रसायन आणि खते मंत्रालय
देशभरात रेमडेसीवीरची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी 16 मे 2021 पर्यंतच्या साठ्याच्या वितरणाचे नियोजन पूर्ण- सदानंद गौडा
Posted On:
07 MAY 2021 3:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2021
रेमडेसीवीर इंजेक्शनची सर्व राज्यांमध्ये असलेली गरज लक्षात घेऊन, त्याची पुरेशी उपलब्धता असावी, या हेतूने, सरकारने रेमडेसीवीर इंजेक्शनच्या कुप्यांचे 16 मे 2021 पर्यंतचे वितरण पूर्ण केले आहे, अशी माहिती केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी वी संदानंद गौडा यांनी आज दिली. यामुळे, कोविड-19 च्या रुग्णांना रेमडेसीवीर उपलब्ध होऊ शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
औषध निर्माण विभाग आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख करण्यात आला होता की, रेमडेसीवीर औषधाच्या सातत्यपूर्ण वितरणाचे नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार, 21 एप्रिल ते 9 मे 2021 पर्यंतचे वितरण करण्यात आले आहे. याचे पुरवठा वितरण आदेश (DO) 1 मे रोजी जारी करण्यात आले होते. हाच नियोजन आराखडा आता 16 मे पर्यंत वाढवण्यात आला असून औषध निर्माण विभाग आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संयुक्तरित्या हा नियोजन आराखडा तयार केला आहे.
रेमडेसीवीरचा हा साठा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या निश्चित कोट्यानुसार वितरीत केला जाईल. त्यानंतर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी त्याच्या वाटपावर देखरेख ठेवावी. सरकारी तसेच खाजगी रुग्णालयात त्याचा योग्य वापर होतो आहे ना, याकडेही लक्ष द्यावे, अशी सूचना करण्यात आली आहे.
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी विपणन कंपन्यांकडे रेमडेसीवीरची ऑर्डर नोंदवली नसेल तर त्वरीत पुरेशी खरेदी ऑर्डर नोंदवावी असा सल्ला देखील केंद्रीय मंत्रालयाने दिला आहे. राज्यांना ज्या प्रमाणात औषधसाठा हवा आहे, तेवढा साठा मिळवण्यासाठी संपर्क अधिकाऱ्याशी समन्वय ठेवावा. त्यासोबतच यासाठी राज्यातल्या वितरण खाजगी कंपन्यांशी देखील संपर्क साधता येईल.
Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1716777)
Visitor Counter : 254