही निश्चित संबंध नाही

म्यूकरमायकॉसिसचे 90% – 95% रुग्ण मधुमेहग्रस्त आहेत आणि/किंवा स्टिरॉईड्सचे सेवन करीत आहेत

Posted On: 24 MAY 2021 7:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली / मुंबई 24 मे 2021

 

म्यूकरमायकॉसिस हा कोविड-19 संसर्गावर उपचार घेऊन रोगमुक्त झालेल्या किंवा सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये आढळणारा सर्वसामान्य बुरशीजन्य आजार आहे. या आजाराने बाधित व्यक्तींची संख्या वाढताना दिसत असली तरी हा संसर्गजन्य, म्हणजे कोविड-19 सारखा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरणारा आजार नाही. नवी दिल्ली येथील एम्स अर्थात अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी आज पत्र सूचना कार्यालयाच्या नवी दिल्ली येथील राष्ट्रीय माध्यम केंद्रात माध्यम प्रतिनिधींना संबोधित करताना ही माहिती दिली.

 

या आजाराला काळ्या बुरशीचा संसर्ग न म्हणता म्यूकरमायकॉसिसच म्हणा

डॉ. गुलेरिया म्हणाले की म्यूकरमायकॉसिसबद्दल बोलताना त्याला काळ्या बुरशीचा संसर्ग असे संबोधन वापरणे योग्य नाही कारण त्यामुळे अनेक गैरसमज पसरू शकतात. “काळी बुरशी ही वेगळी जीवशास्त्रीय शाखा आहे, पांढऱ्या बुरशीच्या पसरलेल्या वाढीत या बुरशीचे काळे ठिपके दिसल्यामुळे हे नाव म्यूकरमायकॉसिसशी जोडले गेले आहे. सर्वसामान्यपणे, बुरशीजन्य आजाराचे अनेक प्रकार आहेत,उदा. कँडिडा, अॅस्परजिलॉसिस, क्रिप्टोकोकस, हिस्टोप्लाझमॉसिस आणि कॉकायडीओडोमायकॉसिस. म्यूकरमायकॉसिस, कँडिडा आणि अॅस्परजिलॉसिस हे प्रकार कमी प्रतिकारशक्ती असणाऱ्या व्यक्तीमध्ये बघायला मिळतात.

 

संसर्गाचा प्रकार, लक्षणे आणि उपचार

या संसर्गांच्या प्रसाराबद्दल बोलताना डॉ.गुलेरिया म्हणाले की, “कँडिडा बुरशीचा संसर्ग झाल्यानंतर, रुग्णाच्या तोंडात, मुख पोकळीत आणि जिभेवर पांढरे चट्टे दिसून येतात; हा आजार व्यक्तीच्या गुप्त अवयवांना सुद्धा संसर्ग करतो तसेच रक्तात देखील सापडतो (अशा प्रसंगी हा आजार गंभीर स्वरूप घेतो). अॅस्परजिलॉसिस बुरशीचा आजार फारसा दिसून येत नाही, हा आजार फुफ्फुसांवर आक्रमण करून फुफ्फुसांमध्ये पोकळ्या निर्माण करतो. कोविड-19 बाधित रुग्णांमध्ये दिसणारा आजार हा बहुतांश वेळा म्यूकरमायकॉसिस आहे, अॅस्परजिलॉसिस आजार झालेला रुग्ण क्वचितच दिसतो तर कँडिडा काही लोकांमध्ये आढळून येतो.

म्यूकरमायकॉसिसने बाधित झालेल्या आणि गंभीर धोक्याच्या छायेत असलेल्या लोकांबद्दल बोलताना ते म्हणाले की म्यूकरमायकॉसिस झालेले 90% ते 95% रुग्ण एकतर मधुमेहाने ग्रस्त आहेत आणि/किंवा स्टिरॉईड्स घेत आहेत. ज्या व्यक्ती मधुमेही नाहीत किंवा स्टिरॉईड्सचे सेवन करीत नाहीत अशा व्यक्तींमध्ये हा आजार क्वचितच दिसून येतो.

त्यांनी असेही नमूद केले की जे रूग्ण उच्च-जोखमीच्या श्रेणीत आहेत, म्हणजेच त्यांचा मधुमेह अनियंत्रित आहे आणि कोविड पॉझिटिव्ह ची लक्षणे दिसत आहेत त्यांनी त्वरित त्यांच्या डॉक्टरांना याबाबत माहिती द्यावी. उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींमध्ये किंवा स्टिरॉइड घेणाऱ्या व्यक्तींमध्ये “डोकेदुखी, नाकातून रक्त येणे, डोळ्याच्या खाली सूज येणे, चेहऱ्याची संवेदना कमी होणे अशाप्रकारची म्युकरमायकोसिसचा इशारा देणारी लक्षणे आढळल्यास त्यांनी डॉक्टरांना त्याबाबत त्वरित कळवणे आवश्यक आहे म्हणजे लगेच निदान आणि उपचार केले जाऊ शकतात.”

 

म्युकरमायकोसिसचे प्रकार

मानवी शरीराच्या कोणत्या अवयवावर हल्ला होतो यावर म्युकरमायकोसिसचे वर्गीकरण केले जाऊ शकते. संसर्गाच्या खुणा आणि लक्षणे देखील शरीराच्या परिणाम झालेल्या भागानुसार बदलतात.

 

ऱ्हायनो ऑर्बिटल सेरेब्रल म्युकरमायकोसिस: यामुळे नाक, डोळा / डोळ्याची कक्षा/ डोळ्याची खोबणी, तोंडातील आतील भागात संसर्ग होतो आणि मेंदूतही पसरू शकतो. डोकेदुखी, नाकात रक्तसंचय, नाकातील स्त्राव (हिरवा रंग), सायनस मध्ये वेदना, नाकातून रक्तस्त्राव होणे, चेहऱ्यावर सूज येणे, चेहऱ्याची संवेदना कमी होणे आणि त्वचेचा रंग बदलणे अशा लक्षणांचा समावेश आहे.

 

पल्मनरी म्युकरमायकोसिस: या बुरशीजन्य संसर्गाचा फुफ्फुसांवर परिणाम होतो. ताप, छातीत दुखणे, खोकला आणि खोकताना रक्तस्त्राव यामुळे होतो.

बुरशीमुळे आंतनलिकेलाही संसर्ग होऊ शकतो.

 

ऑक्सिजन उपचार पद्धतीची कोणतीही निश्चित लिंक नाही.

“ऑक्सिजन उपचार पद्धतीवर नसलेल्या आणि घरी उपचार घेत असलेल्या बर्‍याच रुग्णांनाही म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे ऑक्सिजन उपचार पद्धती आणि संसर्ग होण्यात कोणताही निश्चित संबंध नाही,” असे डॉ. गुलेरिया म्हणाले.

 

उपचार आव्हाने

म्युकरमायकोसिस झालेल्या कोविड -पॉझिटिव्ह रूग्ण आणि कोविड निगेटिव्ह रुग्णांना स्वतंत्र रुग्णालयाच्या कक्षात ठेवणे आवश्यक असल्याने, बुरशी-विरोधीजन्य उपचार बर्‍याच आठवड्यांपर्यंत चालू राहतात त्यामुळे रुग्णांसाठी हे आव्हानात्मक आहे. म्युकरमायकोसिस शस्त्रक्रियेचा कोविड रूग्णांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो म्हणून शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.

मधुमेह रूग्णांसाठी योग्य स्वच्छता राखणे खूप महत्वाचे आहे कारण अशा रुग्णांमध्ये संधीसाधू संसर्गाची शक्यता जास्त असते. ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर वापरकर्त्यांनी नियमितपणे ह्युमिडिफायर्सची साफसफाई केली पाहिजे.

 

आपल्याला हे वाचण्यास देखील आवडेल:

म्युकरमायकोसिसपासून सुरक्षित रहा- कोविड19 रुग्णांमध्ये आढळणारा अत्यंत दुर्मिळ मात्र गंभीर असा बुरशीसंसर्ग

रक्तशर्करेच्या पातळीवर नेहमी लक्ष ठेवा आणि ती नियंत्रणात ठेवा- मधुमेहाच्या रुग्णांना सल्ला

 

M.Chopade/S.Chitnis/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1721359) Visitor Counter : 1232