आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविशिल्ड लसींच्या दोन मात्रांमधील अंतर 12 ते 16 आठवडे करण्याच्या दृष्टीने कोविन डिजिटल पोर्टलमध्ये बदल
कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेसाठी घेतलेली पूर्वनियोजित वेळ कायम राहणार, ती कोविनकडून रद्द होणार नाही
आता दोन मात्रांमधील वाढवलेल्या कालावधीनुसार लाभार्थ्यांनी दुसऱ्या मात्रेसाठी ठरवून घेतलेली वेळ बदलून घेण्याची सूचना
प्रविष्टि तिथि:
16 MAY 2021 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मे 2021
डॉ एन. के. अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील कोविड कार्यगटाने कोविशिल्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या मात्रेमधील कालावधी 12 ते 16 आठवडे करण्याची सूचना केली आहे. ही सूचना भारत सरकारने 13 मे 2021 रोजी स्वीकारली आहे.
भारत सरकारने राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना या बदलांबद्ल माहिती दिली आहे. कोविशिल्ड लसींच्या दोन मात्रांमधील अंतर 12 ते 16 आठवडे दर्शवण्याच्या दृष्टीने कोविन डिजिटल पोर्टलमध्ये बदल करण्यात आला आहे.
मात्र, काही माध्यमातून कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या आणि 84 दिवसांपेक्षा कमी कालावधी राखून ज्यांनी दुसऱ्या मात्रेसाठी वेळ ठरवून घेतली आहे त्यांना दुसरा डोस न देता लसीकरण केंद्रावरून परतवण्यात आले अशा आशयाचे वृत्त देण्यात आले आहे.
हा संबधित बदल कोविन पोर्टलवर आता समाविष्ट केला आहे. त्यामुळे यापुढे पहिली मात्रा घेणाऱ्यांना 84 दिवसांपेक्षा कमी दिवसात दुसऱ्या मात्रेसाठी ऑनलाईन वा ऑनसाईट वेळ मिळू शकणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र, कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेसाठी आधी घेतलेली वेळ मात्र तशीच कायम राहील, ती कोविनकडून परस्पर रद्द होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.त्यासोबतच, या लाभार्थ्यांनी दुसऱ्या मात्रेसाठी घेतलेली वेळ बदलून ती पहिल्या मात्रेपासून 84 दिवसांनंतरची घ्यावी असे सुचवण्यात आले आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेसाठी या कालावधीतील बदलाआधी मिळालेल्या पूर्वनियोजित वेळेचा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी आदर करावा अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे .
कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेसाठी आधीच्या वेळेनुसार जे आले आहेत त्या लाभार्थ्यांना परत न पाठवता त्यांना दुसरी मात्रा देण्याच्या सूचना आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना द्याव्यात असे निर्देश, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. परंतु, कालावधीतील बदलाबद्दल देखील लाभार्थ्यांना योग्य माहिती देण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
R.Aghor/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1719181)
आगंतुक पटल : 282