संरक्षण मंत्रालय
क्षेपणास्त्र हल्ल्यापासून नौदलाच्या जहाजांचे रक्षण करणारे अद्ययावत चॅफ तंत्रज्ञान संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने केले विकसित
Posted On:
05 APR 2021 3:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 एप्रिल 2021
शत्रूच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापासून नौदलाच्या जहाजांचे रक्षण करणारे अद्ययावत चॅफ तंत्रज्ञान, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था,डीआरडीओने विकसित केले आहे. डीआरडीओच्या जोधपुर इथल्या संरक्षण प्रयोगशाळेने (डीएलजे) या महत्वाच्या तंत्रज्ञानाचे तीन स्वदेशी प्रकार विकसित केले आहेत. भारतीय लष्कराच्या गुणात्मक आवश्यकतांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने लघु पल्ला चॅफ रॉकेट (एसआरसीआर), मध्यम पल्ला चॅफ रॉकेट(एमआरसीआर), दीर्घ पल्ला चॅफ रॉकेट(एलआरसीआर) विकसित करण्यात आले आहे. डीएलजेने यशस्वी रित्या विकसित केलेले अद्ययावत चॅफ तंत्रज्ञान म्हणजे आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.
भारतीय नौदलाने या तीनही प्रकारांच्या अरबी समुद्रात नौदलाच्या नौकेवर नुकत्याच चाचण्या घेतल्या असून या संदर्भातली कामगिरी समाधानकारक आढळली आहे.
शत्रूच्या रडार आणि रेडीओ फ्रिक्वेन्सी क्षेपणास्त्र यापासून नौदलाच्या जहाजांचे संरक्षण करण्यासाठी चॅफ तंत्रज्ञानाचा जगभरात वापर केला जातो. शत्रूच्या क्षेपणास्त्राची दिशा विचलित करून त्यापासून जहाजांचे रक्षण करण्यासाठी हवेत तैनात केलेली अतिशय कमी तीव्रतेची चॅफ सामग्री काम करते यातच याचे महत्व सामावले आहे.
भविष्यातल्या धोक्यांना तोंड देण्यासाठी डीआरडीओचे हे तंत्रज्ञान मोलाचे ठरणार आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान उद्योगांना पुरवण्यात येत आहे.
या कामगिरीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय नौदल आणि उद्योग क्षेत्राचे अभिनंदन केले आहे.
भारतीय नौदलाच्या जहाजांचे रक्षण करणारे हे महत्वाचे तंत्रज्ञान स्वदेशात विकसित करण्यासाठी व्यग्र असलेल्या चमूच्या प्रयत्नाची डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी प्रशंसा केली आहे.
धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचे असलेले हे तंत्रज्ञान कमी कालावधीत स्वदेशात विकसित करून मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी मोकळे केल्याबद्दल व्हाईस एडमिरल जी अशोक कुमार यांनी डीआरडीओच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
* * *
Jaydevi PS/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1709649)
Visitor Counter : 349