पंतप्रधान कार्यालय

स्वामी चिद्भवानंदजी यांनी संपादित केलेल्या भगवद्गीतेच्या, किंडल आवृत्तीचे पंतप्रधानांच्या हस्ते झाले प्रकाशन


गीता आपल्याला विचार करायला लावते, प्रश्न विचारायला उद्युक्त करते, वाद-विवाद-चर्चा करण्यास प्रोत्साहित करते आणि आपल्या मनाची कवाडे खुली करते: पंतप्रधान

Posted On: 11 MAR 2021 2:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मार्च 2021

भगवद्गीतेच्या श्लोकांच्या स्वामी चिद्भवानंदजी यांनी संपादित केलेल्या किंडल आवृत्तीचे दूरदृश्य प्रणालीद्वारे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाशन  केले.

स्वामी चिद्भवानंदजी यांनी संपादित  केलेल्या, भगवद्गीतेच्या ई-पुस्तक आवृत्तीचे प्रकाशन करताना पंतप्रधानांनी ही आवृत्ती तयार करण्यासाठी सर्व संबंधितांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले. परंपरा आणि तंत्रज्ञान यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या या आवृत्तीमुळे अधिकाधिक युवक गीतेच्या उदात्त विचारांशी जोडले जातील असे ते म्हणाले. हे ई-पुस्तक गीतेतील शाश्वत विचार आणि वैभवशाली तामिळ संस्कृती यांच्यातील बंध अधिक दृढ करेल. जगभर पसरलेल्या तामिळ समाजाला हे ई-पुस्तक सहजतेने मिळवून वाचणे आता शक्य होईल. जगभरात अनेक क्षेत्रांमध्ये उत्तुंग प्रगती करताना जिथे जातील तिथे तामिळ संस्कृतीची महानता जपणाऱ्या तामिळ समाजाचे पंतप्रधानांनी या प्रसंगी कौतुक केले.

स्वामी चिद्भवानंदजी यांना आदराने वंदन करताना, पंतप्रधान म्हणाले की, स्वामीजींचे मन, शरीर आणि आत्मा भारताच्या पुनरुत्थानासाठी वाहिलेले होते. जीवनात देशाला इतर सर्व गोष्टींपेक्षा सर्वोच्च स्थानी ठेवण्यास सांगणाऱ्या आणि देशवासीयांच्या सेवेचा उपदेश देणाऱ्या, स्वामी विवेकानंद यांच्या मद्रास येथे दिलेल्या व्याख्यानांमुळे  स्वामी चिद्भवानंदजी यांना मोठी प्रेरणा मिळाली असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की एकीकडे स्वामी चिद्भवानंदजी स्वामी विवेकानंद यांच्याकडून प्रेरित झाले तर दुसरीकडे त्यांनी त्यांच्या कार्यातून संपूर्ण जगाला प्रेरित केले.  समाजसेवा, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये रामकृष्ण मिशन करीत असलेले कार्य तसेच स्वामी चिद्भवानंदजी यांचे महान कार्य पुढे नेण्यासाठी मिशन घेत असलेली मेहनत  अत्यंत कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.

भगवद्गीतेचे सौंदर्य तिच्या सखोल, वैविध्यपूर्ण आणि लवचिक विचारांमध्ये असे पंतप्रधानांनी सांगितले. आचार्य विनोबा भावे यांनी गीता या  ग्रंथाला   आयुष्यात ठेच लागल्यावर  मांडीवर घेऊन दुखः दूर करणारी ‘आई’ म्हटले होते याचा त्यांनी उल्लेख केला. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महाकवी सुब्रमण्य भारती यांच्यासारख्या महान नेत्यांनी देखील गीतेतील विचारांतून प्रेरणा घेतली. गीता आपल्याला विचार करायला लावते, प्रश्न विचारायला उद्युक्त करते, वाद-विवाद-चर्चा करण्यास प्रोत्साहित करते आणि आपल्या मनाची कवाडे खुली करते असे त्यांनी सांगितले. गीतेतील विचारांनी प्रेरित झालेली व्यक्ती नेहमीच स्वभावाने क्षमाशील आणि लोकशाही प्रवृत्तीची असते असे ते पुढे म्हणाले.

संघर्ष आणि नैराश्याच्या परिस्थितीत श्रीमद् भगवद्गीतेचा जन्म झाला आणि सध्या संपूर्ण मानवता त्याच प्रकारच्या संघर्षमय आणि आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत आहे असे निरीक्षण नोंदवत पंतप्रधान पुढे म्हणाले की भगवद्गीता हा औदासिन्याकडून विजयाकडे नेणाऱ्या विचारांचा खजिना आहे. सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण विश्व एका अत्यंत मोठ्या जागतिक महामारीच्या आपत्तीत सापडलेले आहे आणि त्या महामारीच्या खोलवर जाणवणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक परिणामांना तोंड देण्यासाठी झगडत आहे, अशा परिस्थितीतून सावरण्यासाठी श्रीमद् भगवद्गीतेने दाखविलेला मार्ग अत्यंत समर्पक आहे असे मत त्यांनी मांडले. मानवतेसमोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा सामना करून, त्यावर विजय मिळविण्यासाठीची शक्ती आणि दिशा श्रीमद् भगवद्गीताच दाखवू शकते असे ते म्हणाले. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या हृदयरोगाला समर्पित पत्रिकेमध्ये कोविड-19 महामारीच्या काळात गीतेतील विचार किती समर्पक ठरत आहेत यावर एका विद्वानाने विस्ताराने मांडलेला आढावा पंतप्रधानांनी यावेळी उद्धृत केला.

निष्क्रियतेपेक्षा कृती करीत राहणे हा श्रीमद् भगवद्गीतेने दिलेला मुख्य संदेश आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. त्याच प्रकारे, आत्मनिर्भर भारत अभियानाचा गाभा  हा फक्त स्वतःसाठी नव्हे तर मोठ्या प्रमाणावर मानवतेचे कल्याण साधण्यासाठी संपत्ती आणि मूल्ये निर्माण करण्याचा मार्ग आहे असे ते पुढे म्हणाले. आत्मनिर्भर भारत हा विचार साऱ्या जगासाठी उत्तम विचार आहे यावर आमचा विश्वास आहे असे ते म्हणाले. गीतेतील विचारांना अनुसरत ज्या पद्धतीने आपल्या शास्त्रज्ञांनी संपूर्ण मानवजातीला मदत करून रोगमुक्त करण्यासाठी अत्यंत कमी काळात लस शोधून काढली त्याची त्यांनी आठवण करून दिली.

श्रीमद् भगवद्गीतेतील शिकवण अत्यंत व्यावहारिक आणि सर्वस्पर्शी असल्यामुळे सर्व जनतेने, विशेषतः युवा वर्गाने गीतेच्या विचारांना स्वीकारावे अशी आग्रहाची विनंती  पंतप्रधानांनी केली. सध्याच्या तुमच्या अत्यंत वेगवान आयुष्याच्या कोलाहलात गीता  स्थैर्य आणि शांतीचा अलोट सागर निर्माण करेल असे ते म्हणाले. गीता आपल्या मनातून अपयशी होण्याची भीती कडून टाकून कर्म करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल. मनाला सकारात्मक चौकट जोपासण्यास मदत करण्यासाठी गीतेच्या प्रत्येक अध्यायात मौल्यवान विचारधन आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

 

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1704109) Visitor Counter : 241