पंतप्रधान कार्यालय

कोविड-19 स्थितीविषयी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन

Posted On: 08 APR 2021 11:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 एप्रिल 2021

 

आपण सर्वांनी वर्तमानातल्या परिस्थितीचे गांभीर्याने विश्लेषण करून अनेक महत्वपूर्ण मुद्दे समोर ठेवले आहेत आणि अनेक आवश्यक सल्लेही दिले आहेत आणि स्वाभाविक गोष्ट म्हणजे, ज्या भागामध्ये कोरोना रूग्णांचा मृत्यू जास्त संख्येने होत आहे, जिथे कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे, त्या राज्यांबरोबर विशेषत्वाने चर्चा केली. मात्र उर्वरित राज्यांकडेही खूप चांगले सल्ले असू शकतात. त्यामुळे माझा आग्रह असा आहे की, आपल्याला जर काही सकारात्मक सल्ले देणे आवश्यक वाटत असेल तर ते जरूर माझ्यापर्यंत पोहोचवावेत. त्याचा उपयोग कोणतीही  रणनीती तयार करताना होऊ शकेल.

आत्ता इथे जे भारत सरकारच्यावतीने आरोग्य सचिवांकडून जे सादरीकरण केले, त्यावरूनही स्पष्ट होते की, पुन्हा एकदा आव्हानात्मक परिस्थिती बनत आहे. काही राज्यांमध्ये ही स्थिती जास्तच चिंताजनक आहे. अशावेळी प्रशासकीय प्रणालीमध्ये सुधारणा करणे अतिशय आवश्यक असते. गेल्या वर्षभरापासून आपण या आजाराच्या विरोधात लढा देत आहोत, या कारणामुळे व्यवस्थाही थकून गेली आहे, व्यवस्था थोडी सैलावू शकते, हे मी समजू शकतो. मात्र या दोन-तीन आठवड्यामध्ये जर आपण ही व्यवस्था कडक करून , कठोरतेने राबविली पाहिजे आणि प्रशासकीय प्रणाली अधिक मजबूत करण्यावर आपण भर दिला पाहिजे.

मित्रांनो,

आजच्या समीक्षेमध्ये काही गोष्टी आपल्या समोर स्पष्ट झाल्या आहेत आणि त्यावर आपल्याला विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

प्रथम म्हणजे देशाने पहिल्या लाटेचा कालावधीतला सर्वोच्च काळ ओलांडला आहे आणि यावेळी हा वाढीचा दर पाहिल्यापेक्षाही जास्त वेगवान आहे.

दुसरे - महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, मध्य प्रदेश आणि गुजरात यांच्यासह काही राज्यांनी पहिल्या लाटेतील  सर्वोच्च टप्पा ओलांडला आहे. आणखी काही राज्येही या दिशेने वेगाने पुढे जात आहेत. मला वाटते की, हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहेगांभीर्याने काळजी करण्याचा विषय आहे.

तिसरी गोष्ट म्हणजे यावेळी लोक पहिल्यापेक्षा खूप जास्त सहजपणे, अगदी हलक्यात हा आजार घेत आहेत. बहुतेक राज्यांमध्ये प्रशासनही सुस्त, ढीले पडल्याचे दिसून येत आहे. अशामध्ये कोरोनाच्या रूग्णासंख्येत अचानक वाढ  झाल्याने अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा एकदा युद्धस्तरावर काम करण्याची आवश्यकता आहे.

मित्रांनो,

अशी सर्व आव्हाने असतानाही, आपल्याजवळ पहिल्यापेक्षा जास्त चांगला अनुभव आहे. आधीच्या तुलनेमध्ये चांगली साधन सामुग्री आहे आणि आता एक लसही आपल्याकडे आहे. लोकांच्या सहभागीदारी बरोबरच आपले अथक परिश्रम करणारे डॉक्टर्स आणि आरोग्य सेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी खूप मदत केली आहे आणि आजही ही मंडळी मदत करत आहेत. आपण सर्वांनी आपल्याला आलेल्या आधीच्या अनुभवांचा प्रभावीपणे उपयोग करणे अपेक्षित आहे.

गेल्या वर्षी या दिवसांमध्ये आपल्याकडची स्थिती कशी होती याची आता आपण आठवण करावी.   आपल्याकडे चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळा नव्हत्या. अगदी मास्क कुठून मिळणार, अशीही चिंता होती. पीपीई संच नव्हते. आणि त्यावेळी आपल्यासाठी लोकांना वाचवण्यासाठी एकमात्र साधन शिल्लक राहिले होते, ते म्हणजे लॉकडाउन. यामुळे आपण व्यवस्था अतिशया वेगाने तयार करू शकणार होतो. आपण ते धोरण स्वीकारले आणि त्याचा चांगला उपयोगही झाला. आपण लॉकडाउनच्या काळात व्यवस्था तयार केली. आवश्यक असणारी साधन सामुग्री उपलब्ध केली. आपल्या क्षमता कमालीच्या वाढवल्या. लॉकडाउनच्या काळाचा पूर्णपणे उपयोग करून घेवून, आपल्याला जे जे हवे होते ते ते सर्व काही संपूर्ण जगामधून आपण मागवून घेतले.

मात्र आजची परिस्थिती वेगळी आहे. आज आपल्याकडे साधन सामुग्री आहे. आपल्याकडे मनुष्य बळ आहे. आता आपल्या प्रशासनापुढे एक कसोटी आहे, ती म्हणजे आपल्याकडे असलेल्या बळाचा उपयोग मायक्रो कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी केला पाहिजे. लहान- लहान प्रतिबंधित क्षेत्रांवर सर्वात जास्त लक्ष दिले पाहिजे. ज्याठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे, त्याभागामध्ये माझा आग्रह असा आहे की, तिथे अगदी शब्दशः अर्थाने ‘कोरोना संचारबंदी’ आहे, असे स्पष्ट करावे आणि ही कोरोना संचारबंदी कडकपणे अंमलात आणली जावी. यामुळे समाजामध्ये कोरोनाविषयी एक जागरूकता कायम राहील.

काही बुद्धिवंत अशी चर्चा करतात की, कोरोना काय फक्त रात्रीच होतो काय? वास्तविक जगात इतरत्रही रात्रीच्या संचारबंदीचा प्रयोग स्वीकारला आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला संचारबंदीची वेळ झाली की, लक्षात येते, आपण सध्या कोरोना काळामध्ये जगत आहोत आणि उर्वरित जनजीवनावर कमीत कमी परिणाम होतो .

एक चांगली गोष्ट होईल की, आपण कोरोना संचारबंदी रात्री 9.00 किंवा रात्री 10.00 वाजता सुरू केली आणि सकाळी 5 - 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू ठेवली तर इतर व्यवस्थांवर जास्त कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही आणि म्हणूनच त्याला ‘कोरोना संचारबंदी’  असे नाव प्रचलित करणे योग्य ठरेल. आणि कोरोना संचारबंदी ही एक प्रकारे लोकांना शिक्षित करण्याचे, जागरूक करण्ण्याचे काम करत आहे. लोकांमध्ये कोरोनाविषयक दक्षता निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यामुळे आपल्याला या दृष्टीने लक्ष देण्याची गरज आहे.... मात्र मी आधी सांगितले आहेच, आता आपल्याकडे व्यवस्था पुरेशी झाली आहे. त्यामुळे मायक्रो कंटेनमेंट झोन करून, त्यावर लक्ष केंद्रीत केले जावे. तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. अर्थात यासाठी सरकारांना जरा परिश्रम जास्त घ्यावे लागणार आहेत. प्रशासनाला अगदी मजबूत, घट्ट, कठोर व्हावे लागणार आहे. प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारकाईने निरीक्षण करावे लागणार आहे. मात्र हे परिश्रम कामी येतील, असा माझा विश्वास आहे.

दुसरी गोष्टआपण गेल्यावेळी कोविडचा आकडा दहा लाख सक्रिय रूग्णांपासून तो  सव्वा लाखापर्यंत खाली आणून दाखवला आहे. ही गोष्ट करण्यासाठी जी रणनीती कामी आली, तीच आजही तितकीच उपयोगाची ठरणार आहे. त्याचे कारण म्हणजे, त्यावेळी रूग्णसंख्या कमी करण्यामध्ये आपणच यशस्वी झालो होतो. त्यावेळी वास्तविक साधन सामुग्रीचा अभाव होता. आता तर साधन सामुग्री भरपूर आहे आणि आता आपल्याकडे अनुभवही भरपूर आहे. आणि म्हणूनच आपण या उच्च स्तरावर गेलेला आलेख अतिशय वेगाने खाली आणू शकणार आहे. त्याचबरोबर या आलेखाची उंची वाढणे आपण रोखूही शकणार आहे.

आणि अनुभव असे सांगतो की, ‘टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ तसेच  कोविडयोग्य वर्तन आणि कोविड व्यवस्थापन या गोष्टींवर आपल्याला भर द्यावा लागणार आहे. आणि आपण पहाल, आता एक विषय असा आला आहे- मी आपल्या सर्व मुख्यमंत्र्यांना आग्रह करतो की, तुम्ही तुमच्या राज्यांची कार्ययंत्रणेव्दारे थोडे जर विश्लेषण केले, सर्वेक्षण केले तर एका प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळू शकेल का? मी याला प्रश्नाच्या स्वरूपामध्ये विचारतोय. होते असे की, अलिकडच्या दिवसांमध्ये कोरोनामध्ये थोडा बदल झाल्याची चर्चा  आहे. मात्र आपण सर्वांनाही त्याचा उल्लेख राज्यांमध्ये करता येईल.... आधी कोरोनाचे स्वरूप कसे होते, साधारण, किरकोळ लक्षणे दिसली तरीही लोक घाबरत होते. आणि लोक लगेच संरक्षणात्मक कृती करीत होते. दुसरे म्हणजे, अलिकडच्या दिवसात लक्षण न जाणवणा-या, लक्षणे न दिसून येणा-या रूग्णांची संख्या जास्त आहे. आणि त्यामुळे हा आजार तर साधा सर्दी -खोकला आहे, असे त्यांना वाटते.

कधी-कधी तर सर्दी-खोकला, किरकोळ ताप असल्याचेही लक्षात येत नाही. आणि त्यामुळे सगळेजण कुटुंबामध्ये नेहमीप्रमाणेच दिवस एकत्रित घालवत असतात. आणि त्याचा परिणाम म्हणजे संपूर्ण परिवाराला या आजाराची लागण होते. आणि मग त्याचे गांभीर्य वाढते. कुटुंबामध्ये सर्वांनाच कोरोना झाल्याचे दिसून येते. आज ते संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब या आजाराच्या विळख्यात सापडलेले दिसते, त्यावेळी त्याचे मूळ कारण शोधले जाते आणि ज्यांना कोरोना झालेला असतो परंतु त्यांची लक्षणे दिसत नसतात, असा ‘असिम्टमॅटिक’ कोरोना घरातल्या कुणाला तरी झालेला असल्याचे लक्षात येते. लक्षणे दिसत नसल्याने सगळ्यांनी दक्षताही घेतलेली नसते. या सर्व गोष्टींवर उपाय काय आहे- त्याचा उपाय म्हणजे ‘प्रोअॅक्टिव्ह टेस्टींग’ आपण जितक्या जास्त चाचण्या करू, तितक्या प्रमाणात लक्षणे दिसून न येणारे असिम्टमॅटिक रूग्ण कोण आहेत, हे लक्षात येईल. अशा रूग्णांचे परिवारामध्येच, घरामध्ये विलग करणे शक्य होर्हल. तसेच त्यांना आपल्या कुटुंबामध्येच राहता येईल. मात्र सर्वांबरोबर त्या व्यक्तीला एकत्रित राहता येणार नाही. त्या रूग्णाचे विलगीकरण केले नाही तर, संपूर्ण परिवाराला कोरोनाची बाधा होऊ शकणार आहे. हे टाळण्यासाठी, एका व्यक्ती रूग्ण असली तरीही उर्वरित कुटुंबाला रोग होण्यापासून वाचवू शकणार आहे.

आणि म्हणूनच आपण आत्ता जितकी चर्चा लसीकरणाची करतो आहोत, त्यापेक्षाही जास्त चर्चा आपल्याला चाचण्यां करण्याविषयीही केली पाहिजे. चाचण्या करण्यावर भर  देण्याची गरज आहे. आणि आपण स्वतःहून चाचणी करण्यासाठी गेले पाहिजे. त्या व्यक्तीला त्रास झाल्यानंतर आपण चाचणी करायला जाणार, मग त्यानंतर त्याचे पाॅझिटिव्ह-निगेटिव्ह अहवाल मिळणार आणि औषधोपचार सुरू होणार. मला वाटते की, या सर्वांमध्ये थोडा बदल करण्याची गरज आहे.

आपल्याकडे विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी एक प्रमुख उपाय आहे. आपण ‘ह्यूमन होस्टला कंटेन’ करू शकतो. यापूर्वीही हे सांगण्यात आले आहे की, कोरोना अशी गोष्ट आहे की, जोपर्यंत आपण त्याला घेत नाही, स्वीकारत नाही तोपर्यंत तो काही आपल्या घरी, आपल्याबरोबर येत नाही. तो स्वतःहून तुमच्याकडे येत नाही. तुम्ही त्याला आणता. आणि म्हणूनच त्याला वाहून नेणारे जे जे मानवी स्त्रोत आहेत, त्या प्रत्येकाला आपण जागरूक करण्याची गरज आहे. त्यासाठी नियमांचे पालन केले पाहिजे. असे करणे खूप आवश्यक आहे. आणि निश्चितच यामध्ये टेस्टिंग आणि ट्रॅकिंग यांची खूप मोठी भूमिका आहे. आपण चाचण्या करण्याचे काम अगदी किरकोळ आहे, असे समजू नये. चाचण्यांचे प्रमाण आपल्याला प्रत्येक राज्यांमध्ये इतके वाढवले पाहिजे की, सकारात्मकता दर काहीही करून पाच टक्क्यांच्या खाली आणून दाखवला पाहिजे. आणि आपल्या सर्वांच्या लक्षात असेल, प्रारंभी ज्यावेळी कोरोनाच्या बाातम्या यायला लागल्या होत्या, त्यावेळी आपल्याकडे स्पर्धा सुरू झाली होती. अमूक एक राज्य तर नाकर्ते आहे, तिथे कोरोना खूप वाढला आहे. तमूक एक राज्य याबाबत खूप चांगले काम करीत आहे, असे म्हटले जात होते. राज्यांवर टीका करणे एक खूप मोठी फॅशन आली होती. त्यावेळी मी पहिल्या बैठकीमध्ये मी आपल्या सर्वांना सांगितले होते की, संख्या वाढत असल्याची तुम्हीही थोडीसुद्धा चिंता करू नये. यामुळे तुमची कामगिरी खराब आहे, या गोष्टीचा तणाव घेऊ नका. तुम्ही चाचण्यांवर भर द्या... आणि आज पुन्हा एकदा तीच गोष्ट सांगतोय, रूग्णसंख्या जास्त आहे, म्हणजे तुम्ही चुकीचे काम करीत आहात, असा विचार करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही चाचण्या जास्त करीत आहात म्हणूनच तर पाॅझिटिव्ह रूग्ण सापडत आहेत. आणि या संकटातून बाहेर पडण्याचा रस्ता हाच आहे. आणि जे कोणी टीका करीत आहेत, त्यांचे बोलणे थोडे दिवस तुम्हाला ऐकावे लागेल, इतकेच.

आणि आपले लक्ष्य 70 टक्के आरटी-पीसीआर चाचण्या करण्याचे आहे. काही ठिकाणांवरून मला बातम्या आलेल्या आहेत, त्याची  शहानिशा अद्याप मी केलेली नाही. काही लोक ज्या आरसी-पीसीआर चाचण्या करतात, त्यामध्ये जे नमुने घेतात, या कामामध्ये खूप ढिसाळपणा करतात. तोंडाच्या समोरच्या बाजूचा नमूना घेतात. जर तुम्ही तोंडाच्या अगदी आतमध्ये उपकरण घालून नमूना घेतला नाही, तर योग्य-बरोबर अहवाल मिळणार नाही. जर तुम्ही वरवरच्या भागातून, तोंडामध्ये अगदी पुढेथोडेसेच उपकरण घालून नमूना घेतला तर त्याचा निकाल निगेटिव्हच येईल. म्हणूनच जोपर्यंत नमूना घेण्यासाठी वापरली जाणारी सूई-उपकरण संपूर्णपणे आत घातली जात नाही आणि योग्य प्रकारे नमूने घेतले जाणार नाहीत, तोपर्यंत त्या राज्यांमध्ये कोरोना रोखणे शक्य होणार नाही. म्हणूनच चाचण्या अगदी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग भलेही त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या वाढली तरीही चिंता करू नये.  पॉझिटिव्ह केसेस बाहेर आल्या तर त्यांच्यावर उपचारही सुरू होतील. मात्र जर पॉझिटिव्ह असलेले लोक लक्षातच आले नाहीत तर ते संपूर्ण घरामध्ये कोरोनाचा प्रसार करतील. संपूर्ण कुटुंब, पूर्ण गल्ली, हे लोक जिथे जिथे जातील, तिथल्या तिथल्या लोकांना कोरोनाच्या विळख्यात घेतील.

आपण गेल्या बैठकीमध्ये यावर चर्चा केली होती की, आरटी-पीसीआर चाचण्या वाढविण्याची खूप आवश्यकता आहे पुन्हा एकदा आत्ताही मी सांगतो की, नमूने घेण्याचे काम अगदी योग्य पद्धतीने, होणे गरजेचे आहे. तुम्ही सर्वांनी पाहिले असेल की, काही प्रयोगशाळा सर्व नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह देत आहेत, तर काही प्रयोगशाळा सर्वांना पॉझिटिव्ह अहवाल देत आहेत. हे तर काही चांगले चित्र नाही. यावरून लक्षात येते, चाचण्यांच्या कामामध्ये काही ना काही, कुठे ना कुठे कमतरता रहात आहे. नेमकी कोणती कमतरता आहे, हे प्रशासकीय माध्यमातून आपल्याला तपासले पाहिजे. काही राज्यांना यासाठी पायाभूत सुविधा वाढविण्याची आवश्यकता आहे. हे काम जितक्या वेगाने केले जाईल, तितकी मदत कोरोना रोखण्यात होणार आहे.

प्रयोगशाळांमध्ये कामांचे तास वाढविण्याची आवश्यकता असेल, तर मी मला वाटते की हे काम केले पाहिजे. त्याचबरोबर ज्याप्रमाणे मी प्रारंभी सांगितले, प्रतिबंध लावलेल्या क्षेत्रातही चाचण्या करण्यावर आपल्याला भर दिला पाहिजे.... जो भाग प्रतिबंधित केला जाईल, त्या क्षेत्रातली एकही व्यक्ती चाचणीबिना राहणार नाही, याची खात्री करून घेतली पाहिजे. याचे परिणाम किती चांगले आणि लगेच दिसून येत आहेत. हे  तुम्हाला  कळेल .

मित्रांनो,

जोपर्यंत चाचण्यांचा प्रश्न आहे, प्रशासकीय स्तरावर प्रत्येक संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांना ट्रॅक करणे, त्यांची चाचणी करणे आणि त्यांना प्रतिबंध करणे, या गोष्टीही वेगाने होण्याची गरज आहे. 72 तासांमध्ये संपर्कात आलेल्या संबंधित 30 जणांचा शोध  घेण्याचे आपले लक्ष्य असले पाहिजे. यापेक्षा कमी लक्ष्य ठेवून चालणार नाही. एका  व्यक्तीविषयी माहिती मिळाली तर त्याच्या संपर्कात आलेल्या 30 संबंधित लोकांपर्यंत पोहोचून आपण त्यांच्याही चाचण्या केल्या पाहिजेत. प्रतिबंधित क्षेत्रांची सीमाही स्पष्ट केली पाहिजे. यामध्ये अस्पष्टता असता कामा नये. संपूर्ण गल्लीच्या गल्ली, तो भागच्या भाग प्रतिबंधित करण्याचे काम करू नये. एखाद्या सहा मजली इमारतीतल्या दोन फ्लॅटमध्ये कोरोनाचे रूग्ण असतील तर केवळ तेवढाच भाग प्रतिबंधित करण्यात यावा. त्याच्याच शेजारी दुसरी इमारत असेल, ती प्रतिबंधित करू नये, त्याविषयी नंतर विचार करता येईल. नाहीतर काय होईल की, आपल्याला काम करणे सोपे जातेय, परिश्रम कमी करावे लागतात, म्हणून सगळेच क्षेत्र प्रतिबंधित करण्याचे काम करू नये. या दिशेने जाऊ नये.

आपल्या सतर्क राहण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता येऊ नये, अशा दिशेने आपण सक्रिय राहिले पाहिजे. असाच माझा आग्रह असणार आहे. ‘कोविड फटिग’  येत असल्यामुळे आपण आता करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये मंदावत, सुस्तावत जाणे, कोणत्याही प्रकारे योग्य ठरणार नाही. आपल्या प्रयत्नांमध्ये कमतरता येणार नाही, हे आपण सुनिश्चित केले पाहिजे. अनेक राज्यांनी कोरोना रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा तपास करण्यासाठी आणि वारंवार पडताळणी करण्यासाठीही टीम्स बनवून काम केले आहे. त्यामुळे त्याचे परिणाम  चांगले मिळाले आहेत.

आपल्या सर्वांचा असाही अनुभव आहे की, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये आरोग्य मंत्रालयाने निश्चित केलेल्या कार्य पद्धतीनुसार काम चालते.... आणि मला असे वाटते की, ही कार्य पद्धती आलेल्या अनुभवातून तयार केली आहे. वेळो-वेळो त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे... त्या कार्यपद्धतीचे (एसओपी) प्रभावी पालन करण्यात येत आहे, त्या ठिकाणी खूप चांगले परिणाम दिसून येत आहेत. म्हणूनच माझा सल्ला आहे की, याकडे सर्वांनी विशेष लक्ष द्यावे.

मित्रांनो,

आजच्या चर्चेमध्ये मृत्यूदराविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. मृत्यूदर कमीत कमी रहावा, यावरही आपल्याला भर दिला पाहिजे. आणि त्याचे मूळ कारणही हेच आहे की, जे दैनंदिन आयुष्य जगत आहेत, या आजाराला अतिशय किरकोळ मानत आहे, संपूर्ण परिवारामध्ये हा आजार पसरवित आहेत. नंतर एकदम परिस्थिती बिघडली की रूग्णालयामध्ये जात आहेत. त्यानंतर हे लोक चाचणी करतात. अशावेळी सगळी परिस्थितीच आपल्या हातून निसटून जाते. आपल्याकडे प्रत्येक रूग्णालयामधून मृत्यूंविषयीच्या विश्लेषणाची माहिती असली पाहिजे. कोणत्या टप्प्यावर आजाराची माहिती समजली, त्यानंतर रूग्ण कधी दाखल झाला, रूग्णाला आधीपासून कोण-कोणते आजार होते, मृत्यूच्यामागे अन्य कोणते घटक कारणीभूत असू शकतात, हा डाटा जितका सर्वंकष असेल, तितक्या प्रमाणात जीवन वाचविणे खूप सोपे होणार आहे.

मित्रांनो,

एम्स दिल्लीच्यावतीने दर मंगळवारी आणि शुक्रवारी या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात येते, याची माहिती तुम्हा सर्वांना असेलच. या वेबिनारमध्ये संपूर्ण देशभरातले डॉक्टर्स एम्सबरोबर जोडले जातात. अशा वेबिनारच्या माध्यमातून त्यांच्याशी सातत्याने संपर्कात राहिले पाहिजे. सर्व राज्यांनीही संपर्कात राहून जी राष्ट्रीय वैद्यकीय व्यवस्थापन कार्यपद्धती सुरू आहे, त्याची माहिती सर्वांनी घेणे जरूरीचे आहे. ही संपर्क यंत्रणा सतत सुरू आहे. जे लोक वैद्यकीय शाखेचे आहे, त्यांना या वेबिनारच्या माध्यमातून जी वैद्यकीय भाषेतून दिली जाणारी माहिती समजते, तीच माहिती लोकांना समजेल  अशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करायचे आहे. या वेबिनार सुविधेचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे. याचप्रमाणे अॅम्ब्युलन्स, व्हँटिलेटर्स आणि ऑक्सिजन यांच्या उपलब्धतेविषयी सातत्याने आढावा घेण्याची गरज आहे. आत्तापर्यंत ज्यावेळी पहिल्या लाटेत आपण अगदी ‘पिक’वर होतो, आजही देशामध्ये तितक्या प्रमाणावर ऑक्सिजनचा उपयोग केला जात नाही, असे दिसून येत आहे. आणि म्हणूनच एकदा विश्लेषण करून या गोष्टींचा अहवाल तयार करावा, सर्व व्यवस्था आणि गोष्टींची आपण पडताळणी करून घेतली पाहिजे.

मित्रांनो,

एका दिवसामध्ये आपण 40 लाख जणांच्या लसीकरणाचा आकडाही पार केला आहे. लसीकरणाविषयीचे अनेक महत्वाचे मुद्दे आजच्या चर्चेत  आपल्या समोर आले आहेत. असे आहे पहा, लसीकरणाच्या कामासाठीही आपल्या अधिका-यांना सहभागी करून घ्यावे. जगातल्या सर्वाधिक समृद्ध देशांकडे सर्व काही सुविधा उपलब्ध आहेत, त्यांनीही लसीकरणाचे नियम निश्चित केले आहेत. भारत काही त्यांच्यापेक्षा वेगळा नाही. आपण जरा अभ्यास तरी करावा, आपण शिकलेलो लोक आहोत, आपल्या आजूबाजूला थोडे तरी पहावे.

नवीन लस विकसित करण्यासाठी जे काही प्रयत्न सुरू आहेत, तसेच लस निर्मिती, उत्पादनाचे काम कमाल क्षमतेचा वापर करून सुरू आहे. लस विकसित करण्यापासून ते पुरेसा साठा तयार करणे, वाया जाण्याचे प्रमाण या आवश्यक मुद्यांवरही आज चर्चा झाली आहे. नेमकी किती लस बनू शकते, ही गोष्ट तर तुम्हाला माहिती आहेच. आता एका रात्रीतून मोठ-मोठ्या लस उत्पादन करणा-या फॅक्टरी उभ्या राहू शकतात, असे तर काही होऊ शकणार नाही. आपल्याकडे जे काही उपलब्ध आहे, त्यामध्येच आपल्याला प्राधान्यक्रम निश्चित केला पाहिजे. कोणा एका राज्यामध्ये सर्व माल ठेवून आपल्याला योग्य तो परिणाम मिळू शकेल, असा विचार करणे बरोबर होणार नाही. आपल्याला संपूर्ण देशाचा विचार करून त्याचे व्यवस्थापन केले पाहिजे. कोविड व्यवस्थापन हा एक खूप महत्वाचा हिस्सा आहे. यामध्ये लस वाया जाण्याचे प्रमाणही खूप कमी केले पाहिजे.

मित्रांनो,

लसीकरणाविषयी राज्य सरकारांनी दिलेले सल्ले, केलेल्या शिफारसी आणि दिलेली सहमती यांच्या मदतीनेच देशव्यापी रणनीती तयार करण्यात आली आहे. माझा आपल्या सर्वांना आग्रह आहे की, जिथे रुग्णसंख्या खूप जास्त आहे  अशा जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे, त्या जिल्ह्यांमध्ये 45 वयाच्या वरील सर्वच्या सर्व  अगदी शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात यावा. एकदा हे लक्ष्य साध्य करून त्याचे परिणाम पहा. आणखी एक सल्ला मी देतो.  11 एप्रिल, या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि 14 एप्रिल रोजी बाबासाहेब यांची जयंती आहे. आपण 11 ते 14 एप्रिल या कालावधीमध्ये आपआपल्या राज्यांमध्ये ‘लसीकरण उत्सव’ साजरा करू शकलात तर  सर्वत्र एक वेगळेच वातावरण निर्माण होऊ शकेल. आणि या काळात बहुतांश जणांचे लसीकरणही होईल.

एक विशेष अभियान सुरू करून आपण जास्तीत जास्त पात्र लोकांचे लसीकरण करावे. लस वाया जाण्याचे प्रमाण शून्यावर आणण्याचा निर्धार करावा. या चार दिवसांमध्ये ‘लसीकरण उत्सवा’मध्ये लस अजिबात वाया गेली नाही तर, आपल्या लसीकरणाच्या क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. आपल्या लसीकरण क्षमतेचा कमाल वापर करण्याचा निर्धार आपण करावा. दि. 11 ते 14 एप्रिल या काळात लसीकरण उत्सवाला कशा पद्धतीने प्रोत्साहन देऊ शकतो, हेही एकदा व्यवस्थित पहावे. यामुळे आपण काही तरी साध्य केल्याचे समाधान नक्कीच मिळेल..भोवतलच्या परिस्थितीत  बदल घडून येवू शकेल आणि भारत सरकारला ही मी सांगितले आहे की, जितक्या मोठ्या प्रमाणात आपण लस पोहोचवण्याचे काम करू शकतो, तितके प्रयत्न करण्यात यावेत. या ‘लसीकरण उत्सवा’मध्ये जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. विशेष म्हणजे पात्र वर्गातल्या सर्व व्यक्तींना लस दिली पाहिजे.

मी देशातल्या युवकांना आग्रह करू इच्छितो की, तुम्हीसुद्धा आपल्या आजूबाजूच्या 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना लस मिळू शकेल, यासाठी प्रयत्न करावेत. नवतरूणांना मी विशेष आवाहन करतो की, तुम्ही सुदृढ आहात, सामर्थ्‍यवान आहाततुम्ही खूप काही करू शकता.  माझ्या देशाच्या  नवतरूणाने कोरोनायोग्य वर्तन पद्धती काय आहे, कार्य शिष्टाचार कसा  आहे, सामाजिक अंतराचे पालन करणे आहे, मास्क वापरण्याची गोष्ट आहे, यांचे पालन केले पाहिजे. इतकेच नाही तर यासाठी तुम्ही नेतृत्व केले पाहिजेनवतरूणांपर्यंत पोहोचण्याइतकी ताकद या कोरोनाची अजिबात नाही.

अशा पद्धतीने काळजी घेण्यावर नवतरूणांनी भर दिला पाहिजे. युवकांनी लसीकरण करून घ्यावे, असा आपण आग्रह करण्यापेक्षाही त्यांनी कोरोनायोग्य वर्तन करणे आवश्यक आहे, यासाठी त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. जर आपल्या तरूणांनी कोरोनायोग्य वर्तन करण्याचा स्वतःहून संकल्प केला आणि  इतरांनाही तसे करण्यास भाग पाडले तर आपल्या लक्षात येईल, आपण पुन्हा एकदा कोरोनाचा आलेख खालच्या टप्प्यापर्यंत आणू शकणार आहोत . हा विश्वास मनात बाळगूनच आपण पुढची वाटचाल करायची आहे.

सरकारने एक डिजिटल व्यवस्था तयार केली आहे. त्यामुळे लोकांना लसीकरण करताना मदत होत आहे. त्या व्यवस्थेविषयी लोकांना चांगला अनुभव येत असल्याचे अनेकांनी लिहून कळवलेही आहे. ‘लस घेताना मला खूप चांगला अनुभव आला,’ असे लोक सांगतात. मात्र या डिजिटल व्यवस्थेबरोबर जोडले जाताना त्यांना काही त्रास होत असतो. ज्याप्रमाणे गरीब परिवार असेल आणि त्यांना तंत्रज्ञानाची फारशी माहिती नसेल, तर त्रास होतो. माझे नवतरूणांना आवाहन आहे की, अशावेळी त्यांनी या परिवारांची मदत करण्यासाठी पुढे यावे. आपले राष्ट्रीय छात्र सेनेचे सदस्य असोत, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी असो, त्यांनी आपल्या राज्यांतल्या सरकारच्या व्यवस्थेबरोबर थोडे काम करावे, म्हणजे त्यांना थोडी मदत मिळू शकेल. आपल्याला याबाबतीत चिंता केली पाहिजे.

देशातील शहरांमध्ये खूप मोठा गरीब वर्ग आहे. वृद्ध मंडळी आहेत, झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत, त्यांच्यापर्यंत लसीकरण पोहोचले पाहिजे. त्यांना आपण लसीकरणासाठी नेले पाहिजे. या गोष्टीसाठी आपल्या कार्यकर्त्यांना , स्थानिक, सामाजिक संस्थांना, आपल्या नवतरूणांना राज्य सरकारांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. आणि त्यांना प्राधान्य देऊन लस लावण्याचा प्रयत्न आपला असला पाहिजे. हे काम तर पुण्याचे आहे, त्यामुळे मानसिक समाधान, आनंद मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला या गरीब लोकांची चिंताही केली पाहिजे. लसीकरणाबरोबरच आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे, लस टोचून घेतल्यानंतरही  बेपर्वाई वाढून उपयोग नाही. सर्वात मोठे संकट आता असे बनले आहे की, मी लस घेतली आहे, त्यामुळे आता मला काहीही होणार नाही, असे अजिबात म्हणता येणार नाही. अगदी पहिल्या दिवसापासून मी सांगत आलो आहे की, औषध, लस घेणेही गरजेचे  आणि कठोरतेने कोरोनायोग्य वर्तनाचे पालनही केले पाहिजे.

आपल्याला लोकांना हे वारंवार सांगितले पाहिजे की, लस घेतल्यानंतरही मास्क आणि इतर गोष्टींचे, नियमांचे पालन करणे आवश्यक आणि अनिवार्य आहे. व्यक्तिगत पातळीवर मास्क लावण्याची  आणि दक्षता पाळण्याविषयी बेपर्वाई दिसून येत आहे. त्यासाठी पुन्हा एकदा जागरूकता आणणे जरूरी झाले आहे. जागरूकतेच्या या मोहिमेत, आपल्याला पुन्हा एकदा ज्यांचा समाजावर खूप जास्त प्रभाव आहे, त्या व्यक्तींना, सामाजिक संघटना, सेलेब्रिटीज, मत तयार करू शकणारे मान्यवर, अशा लोकांची मदत घेतली पाहिजे. यासाठी माझा आग्रह आहे की, ‘राज्यपाल’ नावाची आपल्याकडे एक प्रभावी संस्था आहे, त्यांचाही भरपूर प्रमाणात उपयोग करून घ्यावा.

सर्वात प्रथम राज्यपाल साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन राज्यांनी करावे. राज्यात सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात यावी. त्या सर्वपक्षीय बैठकीतच कृतीयोजनेचे मुद्दे निश्चित करण्यात यावेत. त्यानंतर माझा आग्रह असा आहे की, राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री यांनी मिळून जितकेही निवडून आलेले सदस्य आहेत, त्यांचे एक आभासी वेबिनार आयोजित करावे. पहिल्यांदा नागरी स्थानिक स्वराज्य  संस्थांना त्यामध्ये सहभागी करून घ्यावे. नंतरच्या टप्प्यात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी हे  करण्यात यावे. जितके लोक निवडून आले आहेत, लोकप्रतिनिधी आहे, त्यांच्यासाठी वेबिनारचे आयोजन केले जावे, त्यांच्या समोर सर्वांनी आपल्या विधानसभेत जे जिंकून आलेली मंडळी आहे, त्यांचे जे सभागृह नेते आहेत, त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावे. यामुळे एक सकारात्मक संदेश जाण्यास आपोआप प्रारंभ होईल. यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही... सर्वांनी मिळून हे करायचे आहे. असा एक प्रयत्न केला जावा, असे मला वाटते.

दुसरे म्हणजे राज्यपालांच्या नेतृत्वामध्ये हे करावे, याचे कारण म्हणजे, मुख्यमंत्र्यांना इतर अनेक कामे असतात. मात्र राज्यपालांच्या नेतृत्वाखाली एखादी परिषद, मोठे वेबिनार केले गेले आणि त्याचवेळी स्थानिक पातळीवरची मंडळीशहरातील मान्यवर, सर्व धार्मिक नेते, यांना बोलावून अशी शिखर परिषद भरविण्यात यावी यामध्ये इतर लोकांनाही आभासी पद्धतीने सहभागी करून घ्यावे. सामाजिक संस्थांमधली मंडळी आहे, एखादी परिषद त्यांचीही करावी. जे सेलिब्रेटीज आहे, लेखक आहेत, खेळाडू आहे, त्यांनाही एकदा सहभागी करून घ्यावे.

मला वाटते की, राज्यपालांच्या माध्यमातून अशा प्रकारे समाजातल्या विविध वर्गाला, लोकांना जोडले गेले तर एक चळवळ सुरू होईल. ही मान्यवर मंडळी सर्वांना सांगतील की, जनतेने कोविडयोग्य वर्तन कसे ठेवणे गरजेचे आहे, चाचणी करून घेणे किती आवश्यक आहे. आपल्याकडे  आता असे झाले आहे की, आपण चाचण्या करण्याचे जणू विसरूनच गेलो आहोत. आणि लसीकरण करीत आहोत. लसीचे उत्पादन जस जसे होईल, तस-तशी ती सर्वत्र मिळायला लागेल. आपण लस नसतानाही सर्वांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली होती. ज्यावेळी लस येईल की येणार नाही, याचा कोणताही भरवसा नव्हता, त्यावेळी आपण हे युद्ध जिंकलो होतो. तर मग आज आपण अशा प्रकारे भयभीत होण्याची गरज नाही. आणि लोकांनाही भयभीत होवू द्यायचेही नाही.

आपण ज्याप्रकारे कोरोनाविरुद्ध लढा दिला होता आणि तो लढा आपण जिंकू शकतो तर आता का नाही जिंकणार. याआधी मी आपल्याला सांगितले आहेच, आता संपूर्ण परिवार कोरोनाच्या विळख्यात सापडतो आहे... त्याचे मूळ कारण मला दिसते आहे, ते म्हणजे... तरीही तुम्ही लोकांनीही एकदा या कारणाची पडताळणी जरूर करावी... मी याविषयी कोणत्याही प्रकारचा दावा करीत नाही. मी फक्त आपल्या सर्वांचे या मुद्याकडे लक्ष वेधत आहे. असिम्टमॅटिक रूग्णांमुळे प्रारंभी कुटुंबामध्ये हा आजार पसरला जातो आणि मग अचानक परिवारामध्ये जी व्यक्ती आधीपासूनच आजारी असते, त्या व्यक्तीला खूप अवघड परिस्थितीचा सामना करावा लागतो. एकदम नवीनच संकट त्याच्यासमोर उभे राहते आणि मग संपूर्ण कुटुंबावरही कोरोनाचे संकट ओढवते.

आणि म्हणूनच माझा आग्रह आहे की , प्रो-अॅक्टिव्हली आपण चाचण्यांवर भर दिला पाहिजे. आपल्याकडे आता व्यवस्था आहे. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रयोगशाळा बनल्या आहेत. एका प्रयोगशाळेपासून आपण प्रारंभ केला होता. आता प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा आहे. आणि आपण या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले नाही तर, मग कसे काय होणार?

माझा आग्रह आहे की, जिथे राजकारण करण्याचा प्रश्न उपस्थित होतो, त्याबाबतीत मी अगदी पहिल्या दिवसापासून पहात आहे की.... अनेक प्रकारची व्यक्तव्ये केली जात आहेत. अशी व्यक्तव्ये मी झेलत आहे. परंतु मी कधीही याविषयी प्रत्युत्तर देण्यासाठी आपले तोंड उघडलेले नाही. कारण मी असे मानतो की, हिंदुस्तानच्या लोकांची सेवा करणे ही माझी जबाबदारी आहे.... मला ही पवित्र जबाबदारी पार पाडायची आहे. आपल्यावर ईश्वराने या अतिशय अवघड काळामध्ये सेवा करण्याची जबाबदारी दिली आहे.... आपल्याला ती पार पाडायची आहे. ज्यांना कुणाला यामध्ये राजकारण करायचे असेल त्यांनी करावे... त्यांच्याविषयी मला काहीही बोलायचे नाही. मात्र आपण सर्व मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातल्या सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलावून सर्व प्रकारच्या लोकांना बरोबर घेवून...आपआपल्या राज्यामधली परिस्थिती बदलण्यासाठी पुढे यावे... मला पूर्ण विश्वास आहे की, या संकटालाही आपण पाहता पाहता पार करून त्यातून बाहेर येऊ.

पुन्हा एकदा माझा हाच मंत्र आहे.. ‘दवाई भी -कडाई भी’ या विषयामध्ये कोणत्याही प्रकारे तडजोड केली जावू नये.... मी गेल्यावेळीही सांगितले होते की, आपण जर सर्दी झाली आहे म्हणून औषध घेतले आहे आणि बाहेर पाऊस पडत असताना जर आपण छत्रीचा उपयोग करणार नाही, असा हट्ट केला, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. असे करून चालणार नाही. जर तुम्हाला सर्दी झाली आहे...औषध घेतले आहे.... ती सर्दी बरीही होईल...मात्र जर तुम्हाला बाहेर पावसात जायचे असेल तर छत्रीचा वापर करावा लागेल, रेनकोट घालावाच लागेल. तसेच या कोरोना आजाराचेही आहे. तुम्ही लस घेतल्यानंतरही तुम्हाला कोरोनायोग्य वर्तन करावे लागेल, मास्क घालावा लागेल. या गोष्टी कराव्याच लागणार आहेत.

आणि मी आज हेही सांगतो की, ज्याप्रमाणे आपण गेल्यावेळेस कोरोनावर नियंत्रण आणले होते, तसेच आपण यावेळी कोरोनाला नियंत्रणात आणणार आहोत. माझा पूर्ण विश्वास आहे आणि माझा तुम्हा सर्वांवर भरवसा आहे. तुम्ही जर या कामामध्ये पुढाकार घेतला, चिंता केलीत आणि चाचण्या करण्याच्या कामाकडे लक्ष केंद्रीत केले तर खूप चांगले होईल. लसीकरणाची व्यवस्था आता दीर्घकाळासाठी आहे. ही व्यवस्था निरंतर सुरू ठेवावी लागणार आहे.... ती तर आपण सुरू ठेवणारच आहोत... आज आपल्याला भर द्यायचा आहे तो ‘लसीकरण उत्सव’ करून एक ‘ब्रेकथ्रू’ मिळवणे निश्चित केले पाहिजे. या लसीकरण उत्सवामध्ये आपण एक नवीन यश प्राप्त करावे. एक नवीन विश्वास निर्माण करण्यासाठी एक लहानशी संधी कामी येऊ शकते.

आपल्याकडून आणखी काही सल्ले, शिफारसी येतील, याची मी प्रतीक्षा करतो.

खूप-खूप धन्यवाद !!

Jaydevi PS/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1710862) Visitor Counter : 563