रेल्वे मंत्रालय

ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी एका दिवसातील सर्वाधिक म्हणजे 1000 मेट्रिक टन प्राणवायू केला पोहोचता


आतापर्यंत 11030 मेट्रिक टनापेक्षा अधिक प्राणवायू 13 राज्यांपर्यंत पोहोचवला

महाराष्ट्रात 521 मेट्रिक टन, उत्तरप्रदेशात सुमारे 2858 मेट्रिक टन, मध्यप्रदेशात 476, हरयाणामध्ये 1427, तेलंगणात 565, राजस्थानात 40, कर्नाटकात 480, उत्तराखंडमध्ये 200, तामिळनाडूमध्ये 350, पंजाबमध्ये 81, केरळात 118 आणि दिल्लीत सुमारे 3794 मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा

Posted On: 18 MAY 2021 5:00PM by PIB Mumbai

 

प्राणवायूच्या पुरवठ्यात येणारे सर्व अडथळे दूर करत व अडचणींवर तोडगे शोधून काढत, देशभर द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा करण्याचे काम भारतीय रेल्वेकडून अविरत चालू आहे. आतापर्यंत रेल्वेने  675 पेक्षा अधिक टँकर्समधून 11030 मेट्रिक टनापेक्षा अधिक प्राणवायू विविध राज्यांपर्यंत पोहोचवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्या देशाला दररोज सुमारे 800 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा करत आहेत.

23 दिवसांपूर्वी, 24 एप्रिल रोजी महाराष्ट्राला 126 मेट्रिक टन वैद्यकीय द्रवरूप प्राणवायू पोहोचवून या कार्याचा प्रारंभ झाला होता.

24 दिवसांपेक्षा किंचित अधिक काळात रेल्वेने ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांचे प्रचालन वाढवून तेरा राज्यांना 11,030 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू पोहोचविला आहे.

यासाठी रेल्वेगाड्या देशाच्या विविध दिशांना दीर्घ प्रवास करत आहेत. पश्चिमेकडील हापा आणि मुंद्रा तसेच पूर्वेकडील राउरकेला, दुर्गापूर, टाटानगर आणि अंगुल येथून प्राणवायू घेऊन रेल्वेगाड्या उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश , आंध्रप्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, केरळ, दिल्ली, उत्तरप्रदेश या राज्यांपर्यंत तो पोहोचता करत आहेत. या साऱ्या प्रवासात व्यावहारिक अडचणींवर मात करत गुंतागुंतीचे प्रवासमार्ग आखून हे कार्य वेगाने चालू आहे.

कमीत कमी वेळात जलदगतीने प्राणवायूची वाहतूक करता येण्यासाठी रेल्वे नवीन युक्त्या-प्रयुक्त्या वापरून यशाचे नावे मापदंड निर्माण करत ऑक्सिजन एक्स्प्रेस मालवाहू गाड्या चालवत आहे. दूरवर जाणाऱ्या या अतिमहत्त्वाच्या मालवाहू गाड्यांपैकी बहुतांश गाड्यांचा सरासरी वेग 55 पेक्षा खूप जास्त असतो. उच्च प्राधान्याच्या हरित मार्गिकेतून या गाड्या धावतात. यासाठी रेल्वेच्या विविध परिक्षेत्रातील प्रचालन-तुकड्या आव्हानात्मक परिस्थितीत चोवीस तास दक्ष राहून झपाट्याने काम करत आहेत. विविध विभागांमध्ये गाड्या चालविणारे/सांभाळणारे मनुष्यबळ बदलण्यासाठीच्या तांत्रिक थांब्यांचा कालावधी एक मिनिटांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

ऑक्सिजन एक्स्प्रेस गाडयांना वेगाने व सुरळीतपणे प्रवास करता येण्यासाठी रेल्वेरूळ खुले ठेवले जात असून अतिशय काटेकोर सावधगिरी बाळगली जात आहे.

इतर मालवाहतुकीचा वेगही कमी करावा लागू नये या विचारासह हे सर्व एकं केले जात आहे.

अंदाजे 175 ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी आतापर्यन्त प्रवास पूर्ण करून अनेक राज्यांना मदत पुरविली आहे.

गरजू राज्यांना शक्य तितक्या द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा कमीत कमी वेळात करण्याचा विडाच भारतीय रेल्वेने उचलला आहे.

ही बातमी तयार होईपर्यंत महाराष्ट्रात 521 मेट्रिक टन, उत्तरप्रदेशात सुमारे 2858 मेट्रिक टन, मध्यप्रदेशात 476, हरयाणामध्ये 1427, तेलंगणात 565, राजस्थानात 40, कर्नाटकात 480, उत्तराखंडमध्ये 200, तामिळनाडूमध्ये 350, पंजाबमध्ये 81, केरळात 118 आणि दिल्लीत सुमारे 3794 मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा करण्यात आला आहे.

नवीन ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्या चालविणे हे एक गतिशील व अनेक घटकांवर अवलंबून असणारे काम असते. यासंबंधीची आकडेवारी सातत्याने बदलत असते. आणखी काही ऑक्सिजन एक्स्प्रेस आज रात्री उशिरा प्रवास सुरु करणार आहेत.

प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या स्थळांना जोडणारे निरनिराळे मार्ग रेल्वेने तयार ठेवले आहेत व राज्यांच्या बदलत्या गरजांनुसार पुरवठा करण्यासाठी रेल्वे सुसज्य आहे. द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू आणण्यासाठी राज्यांकडून रेल्वेला टँकर्स पुरवले जात आहेत.

 

Jaydevi PS/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1719621) Visitor Counter : 209