पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन


या नव्या रेल्वेमार्गांमुळे आयुष्य सुखकर होईल, उद्योगांसाठीही नवे मार्ग निर्माण होतील- पंतप्रधान

Posted On: 22 FEB 2021 7:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील नोआपारा ते दक्षिणेश्वर दरम्यानच्या विस्तारित मेट्रो रेल्वेमार्गाचे उद्घाटन केले आणि या मार्गावरील पहिल्या मेट्रो गाडीला हिरवा झेंडाही दाखवला. तसेच, कालाईकुंडा आणि झारग्रामदरम्यानच्या तिसऱ्या रेल्वेमार्गाचे उद्घाटनही केले.

पूर्व रेल्वेच्या अजीमगंज ते खरगराघाट रोड स्टेशन दरम्यानच्या दुपदरी रेल्वेमार्गांचे  लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. तसेच डानकुनी आणि बारुईपारा दरम्यानच्या चौथ्या मार्गाचे आणि रसूलपूर आणि मगरा दरम्यानच्या तिसऱ्या मार्गाचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते झाले.

यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलतांना पंतप्रधान म्हणाले की आज उद्घाटन झालेल्या रेल्वे प्रकल्पांमुळे हुगळीच्या आसपास राहणाऱ्या लाखो लोकांचे जीवनमान सुखकर होईल. आपल्या देशातील वाहतूकीची साधने जितकी उत्तम असतील, तितकाच आपला आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासपूर्ण भारताचा संकल्प अधिकाधिक मजबूत होत जाईल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.कोलकात्याशिवाय आता हुगळी, हावडा आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील लोकांनाही मेट्रो सेवेचा लाभ मिळेल. नोआपारा ते दक्षिणेश्वर या भागात मेट्रोचे विस्तारित सेवा सुरु झाल्यामुळे दोन्ही भागातील प्रवासाचे अंतर 90 मिनिटांवरुन 25 मिनीटांपर्यंत कमी झाले आहे. या सेवा विद्यार्थी आणि कामगारांसाठी विशेष उपयुक्त ठरतील, असे पंतप्रधान म्हणाले.

मेट्रो किंवा रेल्वे व्यवस्थेत “मेड इन इंडिया’चा प्रभाव दिसत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मेट्रो आणि रेल्वेच्या परिचालन व्यवस्था आता भारतातच निर्माण केल्या जातात. मग त्यात रेल्वे ट्रॅक असोत किंवा मग आधुनिक लोकोमोटिव्ह असोत किंवा आधुनिक रेल्वे कोच, मालवाहू डबे किंवा मोठ्या प्रमाणावर वापरली जात असलेले तंत्रज्ञान हे सगळे स्वदेशी आहे. या स्वदेशी उत्पादनांमुळे प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा वेग वाढला आहे आणि कामांची गुणवत्ताही सुधारली आहे.

आत्मनिर्भर भारताच्या संकल्पात पश्चिम बंगालचे स्थान महत्वाचे आहे. आणि त्यामुळेच पश्चिम बंगाल आणि उत्तर भारतात आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अनेक संधी व शक्यता आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. या नव्या रेल्वेगाड्यांमुळे आयुष्य सुखकर होईल तसेच उद्योगक्षेत्रासाठी नवे मार्ग उपलब्ध होतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

 

थोडक्यात पार्श्वभूमी :

मेट्रो रेल्वे विस्तारीकरण

नोआपरा ते दक्षिणेश्वर दरम्यान मेट्रो रेल्वेच्या विस्तारीकरणामुळे रस्त्यांवरची वाहतूककोंडी कमी होऊन, नागरी वाहतुकीत सुधारणा होईल. या 4.1 किमी च्या विस्तारीकरणासाठी 464 कोटी रुपयांचा खर्च आला असून हा   संपूर्ण खर्च केंद्र सरकारने वहन केला आहे. या मेट्रोमुळे तसेच या विस्तारित मार्गावरुन, कालीघाट आणि दक्षिणेश्वर येथील  जगप्रसिद्ध काली मंदिराकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी सुविधा निर्माण होईल. या मार्गावरच्या बारानगर आणि दक्षिणेश्वर या स्थानकांवर अत्याधुनिक प्रवास सुविधा असून अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांची रचना करण्यात आली आहे.

 

रेल्वेमार्गांचे उद्घाटन

दक्षिण-पूर्व रेल्वेच्या खरगपूर-आदित्यपूर दरम्यानच्या 132 किमीच्या टप्प्यातील कलाईकुंड आणि झारग्राम या दरम्यानच्या 30 किमी लांबीच्या  तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी  1312 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मार्गावरील चार स्थानकांचे आधुनिकीकरण, सहा नवे पादचारी पूल आणि 11 नवे फलाट बांधण्यात आले असून जुन्या पायाभूत सुविधांची दुरुस्ती करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची सोय होईल तसेच हावडा-मुंबई रेल्वेमार्गावरील प्रवासी आणि मालगाड्यांची वाहतूक सोपी होईल.  

डानकुनी आणि बारुईपारा(11.28 किमी) या हावडा-वर्धमान कॉर्ड लाईनचे आणि रासूलपूर-मगरा दरम्यानच्या हावडा-वर्धमान मेन लाईनवरील तिसऱ्या मार्गाचे लोकार्पणही पंतप्रधानांनी केले. या मार्गासाठी 759 कोटी रुपयांचा खर्च येणार असून, डानकुनी ते बारुईपारा मार्गासाठी 195 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

 

अजीमगंज-खरगराघाट रोड स्टेशन मार्गाचे दुपदरीकरण

हावडा- बांदेल- अजीमगंज मार्गावरील अजीमगंज- खरगराघाट रोड स्टेशन दरम्यानच्या मार्ग 240 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. 

या प्रकल्पांमुळे रेल्वेच्या कार्यक्षमतेत वाढ होईल तसेच प्रवाशांचा वेळ वाचेल शिवाय त्यांना सुरक्षित प्रवास करता येईल. तसेच या प्रदेशातील आर्थिक विकासाच्या दृष्टीनेही हे प्रकल्प महत्वाचे आहेत.

 

* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1700029) Visitor Counter : 189