रेल्वे मंत्रालय

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना असलेल्या सर्व चौकशी, तक्रारी तसेच मदतीसाठी भारतीय रेल्वे विभागाने “139” या एकीकृत रेल मदत हेल्पलाईन क्रमांकाची केली घोषणा

Posted On: 08 MAR 2021 4:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 मार्च 2021

 

रेल्वे प्रवासादरम्यान येणाऱ्या विविध समस्या आणि आवश्यक चौकशांसाठी वेगवेगळ्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याच्या गैरसोयीपासून रेल्वे प्रवाशांची सुटका करण्याच्या उद्देशाने प्रवासादरम्यान प्रवाशांना काही समस्या उद्भवल्या किंवा काही चौकशी करावयाची असेल तर त्यासाठी भारतीय रेल्वे विभागाच्या 139 या एकाच एकीकृत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. सध्या परिचलनात असलेल्या रेल्वेच्या सर्व हेल्पलाईन क्रमांकांऐवजी आता 139 हा एकच  क्रमांक अस्तित्वात आला आहे. प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या, तक्रारी किंवा चौकशांसाठी आता हा एकच क्रमांक लक्षात ठेवून त्यावर संपर्क साधावयाचा आहे.

रेल्वे विभागाच्या तक्रार निवारण हेल्पलाईन्स गेल्या वर्षी खंडित करण्यात आल्या. आता, येत्या 1 एप्रिल 2021 पासून 182 हा सध्या परिचालनात असलेला हेल्पलाईन क्रमांक देखील खंडित होईल आणि त्यावरील सेवा 139 क्रमांकाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये विसर्जित होतील.

हेल्पलाईन क्रमांक 139 च्या सेवा 12 भाषांमध्ये उपलब्ध असतील. प्रवाशांना आयव्हीआरएस प्रणालीद्वारे ही सेवा वापरता येईल किंवा फोन वरील * (अस्टेरीस्क) हे चिन्ह दाबून कॉल सेंटर मधील सहाय्यकाशी प्रत्यक्ष बोलता येईल. 139 या क्रमांकावर संपर्क साधण्यासाठी स्मार्ट फोन उपलब्ध असण्याची गरज नाही. त्यामुळे सर्व प्रकारचे फोन वापरणारे प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

सध्या 139 या हेल्पलाईन क्रमांकावर चौकशीसाठी सरासरी प्रतिदिन 3,44,513 कॉल अथवा संदेश येत आहेत.

139 हा हेल्पलाईन क्रमांक आयव्हीआरएस प्रणालीनुसार वापरण्याची पद्धत खाली दिली आहे:

  • सुरक्षिततेविषयी किंवा वैद्यकीय मदतीसाठी प्रवाशांनी 1 क्रमांक दाबायचा आहे. यामुळे त्यांना त्वरित  कॉल सेंटरमधील प्रतिनिधीशी बोलता येईल.
  • रेल्वे विषयी कोणत्याही चौकशीसाठी 2 क्रमांकाचे बटण दाबल्यानंतर प्रवाशांना मिळणाऱ्या पुढील सूचनांद्वारे पीएनआर स्थिती विषयी माहिती, गाडीची स्टेशनवर येण्याची तसेच सुटण्याची निश्चित वेळ, जागांची उपलब्धता, तिकीट शुल्काची माहिती, तिकीट आरक्षण तसेच आरक्षण रद्द करण्याच्या नियमांची माहिती, गजराची सुविधा तसेच गंतव्य स्थानकाविषयी इशारा, व्हील चेयर चे आरक्षण, जेवणाची ऑर्डर इत्यादी गोष्टींची माहिती मिळेल.
  • सामान्य तक्रारीसाठी प्रवाशांनी 4 हे बटण दाबावे.
  • दक्षतेबाबतच्या तक्रारीसाठी प्रवाशांनी 5 हे बटण दाबावे.
  • पार्सल आणि वस्तूंच्या वाहतुकीशी संबंधित चौकशीसाठी प्रवाशांनी 6 हे बटण दाबावे.
  • आयआरसीटीसी संचालित गाड्यांच्या चौकशीसाठी प्रवाशांनी 7 हे बटण दाबावे.
  • दाखल केलेल्या तक्रारीच्या विद्यमान स्थितीविषयी जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी 9 हे बटण दाबावे.
  • कॉलसेंटर मधील प्रतिनिधीशी बोलण्यासाठी प्रवाशांनी * (अस्टेरीस्क) हे चिन्ह असलेले बटण दाबावे.

रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना नव्या हेल्पलाईन क्रमांकाची माहिती देऊन त्याच्या वापराविषयी प्रशिक्षण देण्यासाठी  समाज माध्यमांवर  #OneRailOneHelpline139 हे अभियान देखील सुरु केले आहे.

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1703296) Visitor Counter : 146