पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत दूरध्वनीवरुन चर्चा

Posted On: 28 APR 2021 10:06PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 28 एप्रिल 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.

यावेळी दोन्ही नेत्यांनी कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा केली. रशिया या संकटप्रसंगी, भारतातील जनता आणि भारत सरकार सोबत खंबीरपणे उभा आहे, अशी भावना राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी यावेळी व्यक्त केली. रशिया भारताला सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पुतीन यांच्या या आश्वासनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले. या संकटकाळात रशियाने त्वरित पुढे केलेला हा मदतीचा हात दोन्ही देशांमधील दीर्घकालीन भागीदारीचेच प्रतीक आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.

यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशियादरम्यान कोविडचा सामना करण्यासाठी सुरु असलेल्या सहकार्याविषयी चर्चा केली. भारताने रशियाच्या स्पुटनिक- V लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्याबद्दल, पुतीन यांनी आनंद व्यक्त केला. रशियाच्या या लसीचे उत्पादन भारतात केले जाईल, या लसी  भारत, रशिया आणि तिसऱ्या जगातील देशांसाठी उपयुक्त ठरतीलअसे मत दोन्ही नेत्यांनी व्यक्त केले.

दोन्ही नेत्यांनी यावेळी विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य अधिक  दृढ करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारत आणि रशियादरम्यानचे संबंध विशेष व खास असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

भारताच्या गगनयान मोहिमेला, रशियाने दिलेल्या पाठींब्याबद्दल आणि गगनयानच्या चार अंतराळवीरांना रशियाने प्रशिक्षण दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र यांनी आभार व्यक्त केले. 

हायड्रोजन अर्थव्यवस्थेसह अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची गरज असल्याचे दोन्ही नेत्यांनी यावेळी नमूद केले.

दोन्ही देशांमध्ये 2+2  संवाद पुन्हा सुरु करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या अंतर्गत उभर देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांच्या बैठका आयोजित केल्या जातील.

सप्टेंबर 2019 मध्ये व्लादीवोस्तोक येथे झालेल्या दोन्ही देशांनी शिखर परिषदेत घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णयांना या संभाषणात उजाळा देण्यात आला. या वर्षाअखेरीस, राष्ट्राध्यक्ष पुतीन शिखर परिषदेसाठी भारतात भेट देतील, अशी आशा मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. या द्विपक्षीय शिखर परिषदेत, दोन्ही नेत्यांमधील वैयाक्तिक, विश्वासार्ह संबंध  वृद्धिंगत करण्याची संधी मिळेल, अशी आशा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. 2021 मधील ब्रिक्स शिखर परिषद भारताच्या अध्यक्षतेखाली होणार असून, ही परिषद यशस्वी करण्यासाठी रशिया संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही पुतीन यांनी यावेळी दिली. विविध द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर संपर्कात राहून वेळोवेळी चर्चा करण्यावर यावेळी दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1714747) Visitor Counter : 203