शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शालेय शिक्षण सचिवांची बैठक संपन्न
महामारीच्या दरम्यानची शालेय शिक्षणासंदर्भातील सर्वात मोठी बैठक
Posted On:
17 MAY 2021 6:32PM by PIB Mumbai
कोविड दरम्यान शिक्षण प्रणालीच्या व्यवस्थापनासाठी अवलंबलेले विविध उपाय तसेच शाळांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाइन शिक्षणासाठी अवलंबलेल्या आतापर्यंतच्या आणि यापुढील वेगवेगळ्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री श्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शालेय शिक्षण सचिवांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. शिक्षण राज्यमंत्री श्री.संजय धोत्रे,उच्च शिक्षण सचिव श्री.अमित खरे,शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव श्रीमती अनिता करवाल आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि शिक्षण विभाग सचिव यांच्यासह जवळपास सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींनी त्याचप्रमाणे राज्य प्रकल्प संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांसारखे राज्यांचे अन्य अधिकारी इत्यादी या बैठकीला उपस्थित होते. महामारी दरम्यानची शालेय शिक्षणासंदर्भातील ही सर्वात मोठी बैठक होती.
मागील वर्षात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेलेले सुसंगत प्रयत्न सुरू ठेवण्याच्या गरजेवर मंत्र्यानी भर दिला आणि महामारीच्या काळात अत्यंत असुरक्षित आणि उपेक्षित मुलांपर्यंत पोहोचण्याचे महत्व अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले की,महामारीच्या काळात, शिक्षण सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी विभागाने 2020-21 मध्ये अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यात समाविष्ट: पंतप्रधान ई - विद्या अंतर्गत दीक्षा चा विस्तार,स्वयंप्रभा टीव्ही वाहिनी समुहाअंतर्गत डीटीएच दूरचित्रवाणी वाहिनी, दिक्षा मध्ये शिक्षकांसाठी ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षण सुरू करणे, विद्यार्थ्यांच्या सामाजिक-भावनिक आणि मानसिक गरजांची पूर्तता करण्यासाठी मनोदर्पणची सुरुवात इत्यादी. तसेच डिजिटल शिक्षणाशिवाय मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध भागधारकांना सामावून घेण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
हस्तक्षेपासाठी ओळखली जाणारी प्रमुख क्षेत्रे अशी आहेत: शाळाबाह्य मुलांची ओळख पटवणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांची शाश्वत नावनोंदणी सुनिश्चित करणे, पुनर्रधारणा आणि संक्रमण, अध्ययनविषयक शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा आकलनविषयक विकास, क्षमताबांधणी- संमिश्र विशिष्ट केंद्रित आणि विद्यार्थ्यांचे मूल्यांकन आणि माहिती वापरासह गृह -आधारित शिक्षण, पौष्टिक, सामाजिक-भावनिक पाठिंबा ; डिजिटल शिक्षण आणि देखरेख, निरीक्षण आणि उपाय.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ,पालक आणि समुदायांच्या महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केल्या आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनीही डिजिटल उपकरणे , दूरदर्शन आणि रेडिओ इत्यादीच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी तपशील सादर केला
***
MC/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1719483)