गृह मंत्रालय

कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीने ‘तौ ते’ चक्रीवादळपश्चात मदत आणि पुनर्वसन कार्याचा घेतला आढावा

Posted On: 20 MAY 2021 5:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 मे 2021

 

कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय व्यवस्थापन समितीने (एनसीएमसी) आजच्या बैठकीत तौ ते चक्रीवादळपश्चात मदत आणि पुनर्वसन कार्याचा आढावा घेतला. या संकटानंतर राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश प्रशासने, केंद्रीय मंत्रालये आणि विविध संस्थांनी मदत आणि पुनर्वसनासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

या चक्रीवादळामुळे झालेल्या जीवित व वित्तहानीची, पायाभूत सुविधांच्या तसेच पिकांच्या नुकसानाची माहिती संबंधित  राज्यांच्या मुख्य सचिवांनी व केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकाच्या सल्लागारांनी समितीला दिली. तसेच दूरसंवाद सेवा, वीजपुरवठा, रस्ते, पाणीपुरवठा व अन्य सेवासुविधा पूर्ववत करण्यासाठी त्यांच्याकडून सुरु असलेल्या प्रयत्नांचीही माहिती त्यांनी दिली. हवामानखात्याने वेळेवर व अचूक अंदाज वर्तविल्यामुळे आणि केंद्रीय तसेच राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाच्या विविध संस्थांनी समन्वयाने काम केल्याने, जीवितहानी व वित्तहानी कमीत कमी ठेवण्यात यश मिळाले याविषयी  यावेळी एकमत झाले. सर्वानी वेळेअगोदर पावले उचलल्यामुळे बाधित क्षेत्रातील रुग्णालये व कोविड देखभाल केंद्रांच्या कामावर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही, असेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

भारतीय नौदल आणि तटरक्षक दल यांनी अन्य संस्थांबरोबर काम करून तीन नौकांवरील तसेच एका ड्रिलिंग जहाजावरील व्यक्तींची सुटका केली, त्याबद्दलही यावेळी चर्चा करण्यात आली.

मदत आणि पुनर्वसन यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेऊन राजेंव गौबा यांनी, "दूरसंवाद सेवा, वीजपुरवठा, रस्ते, पाणीपुरवठा व अन्य सेवासुविधा पूर्ववत करण्यासाठी संबंधित संस्था आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी प्रयत्न सुरु ठेवावेत व हे काम वेगाने पूर्ण करावे" अशा सूचना दिल्या. केंद्रीय मंत्रालये / केंद्र सरकारच्या संस्थांनी राज्य सरकारे/ केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाबरोबर समन्वय साधून आवश्यक ती सर्व मदत झटपट पुरवावी असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीस गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू, या राज्यांचे मुख्य सचिव आणि अन्य अधिकारी, तसेच लक्षद्वीप आणि दादरा व नगरहवेली, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांचे सल्लागार उपस्थित होते. केंद्रीय गृह मंत्रालयासह जहाजबांधणी, दूरसंवाद, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, वीज, आरोग्य, अन्न व सार्वजनिक वितरण, पेयजल व स्वच्छता मंत्रालयाचे सचिव आणि अधिकारीही यावेळी सहभागी झाले होते. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक, तटरक्षक दलाचे महासंचालक आणि इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे उपप्रमुख या बैठकीत उपस्थित होते.

 

* * *

Jaydevi PS/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1720312) Visitor Counter : 270