पंतप्रधान कार्यालय

बांगलादेशातल्या ओराकांदी ठाकूरबाडी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 27 MAR 2021 5:15PM by PIB Mumbai

जॉय हॉरि बोल! जॉय हॉरि बोल!

 

हॉरि बोल! हॉरि बोल! जॉय हॉरि बोल!

बांगलादेश सरकारचे गणमान्य प्रतिनिधी, कृषी मंत्री डॉक्टर मोहम्मद अब्दुर रज्जाक जी, शेख सेलीम जी, लेफ्टनंट कर्नल मुहम्मद फारूक खान जी, भारताच्या संसदेमधले माझे इतर सहयोगी आणि माझे मित्र  श्री श्री हॉरिचांद ठाकूर जी यांच्या परंपरा आणि मूल्यांचे प्रतिनिधित्व करणारे शांतनू ठाकूर जी, भारतातून आलेले ऑल इंडिया मतुआ महासंघाचे प्रतिनिधी, श्री श्री हॉरिचांद ठाकूरजी यांच्यावर अनन्य श्रद्धा ठेवणारे माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सर्व सन्माननीय मित्रांनो! आपल्या सर्वांना आदरपूर्वक नोमोश्कार!!

आज श्री श्री हॉरिचांद ठाकूर जी यांच्या कृपेने मला ओराकांडी ठाकूरबाडीच्या या पुण्यभूमीला वंदन करण्याचे सौभाग्य मिळाले आहे. मी श्री श्री हॉरिचांद ठाकूर  जी, श्री श्री गुरूचांद ठाकूर जी यांच्या चरणांवर नतमस्तक होऊन वंदन करतो.

आत्ता इथल्या काही मान्यवरांशी चर्चा सुरू असताना त्यांनी सांगितले- कोणीतरी विचार केला होता की, भारताचे पंतप्रधान कधीतरी ओराकांदी येतील. ‘मॉतुवा शॉम्प्रोदाई’ बरोबर जोडली गेलेली जी कोणी व्यक्ती भारतामध्ये वास्तव्य करते, त्या व्यक्तीच्या मनात ओराकांदी येथे आल्यानंतर  ज्या भावना निर्माण होतात अगदी तशाच भावना माझ्या मनामध्ये  आज निर्माण झाल्या आहेत. आज मी इथे येऊन भारतातल्या या समाजाच्या सर्व संबंधितांच्यावतीने या पावन भूमीला चरणस्पर्श केला आहे. या दिवसाची, या पवित्र संधीची प्रतीक्षा मला अनेक वर्षांपासून होती. सन 2015मध्ये ज्यावेळी मी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा बांगलादेशला आलो होतो, त्यावेळीच मी इथे येण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती माझी इच्छा आज पूर्ण झाली आहे.

मला सातत्याने श्री श्री हॉरिचांद ठाकूर जींच्या अनुयायांकडून प्रेम आणि स्नेह मिळत आला आहे. त्यांच्या परिवाराकडून आपलेपणा मिळत आला आहे. मला आज ठाकूरबाडीच्या दर्शनाचा लाभ झाला, यामागे त्यांच्या आशीर्वादाचा प्रभाव आहे, असे मी मानतो.

पश्चिम बंगालमध्ये ठाकूरनगरमध्ये ज्यावेळी मी गेलो होतो, त्यावेळी माझ्या मॉतुवा बंधू-भगिनींनी मला आपल्या परिवारातल्या सदस्याप्रमाणेच खूप प्रेम दिले होते, हे माझ्या स्मरणात आहे. विशेष गोष्ट म्हणजे ‘बॉरो-मॉ’यांचा आपलेपणा, मातेप्रमाणे त्यांनी दिलेला आशीर्वाद, माझ्या जीवनातला अमूल्य क्षण आहे.

पश्चिम बंगालमधील ठाकूरनगर ते बांगलादेशातली ठाकूरबाडीपर्यंत तशीच श्रद्धा, तशीच आस्था आहे. आणि तसाच अनुभव आहे.

मी बांगलादेशाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाबद्दल भारताच्या 130 कोटी बंधू-भगिनींच्यावतीने आपल्या सर्वांना प्रेम आणि सदिच्छा घेऊन आलो आहे. तुम्हा सर्वांना बांगलादेशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा! हार्दिक शुभेच्छा!!

काल ढाका येथे  राष्ट्रीय दिवस कार्यक्रमाच्या काळामध्ये मी बांगलादेशाच्या शौर्य-पराक्रमाचे, त्या संस्कृतीचे अद्भूत प्रदर्शन पाहिले, हे सर्व या अद्भूत देशाने छान सांभाळून ठेवले आहे आणि हे सर्व आपल्या जीवनाचा प्रमुख भाग आहे.

इथे येण्यापूर्वी मी जातिर पिता बॉन्गोबौन्धू शेख मुजिबूर रॉहमान यांच्या ‘शमाधी शौधौ’ येथे गेलो होतो. तिथे श्रद्धांजली अर्पण केली. शेख मुजिबूर रॉहमान जी यांचे नेतृत्व, त्यांचे व्हिजन आणि बांगलादेशाच्या लोकांवर त्यांचा असलेला विश्वास एक आदर्श उदाहरण आहे.

आज ज्याप्रकारे भारत-बांगलादेशाच्या सरकारांनी दोन्ही देशांमध्ये स्वाभाविक संबध मजबूत करीत आहेत, सांस्कृतिक रूपाने हेच काम ठाकूरबाडी आणि श्री श्री हॉरिचांद ठाकूर जी यांचे संदेश दशकांपासून करीत आले आहेत.

एक प्रकारे हे स्थान भारत आणि बांगलादेशाच्या आत्मिक ऋणानुबंधांचे तीर्थस्थान आहे. आपले नाते लोकांपासून ते लोकांपर्यंत आहे. मनापासून मनाचे नाते आहे.

भारत आणि बांगलादेश हे दोन्ही देश आपल्या विकासाने, आपल्या प्रगतीने संपूर्ण विश्वाची प्रगती झालेली पाहू इच्छितात. दोन्हीही देशांना दुनियेमध्ये अस्थिरता, दहशतवाद आणि अशांतता यांच्याजागी स्थिरता, प्रेम आणि शांती नांदावी असे वाटते.

हेच मूल्य, हेच शिक्षण श्री श्री हॉरिचांद ठाकूर देव जी यांनी आपल्याला दिली होती. आज संपूर्ण विश्व ज्या मूल्यांची चर्चा करीत आहे, मानवतेच्या भविष्याचे जे स्वप्न पाहिले आहे, त्या मूल्यांसाठी श्री श्री हॉरिचांद जी यांनी आपले जीवन समर्पित केले होते.

महान कवी महानॉन्दो हालदार यांनी ‘श्री श्री गुरूचांद चॉरितो’मध्ये लिहिले आहे की -

तपशील जाति माधुज्ज जा किछु होयचे।

हॉरीचंद कल्पवृक्ष सॉकली फेलेछे।।

याचा अर्थ असा की, शोषित, पीडित, दलित, वंचित समाजाने ज्याची आशा धरली, जे काही कमावले आहे, ते श्री श्री हॉरिचांद जी यांच्यासारख्या कल्पवृक्षाचेच फळ आहे.

श्री श्री हॉरिचांद जी यांनी दाखवलेल्या मार्गावरून जात असताना आज आपण एक समान, समरस समाजाच्या दिशेने पुढे जात आहोत. त्यांनी त्या काळामध्ये महिलांचे शिक्षण, त्यांची सामाजिक भागीदारी यासाठी काम सुरू केले होते. आज आपण महिला सशक्तीकरणाचे प्रयत्न संपूर्ण विश्वामध्ये केले जात असल्याचे पहात आहोत.

ज्यावेळी आपण श्री श्री हॉरिचांद ठाकूर यांचा संदेश जाणून घेतो, ‘हॉरी -लीला-अमृतो’ याचा पाठ करतो, त्यावेळी असे वाटते की, त्यांनी आगामी युगाचे भविष्य आधीच जाणले होते. त्यांच्याकडे एक दिव्यदृष्टी होती, एक अलौकिक प्रज्ञा होती.

गुलामीच्या त्या कालखंडामध्येही त्यांनी आपली वास्तविक प्रगती कशामध्ये आहे, हे समाजाला सांगितले होते. आज भारत असो अथवा बांगलादेश, सामाजिक एकजूटता, समरसतेच्या त्याच मंत्रांनी आपले भविष्य निर्माण  करीत आहेत. विकासाचे नवनवीन टप्पे गाठत आहेत.

मित्रांनो,

श्री श्री हॉरिचांद देव जी यांच्या जीवनाने आपल्याला आणखी एक शिकवणूक दिली आहे. त्यांनी ईश्वरीय प्रेमाचा संदेशही दिला आहे. मात्र त्याचबरोबर आपण सर्वांना आपल्या कर्तव्यांची जाणीवही करून दिली आहे. त्यांनी आपल्याला सांगितले आहे की, अन्याय आणि दुःख यांच्याविरुद्ध संघर्ष करणे ही सुद्धा साधना आहे.

आज श्री श्री हॉरिचांद देवजी यांचे लाखो-कोट्यवधी अनुयायी आहेत, मग ते भारतामध्ये असो अथवा बांगलादेशामध्ये असो, अथवा इतर कुठेही असो, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून त्यांची वाटचाल सुरू आहे. मानवतेसमोर जी कोणती संकटे येतील, त्यांच्यावर उत्तर शोधण्यात सहकार्य करीत आहेत.

श्री श्री हॉरिचांद ठाकूर जी यांचा वारसा सांभाळणारे शांतौनु ठाकूर जी भारतामध्ये संसदेतले माझे सहकारी आहेत, हे माझे भाग्य आहे. वास्तविक ते वयाने माझ्यापेक्षा लहान असले तरीही मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. याचे कारणही हेच आहे की, त्यांनी श्री श्री हॉरिचांद ठाकूर जी यांची महान शिकवण आपल्या जीवनामध्ये उतरवली आहे. ते खूप कठोर परिश्रमी  आहेत. समाजातल्या लोकांविषयी त्यांना असलेल्या सहवेदनेमुळे ते दिवसरात्र कार्य करीत राहण्याचा प्रयत्न करतात.

मित्रांनो,

आज भारत आणि बांगलादेश यांच्यासमोर, ज्या प्रकारची समान आव्हाने आहेत, त्यांच्यावर तोडगा काढण्यासाठी श्री श्री हॉरिचांद देव जी यांच्या प्रेरणा महत्वाच्या ठरतात. दोन्ही देशांनी मिळून प्रत्येक आव्हानांचा सामना करणे गरजेचे आहे. हेच आपले कर्तव्य आहे, आजच्या काळाचा विचार करता दोन्ही देशांच्या कोट्यवधी लोकांच्या कल्याणाचा हाच मार्ग आहे.

कोरोना महामारीच्या काळामध्ये भारत आणि बांगलादेश, या दोघांनीही आपले सामर्थ्य सिद्ध करून दाखवले आहे. आज दोन्ही देश या महामारीचा मजबूतीने सामना करीत आहेत. आणि अगदी एकत्रितपणे लढा देत आहेत. मेड इन इंडिया व्हॅक्सिन बांगलादेशाच्या नागरिकांपर्यंतही पोहाचावी, हे भारत आपले कर्तव्य मानून काम करीत आहे.

श्री श्री हॉरिचांद जी यांनी नेहमीच आधुनिकता आणि परिवर्तन यांचे समर्थन केले होते. ज्यावेळी महामारीचे संकट आले होते, त्यावेळी इथे ओराकांदीमध्ये आपण सर्वांनी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला, ऑनलाइन कीर्तनाचे कार्यक्रम केले, समाजाचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम केले, असे मला आज सांगण्यात आले. यावरून हे दिसून येते की, श्री श्री हॉरिचांद जी यांच्या प्रेरणेमुळे आपल्याला प्रत्येक संकटाच्या काळातून मार्ग काढून पुढे जाणे शिकता येते.

श्री श्री हॉरिचांद जी यांच्या शिकवणूक लोकां-लोकांपर्यंत पाहोचवून, दलित-पीडित समाजाला एकत्रित करण्यामध्ये खूप मोठी भूमिका त्यांचे उत्तराधिकारी श्री श्री गुरूचांद ठाकूर जी यांचीही आहे. श्री श्री गुरूचांद जी यांनी आपल्याला ‘भक्ती, क्रिया आणि ज्ञान’ यांचे सूत्र दिले होते. ‘श्री श्री गुरूचांद चैरितो’ यामध्ये असे म्हटले आहे की -

अनुनाता जाति माजे शिख्खा बिस्तारित।

आग्या करेन हॉरि चांद तारे बीधिमाॅते।।

याचा अर्थ असा आहे की, हॉरिचांद जी यांनी आपल्याला समाजाच्या दुर्बल घटकापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा आदेश दिला आहे. श्री श्री गुरूचांद जी यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये श्री श्री हॉरिचांद जी यांच्या या आदेशाचे पालन केले. विशेषतः कन्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.

आज प्रत्येक भारतवासियाचे सौभाग्य आहे की, ते इथे बांगलादेशामध्ये श्री श्री गुरूचांद जी यांच्या प्रयत्नांबरोबर जोडले जात आहेत. ओराकांदीमधल्या शिक्षणाच्या मोहिमेबरोबर आता भारतातले लोकही जोडले जाणार आहेत.

ओराकांदीमध्ये भारत सरकार कन्यांसाठी माध्यमिक शाळेचा दर्जा वाढविणार आहे. नवीन आधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, भारत सरकारद्वारे येथे एक प्राथमिक शाळाही स्थापन करण्यात येणार आहे.

ही भारताच्या कोट्यवधी लोकांच्यावतीने श्री श्री हॉरिचांद ठाकूर जी यांना श्रद्धांजली आहे. आम्ही बांगलादेश सरकारचे ही आभार मानतो, ते या कार्यासाठी आम्हाला सहकार्य  करीत आहे.

मौतुवा शॉम्प्रोदायचे आमचे बंधू-भगिनी, श्री श्री हॉरिचांद ठाकूर जी यांच्या जयंतीच्या पावन दिनी प्रत्येक वर्षी ‘बारोनी श्नान उत्शब’ साजरा केला जातो. भारतातून मोठ्या संख्येने श्रद्धावान या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी ओराकांदी येथे येतात. भारतातल्या माझ्या बंधू-भगिनींसाठी ही तीर्थयात्रा अधिक सुकर, सुलभ व्हावी, यासाठी भारत सरकारच्यावतीने अधिक प्रयत्न करण्यात येतील. ठाकूरनगरमध्ये मौतुवा शॉम्प्रोदायच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब दिसेल, अशा पद्धतीने भव्य आयोजन आणि विविध कार्यासाठी आम्ही संकल्प करीत आहोत.

मित्रांनो,

भारत आज ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा मंत्र जपत पुढे वाटचाल करीत आहे. आणि बांगलादेशामध्ये यामध्ये ‘शोहो जात्री’ आहे. तोच बांगलादेश आज दुनियेसमोर विकास आणि परिवर्तनाचे एक मजबूत उदाहरण सादर करीत आहे. आणि या प्रयत्नांमध्ये भारत आपला ‘शोहो जात्री’ आहे.

मला विश्वास आहे की, श्री श्री हॉरिचांद देव जी यांच्या आशीर्वादाने, श्री श्री गुरूचांद देव जी यांच्या प्रेरणेने हे दोन्ही देश, 21 व्या शतकामध्ये या महत्वपूर्ण कालखंडामध्ये, आपले हे  लक्ष्य संयुक्तपणे पूर्ण करेल. भारत आणि बांगलादेश प्रगती आणि प्रेमाच्या मार्गावरून दुनियेला पथदर्शन करीत राहतील.

या शुभेच्छांबरोबर, आपल्या सर्वांना अगदी हृदयापासून खूप खूप धन्यवाद देतो.

जॉय बांग्ला!! जय हिन्द!!

भारोत बांग्लादेश मोईत्री चिरोजीबि होख।

जॉय हॉरि बोल ! जॉय हॉरि बोल !

हॉरि बोल! हॉरि बोल ! जॉय हॉरि बोल !

 

***

MC/S.Bedekar/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1708195) Visitor Counter : 220