कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने हाती घेतलेल्या कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजनांचा केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्याकडून आढावा
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे/ सूचनांचे पालन करण्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांचे विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना आवाहन
Posted On:
07 APR 2021 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 एप्रिल 2021
कोविड रुग्णसंख्येत सध्या अतिशय झपाट्याने झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने या महामारीच्या फैलावाला प्रतिबंध करण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री( स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज आढावा घेतला.
या बैठकीला केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे सचिव दीपक खांडेकर, केंद्रीय प्रशासकीय सुधारणा सचिव इंदेवर पांडे, केंद्रीय सचिव आणि आस्थापना अधिकारी के श्रीनिवासन आणि कार्मिक आणि प्रशिक्षण(डीओपीटी), प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण(एआरपीजी) आणि निवृत्तीवेतन विभागासह कार्मिक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सध्याच्या काळात अतिशय वेगाने वाढलेल्या कोविड रुग्णंसंख्येच्या पार्श्वभूमीवर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने एक कार्यालयीन निवेदन जारी केले आहे आणि 45 वर्षांवरील सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःचे लसीकरण करून घ्यावे अशी सूचना केली आहे. त्याचबरोबर या सरकारी कर्मचाऱ्यांनी लसीकरणानंतरही कोविड प्रतिबंधक सुयोग्य आचरणाचे पालन सुरू ठेवण्याची देखील या विभागाने सूचना केली आहे.
कोविड-19 संसर्गाचा फैलाव रोखण्याच्या उद्देशाने कार्मिक आणि प्रशिक्षण विभागासह कार्मिक मंत्रालयाकडून वेळोवेळी सूचना आणि मार्गदर्शक नियम जारी केले जातात असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी या बैठकीची माहिती प्रसारमाध्यमांना देताना सांगितले. या परिस्थितीवर सरकार अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि लसीकरणासाठी असलेल्या प्राधान्यक्रमानुसार 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींनी या लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा/ सूचनांचा सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांनी अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांचे आरोग्य चांगले राहण्याबरोबरच, कोविड संसर्गामुळे सरकारी कर्मचारी आजारी पडण्यामुळे होणाऱ्या मनुष्य दिवसांचे नुकसान कमी करण्यासाठी देखील ही बाब अत्यावश्यक आहे, असे ते म्हणाले.
गेल्या एक वर्षात या महामारीच्या काळात केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सरकारी कार्यालयांमध्ये पालन करण्याची गरज असलेल्या नियमावलीचा एक संच तयार केला आहे. केवळ कोरोना विषाणूच्या फैलावाला प्रतिबंध करणेच नव्हे तर सरकारी कार्यालये प्रभावी पद्धतीने आणि कोणत्याही व्यत्ययाविना सुरळीत सुरू ठेवणे हा या नियमावलीचा उद्देश आहे, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
Jaydevi PS/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1710253)
Visitor Counter : 260