माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची डिजिटल बातम्या प्रकाशकांच्या प्रतिनिधींशी चर्चा

Posted On: 11 MAR 2021 8:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मार्च 2021

केंद्र सरकारने नव्याने जारी केलेल्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थासाठीची मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमांसाठी आदर्श आचारसंहिता) नियम 2021 च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून डिजिटल बातम्या प्रकाशक संघटनेच्या (DNPA) प्रतिनिधींशी चर्चा केली. या चर्चेला इंडिया टुडे, दैनिक भास्कर, हिंदुस्तान टाईम्स, इंडियन एक्सप्रेस, टाईम्स ऑफ इंडिया, एबीपी, एनाडू, दैनिक जागरण, लोकमत इत्यादी वृत्तपत्र  समूह आणि माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

चर्चेत सहभागी झालेल्या प्रतिनिधींशी बोलताना केंद्रीय मंत्री जावडेकर म्हणाले की नव्या नियमांमध्ये डिजिटल बातम्या प्रकाशकांवर काही जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने आखून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे तसेच केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायद्यातील कार्यक्रमविषयक आदर्श नियमांचे कडक पालन करणे यांचा समावेश आहे. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्याच्या दृष्टीने नव्या नियमांमध्ये त्रिस्तरीय तक्रार निवारण प्रणालीची सोय करण्यात आली असून त्यापैकी पहिल्या आणि दुसऱ्या स्तरावर डिजिटल बातम्यांचे प्रकाशक आणि त्यांनी स्थापन केलेल्या स्व-नियामक संस्थांचा समावेश असेल.  डिजिटल बातम्यांच्या प्रकाशकांना एका सोप्या अर्जाद्वारे त्यांच्याविषयीची काही मुलभूत माहिती, ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे सादर करावी लागणार आहे. या अर्जाचे स्वरूप निश्चित केले जात आहे. तसेच या प्रकाशकांना तक्रार निवारणासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती नियमित कालावधीनंतर सार्वजनिक मंचाद्वारे जाहीर करावी लागणार आहे. जावडेकर म्हणाले की, सर्व छापील माध्यमे आणि टीव्ही वाहिन्यांच्या आता डिजिटल आवृत्त्या प्रसिध्द होत आहेत आणि या आवृत्त्यांचा मजकूर त्यांच्या पारंपरिक आवृत्यांशी मिळताजुळताच असतो. मात्र काही मजकूर फक्त त्यांच्या डिजिटल मंचावरच प्रसिध्द होतो असे निदर्शनास आले आहे. याखेरीज अशा अनेक प्रकाशन संस्था आहेत ज्या फक्त डिजिटल मंचावरच त्यांचा मजकूर प्रसिध्द करतात. या सर्व परिस्थितीचा विचार करून, डिजिटल मंचावर प्रसारित होणाऱ्या बातम्यांना, पारंपरिक माध्यमांच्या समान पातळीवर आणण्यासाठी नव्या नियमांची रचना करण्यात आली आहे.  

नव्या नियमांचे स्वागत करतानाच, या चर्चेत सहभागी प्रतिनिधींनी सांगितले की टीव्ही आणि छापील प्रसारमाध्यमे बऱ्याच काळापासून केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायदा  आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया कायदा यांनी आखून दिलेले नियम पाळत आहेत. त्याशिवाय, डिजिटल आवृत्या प्रकाशित करताना देखील प्रकाशक पारंपरिक मंचासाठी सध्या अस्तित्वात असलेले सर्व नियम कसोशीने पाळत आहेत. अशा परिस्थितीत, फक्त डिजिटल मंचावर कार्यरत असणाऱ्या नव्या प्रकाशकांपेक्षा आपल्याला वेगळी वागणूक मिळावी अशी भावना या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

या चर्चेत भाग घेऊन आपली मते व्यक्त केल्याबद्दल सहभागी माध्यम प्रतिनिधींचे आभार व्यक्त करतानाच, सरकार या बाबीमध्ये विशेष लक्ष घालेल आणि माध्यम उद्योगाच्या सर्वंकष वाढीसाठी सल्ला प्रक्रिया निरंतर सुरु ठेवेल अशी ग्वाही जावडेकर यांनी दिली.

 

 

M.Chopade /S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1704222) Visitor Counter : 301