संरक्षण मंत्रालय

लष्करी नर्सिंग सेवेतील अधिकारी कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेशी लढण्यात आघाडीवर

Posted On: 12 MAY 2021 5:44PM by PIB Mumbai

 

कोविड-19 संसर्गाच्या दुसऱ्या लाटेशी सुरु असलेल्या देशाच्या लढ्यात पहिल्या फळीत सज्ज असलेल्या आरोग्य सेवा व्यावसायिकांमध्ये MNS अर्थात लष्करी नर्सिंग सेवेतील अधिकारी देखील समाविष्ट आहेत. कोविड -19 रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी संरक्षण दलाच्या विविध रुग्णालयांमध्ये हे अधिकारी कर्तव्य बजावीत आहेत. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने दिल्ली, लखनौ, अहमदाबाद, वाराणसी आणि पाटणा या ठिकाणी नव्याने उभारलेल्या कोविड-19 रुग्णालयांमध्ये MNS चे 294 अधिकारी नेमण्यात आले आहेत.

कोविड-19 ची महामारी सुरु झाल्यापासूनच, MNS चे नर्सिंग अधिकारी पूर्ण निष्ठेने आणि धैर्याने देशवासीयांची सेवा करीत आहेत. ऑपरेशन नमस्ते आणि ऑपरेशन समुद्र सेतू या मोहिमांचा एक भाग म्हणून या अधिकाऱ्यांनी विविध प्रत्यार्पण मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

लष्करी नर्सिंग सेवेतील अधिकारी नेहमीच देशाचे युध्द प्रयत्न, माणुसकीच्या नात्याने करण्याची मदत,बचाव मोहिमा, रुग्णवाहिका रेल्वे, रुग्णालय जहाजे आणि पाणबुड्या यांचा अविभाज्य भाग राहिले आहेत.  भारतातील लेहराजौरीदोडाकारगिल आणि तत्सम दुर्गम भागांमधील संरक्षण दलांच्या पथकांच्या सेवेसाठी हे अधिकारी नेहमीच तत्पर राहिले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शांती दलामध्ये नेमणूक होऊन या अधिकाऱ्यांनी काँगो, सुदान, लेबनॉन, इत्यादी देशांमध्ये तसेच ताजिकीस्तानच्या मैत्रीपूर्ण परदेश अभियानात कर्तव्य बजावले आहे. जम्मू-काश्मीर तसेच देशाच्या ईशान्य भागातील धुमसत्या भागांमध्ये त्यांनी दिलेल्या सर्वसमावेशक  सेवेच्या योगदानामुळे MNS च्या अधिकाऱ्यांच्या सुसज्जता आणि सहनशीलतेत भर पडली. भारताच्या सर्वोच्च उंचीवरील युद्धभूमीपासून अफाट पसरलेल्या वाळवंटी भूभागापर्यंत सर्व आवश्यक ठिकाणी MNS च्या अधिकाऱ्यांनी सेवा पुरविली आहे.

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन-2021 ची परिचारिका- आघाडीचा आवाज, भविष्यातील आरोग्य सेवेची दृष्टी या  संकल्पनेचे समर्थन करीत लष्करी नर्सिंग सेवेतील अधिकारी गरजू लोकांसाठी त्यांची सेवा देऊ करीत आहेत. दर वर्षी 12 मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो.  

***

Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1718016) Visitor Counter : 207