पंतप्रधान कार्यालय
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला पंतप्रधानांनी दिलेले उत्तर
Posted On:
08 FEB 2021 11:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी 2021
आदरणीय सभापतीजी,
संपूर्ण जग अनेक आव्हानांचा सामना करत आहे. क्वचितच कुणी विचार केला असेल की मानव जातीला अशा कठीण काळातून जावे लागेल. अशा आव्हानांमध्ये या दशकाच्या प्रारंभी आपल्या आदरणीय राष्ट्रपतीनी संयुक्त सभागृहात जे भाषण केले ते या आव्हानांनी भरलेल्या जगात एक नवी आशा जागवणारे, नवी उमेद निर्माण करणारे आणि नवा आत्मविश्वास निर्माण करणारे राष्ट्रपतींचे संबोधन होते , आत्मनिर्भर भारताचा मार्ग दाखवणारे आणि या दशकासाठी एक मार्ग प्रशस्त करणारे असे हे भाषण होते.
आदरणीय सभापति जी,
मी राष्ट्रपतींचे अगदी मनापासून आभार मानण्यासाठी आज तुमच्यासमोर उभा आहे. राज्यसभेत सुमारे 13-14 तास 50 पेक्षा अधिक सदस्यांनी आपले विचार मांडले, बहुमूल्य विचार मांडले, अनेक पैलूंवर मते व्यक्त केली. आणि म्हणूनच ही चर्चा समृद्ध केल्याबद्दल मी सर्व सदस्यांचे हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो. राष्ट्रपतींचे भाषण ऐकायला सगळे उपस्थित असते तर बरे झाले असते , लोकशाहीची प्रतिष्ठा आणखी वाढली असती आणि आपल्याला सर्वांना नंतर टोचत राहिले नसते की आपण राष्ट्रपतींचे भाषण ऐकले नाही. मात्र राष्ट्रपतींच्या भाषणाची ताकद इतकी होती की ऐकले नसूनही खूप काही बोलले. ही खरोखरच त्या भाषणाची ताकद होती , त्या विचारांची ताकद होती त्या आदर्शांची ताकद होती ज्यामुळे न ऐकूनही म्हणणे पोहचले. म्हणूनच मला वाटते या भाषणाचे मोल अनेक पटीने वाढते.
आदरणीय सभापति जी,
जसे मी म्हटले, अनेक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींचे या दशकातील पहिले भाषण झाले. मात्र हे देखील खरे आहे की जेव्हा आपण संपूर्ण जागतिक दृष्ठीकोनाकडे पाहतो, भारताच्या युवा मनांकडे पाहतो तेव्हा असे वाटते की आज भारत खऱ्या अर्थाने एक संधींची भूमी आहे. अनेक संधी आपली प्रतीक्षा करत आहेत. आणि म्हणूनच जो देश युवा आहे, जो देश उत्साहाने भरलेला आहे , जो देश अनेक स्वप्ने उराशी बाळगत संकल्पासह सिद्धि प्राप्त करण्यासाठी प्रयत्नरत आहे , तो देश या संधी कधीही जाऊ देणार नाही. आपणा सर्वांसाठी देखील ही एक संधी आहे कि आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत आहोत . ही खरोखरच एक प्रेरक संधी आहे. आपण जिथे कुठे असू भारतमातेचे सुपुत्र म्हणून स्वातंत्र्याच्या 75 व्या पर्वाला आपण प्रेरणा पर्व बनवायला हवे. देशाला आगामी वर्षांसाठी तयार करण्यासाठी काही ना काही तरी करून दाखवण्याची संधी असायला हवी आणि 2047 मध्ये देश जेव्हा स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल तेव्हा आपण देशाला कुठवर घेऊन जाऊ, ही स्वप्ने आपण वारंवार पाहायला हवीत. आज संपूर्ण जगाची नजर भारतावर आहे, भारताकडून अपेक्षा देखील आहेत आणि लोकांमध्ये एक विश्वास देखील आहे की भारत हे करेल, जगातील बहुतेक समस्यांवर तिथेच तोडगा निघेना विश्वास आज जगात भारतासाठी वाढला आहे.
आदरणीय सभापति जी,
जेव्हा मी संधींबाबत चर्चा करत आहे तेव्हा महाकवी मैथलीशरण गुप्त यांची कविता वाचून दाखवायला मला आवडेल. गुप्त यांनी म्हटले आहे -
अवसर तेरे लिए खड़ा है, फिर भी तू चुपचाप पड़ा है।
तेरा कर्म क्षेत्र बड़ा है पल-पल है अनमोल,अरे भारत उठ, आखें खोल।।
हे मैथिलीशरण गुप्त यांनी लिहीले आहे . मात्र मी विचार करत होतो कीं या कालखंडात , 21 व्या शतकाच्या सुरुवातीला जर त्यांनी लिहिले असते ते काय लिहिले असते - मी कल्पना करत होतो की त्यांनी लिहिले असते -
अवसर तेरे लिए खड़ा है,तू आत्मविश्वास से भरा पड़ा है।
हर बाधा, हर बंदिश को तोड़, अरे भारत, आत्मनिर्भरता के पथ पर दौड़।
आदरणीय सभापति जी,
कोरोना काळात कशा प्रकारची जागतिक परिस्थिती होती, कुणी कोणाची मदत करू शकेल हे अशक्य झाले होते. एक देश दूसऱ्या देशाला मदत करू शकणार नाही, एक राज्य दुसऱ्या राज्याला मदत करू शकणार नाही , इथपर्यंत की कुटुंबाचा एक सदस्य दुसऱ्या कुटुंबाच्या सदस्याची मदत करू शकणार नाही असे वातावरण कोरोनामुले निर्माण झाले होते. भारतासाठी तर जगातून शंका उपस्थित केल्या जात होत्या. जगाला खूप चिंता वाटत होती की कोरोनाच्या या महामारीत जर भारत स्वतःला सांभाळू शकला नाही तर केवळ भारतच नाही संपूर्ण मानव जातीसाठी एवढे मोठे संकट येईल अशी भीती व्यक्त केली जात होती. कोट्यवधी लोक बाधित होतील, लाखों लोकी मृत्युमुखी पडतील . आपल्याकडे देखील घाबरवण्यासाठी अनेक गोष्टी झाल्या आणि हे का झाले हा आमचा प्रश्न नाही कारण एक अनोळखी शत्रू काय करू शकतो याचा कुणाला अंदाज नव्हता. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आकलन केले होते. मात्र भारताने आपल्या देशातील नागरिकांच्या रक्षणासाठी एका अज्ञात शत्रूशी आणि ज्याची काही पूर्व परंपरा नव्हती अशा गोष्टीचा कसा सामना करायचा, यासाठी हे प्रोटोकॉल असू शकतात, काही माहीत नव्हते.
एका नव्या पद्धतीने , नव्या विचारासह प्रत्येकाला चालायचे होते. काही विद्वान, सामर्थ्यवान लोकांचे आणखी काही वेगळे विचार असू शकतात मात्र हा शत्रू अनोळखी होता. आणि आपल्याला मार्ग देखील काढायचा होता. मार्ग निर्माण करायचे होते आणि लोकांचे प्राण देखील वाचवायचे होते. त्यावेळी ईश्वराने जे काही बुद्धि, शक्ति, सामर्थ्य दिले , देशाने ते करून दाखवत देशाला वाचवण्यासाठी अपार कष्ट घेतले. आणि आता जग अभिमानाने म्हणते की खरेच भारताने जगातील मानवजातीला वाचवण्यात खूप मोठी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. ही लढाई जिंकण्याचे यश कोणत्याही सरकारला जात नाही, ना कुठल्या व्यक्तीला जाते , मात्र भारताला नक्कीच जाते. गौरव करण्याला काय लागते ? जगासमोर आत्मविश्वासाने बोलण्यात काय जाते? या देशाने ते करून दाखवले आहे. गरीबातील गरीब व्यक्तीने हे केले आहे. त्यावेळी सोशल मीडियामध्ये पाहिले असेल, फुटपाथवर एक छोटी झोंपड़ी उभारून बसलेली वृद्ध माता , ती देखील घराबाहेर, झोंपड़ीच्या बाहेर दिवा पेटवून भारताच्या कल्याणासाठी प्रार्थना करत होती , आपण तिची चेष्टा करतोय? तिच्या भावनांची खिल्ली उडवतोय? ज्याने कधी शाळेचा दरवाजा पाहिलेला नाही त्याच्या मनातही देशासाठी काही करावे असे आले आणि देशासाठी दिवा पेटवून आपल्या देशाची सेवा करू शकतो, या भावनेने केले होते. आणि त्यातून देशात एका सामूहिक शक्तीचे जागरण केले होते. आपल्या शक्तिचा , सामर्थ्यचा परिचय करून दिला होता. मात्र त्याचीही थट्टा करण्यात मजा येत आहे विरोध करण्यासाठी कितीतरी मुद्दे आहेत आणि करायला हवा देखील. मात्र अशा गोष्टी करू नका ज्यामुळे देशाचे मनोबल खालावेल , जे देशाच्या सामर्थ्याला कमी लेखतात त्यांच्यामुळे कधीही लाभ होत नाही
आपले कोरोना योद्धे , आपले आघाडीवरील कामगार , तुम्ही कल्पना करु शकता , जेव्हा चारही बाजूला भीती आहे की कुणापासून तरी कोरोना होईल तेव्हा अशा वेळी ड्यूटी करणे, आपली जबाबदारी पार पाडणे ही छोटी गोष्ट नाही , त्याचा अभिमान बाळगायला हवा, त्यांचा आदर करायला हवा आणि या सर्व प्रयत्नांचा परिणाम आहे की देशाने आज ते करून दाखवले आहे . आपण जरा भूतकाळाकडे पाहिले , हे टीकेसाठी नाही , ती स्थिती आपण जगलो आहोत. कधी देवी या आजाराबद्दल बोलले जायचे तेव्हा किती भीती वाटायची. पोलियो किती भीतीदायक वाटत होता , त्याची लस मिळवण्यासाठी काय-काय मेहनत करावी लागत होती, किती त्रास सहन करावा लागत होता. मिळेल, कधी मिळेल, किती मिळेल कसे मिळेल, कशी द्यायची, असे दिवस आपण काढले आहेत. अशा स्थितीत ते दिवस जर आपण आठवले तर कळेल की आज ज्यांची तिसरे जागतिक देश म्हणून गणना केली जाते ते देश मानवजातीच्या कल्याणासाठी लस घेऊन येतील. एवढ्या कमी वेळेत मिशन मोडमध्ये आपले वैज्ञानिक कार्यरत होते, ही मानवजातीच्या इतिहासात भारताच्या योगदानाची एक गौरवपूर्ण गाथा आहे. त्याचा आपण गौरव करायला हवा आणि त्यातूनच नव्या आत्मविश्वासाची प्रेरणा देखील जागृत होते. आपण त्या नव्या आत्मविश्वासाच्या प्रेरणा जागवण्याच्या अशा प्रयत्नांचा आज देश अभिमान बाळगू शकतो की जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान माझ्या याच देशात सुरु आहे. जगात एवढ्या जलद गतीने लसीकरण आज कुठे होत असेल तर ते इथेच भारत भूमीवर होत आहे. भारताचे हे सामर्थ्य कुठे पोहचले नाही .
आज कोरोनाने भारताला जगाबरोबरच्या संबंधांमध्ये एक नवी ताकद दिली आहे. जेव्हा सुरुवातीला कोणते औषध उपयोगी ठरेल हे माहित नव्हते , लस नव्हती, त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या औषधांकडे गेले. जगात फार्मेसी हब म्हणून भारत उदयाला आला. 150 देशांमध्ये औषधे पुरवण्याचे काम त्या संकटकाळात देखील या देशाने केले आहे. मानव जातिच्या रक्षणासाठी आम्ही मागे हटणार नाही. एवढेच नाही, या क्षणी लसी संदर्भात देखील जग मोठ्या अभिमानाने सांगत आहे की आमच्याकडे भारताची लस आहे. आपणा सर्वांना माहित आहे की जगातील मोठमोठ्या रुग्णालयांमध्येही मोठमोठे लोक जेव्हा शस्त्रक्रिया करायला जातात , कुठलीही मोठी शस्त्रक्रिया आणि ऑपरेशन कक्षात गेल्यानंतर प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी त्यांचे डोळे शोधत असतात की कुणी भारतीय डॉक्टर आहे की नाही आणि जेव्हा एखादा डॉक्टर नजरेस पडतो , तेव्हा त्याला विश्वास वाटतो की आता ऑपरेशन व्यवस्थित होईल. हीच देशाची कमाई आहे. याचा आपल्यला अभिमान वाटायला हवा. म्हणूनच हा अभिमान बाळगत आपण पुढे जायचे आहे.
या कोरोनाकाळामध्ये ज्याप्रमाणे वैश्विक संबंधांमध्ये भारताने आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे, आपले स्थान बनवले आहे, तसेच भारताने आपल्या संघराज्य रचनेमध्ये या कोरोना कालखंडामध्ये आपली अंगभूत ताकद किती आहे, संकटाच्या काळामध्ये आम्ही सर्वजण मिळून एकजुटीने कसे काम करू शकतो, सर्वांची शक्ती ज्यावेळी एका दिशेने काम करायला लागते आणि सर्वजण त्या कामासाठी प्रयत्न करू शकतात; हे केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून -संयुक्तपणे दाखवून दिले आहे. या सभागृहामध्ये सर्व राज्यांचा आपापला सहभाग आहे, त्यामुळे मी सर्व राज्यांचे या सभागृहामध्ये विशेषत्वाने अभिनंदन करतो. आणि संघराज्याला अधिक ताकद, बळकटी देण्याचे काम केले इतकेच नाही तर संकटाचे संधीमध्ये रूपांतरीत करण्याचे कामही आपण सर्वांनी केले आहे. यासाठी प्रत्येकजण अभिनंदनास पात्र आहे. येथे लोकशाहीविषयी अनेक उपदेश केले आहेत. खूप काही बोलण्यात आले. परंतु ज्या काही गोष्टी सांगण्यात आल्या, त्यावर देशाचा कोणीही नागरिक विश्वास ठेवेल, असे मला वाटत नाही. आपण अशा पद्धतीने लोकशाहीची लक्तरं काढावीत, अशी काही इतकी लेचीपेची भारताची लोकशाही नाही. अशी चूक आपण करूही नये आणि मी श्रीमान देरेक जी यांचे बोलणे ऐकत होतो, खूप चांगले, मोठ-मोठ्या शब्दांचा प्रयोग केला जात होता. ‘फ्रीडम ऑफ स्पीच, इंटिमिडेएशन, हौंडिंग’ असे शब्द ऐकत होतो, त्यावेळी प्रश्न पडला की, हे बंगालमधील गोष्ट इथं सांगत आहेत की, देशाविषयी बोलत आहेत? स्वाभाविक आहे, चोवीस तास ते जे काही पाहतात, ऐकतात, तीच गोष्ट कदाचित चुकून त्यांनी इथं सांगितली असावी. काँग्रेसचे आमचे बाजवासाहेबही यावेळी खूप चांगले सांगत होते. आपलं बोलणं त्यांनी भरपूर लांबवलं त्यामुळं मला तर वाटत होत आता काही वेळातच ते आणीबाणीपर्यंत पोहोचतील. काही क्षण तर मला वाटलं आता एक पाऊलच बाकी राहिलं आहे. ते लवकरच 84 पर्यंत पोहोचतील. मात्र ते तिथंपर्यंत गेले नाहीत. ठीक आहे, काँग्रेस देशाला खूप निराश करते. तुम्हीही निराशच करून टाकलं.
माननीय सभापती महोदय,
मी एक उद्धरण- एक ‘कोटेशन’ सभागृहासमोर ठेवू इच्छितो. आणि विशेष करून लोकशाहीबाबत जे शंका उत्पन्न करीत आहेत, भारताच्या मूलगामी शक्तीविषयी जे संशय घेत आहेत, त्यांना मी विशेष आग्रहाने सांगू इच्छितो की, ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करावा. ‘‘आपली लोकशाही कोणत्याही रूपाने पाश्चिमात्य संस्था नाही. ही एक ‘मानव’ संस्था आहे. भारताचा इतिहास लोकशाहीवादी संस्थांच्या उदाहरणांनी भरलेला आहे. प्राचीन भारतामध्ये 81 गणतंत्रांचे वर्णन आपल्याला मिळते. आज देशवासियांना भारताच्या राष्ट्रवादावर चौहोबाजूंनी होत असलेल्या हल्ल्याविषयी जागरूक करणे जरूरी आहे. भारताचा राष्ट्रवाद संकीर्ण, संकुचित नाही की तो स्वार्थी नाही आणि त्यामध्ये आक्रमकताही नाही. आम्ही ‘सत्यम शिवम सुंदरम’ या मूल्यांमधून प्रेरणा घेतली आहे.’’
आदरणीय सभापती जी,
हे उद्धरण आजाद हिंद फौजच्या पहिल्या सरकारचे पहिले प्रधानमंत्री नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे आहे. आणि योगायोग असा आहे की, आज त्यांची आपण 125 वी जयंती साजरी करीत आहोत. मात्र दुर्भाग्य या गोष्टीचे आहे की, कळत-नकळत आपल्याला नेताजींच्या या भावनांचे , नेताजींच्या या विचारांचे , नेताजींच्या या आदर्शांचे विस्मरण झाले आहे. आणि त्याचा परिणाम म्हणजे आज आपणच स्वतःला दोष द्यायला लागलो आहोत. कधी-कधी मी तर हैराण, त्रस्त होतो. दुनिया ज्या कोणत्या शब्दाला पकडते, आपण तोच शब्द धरून पुढे चालायला लागतो. जगातली सर्वात मोठी लोकशाही, हे शब्द ऐकताना आपल्याला खूप चांगले वाटते. होय, मित्रांनो, भारत विश्वातला सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे. मात्र आपण आपल्या युवा पिढीला हे शिकवलेच नाही की, भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीचा जन्मच भारतात झाला आहे. ही गोष्ट आपण येणा-या पिढ्यांना शिकवली पाहिजे आणि आपण अभिमानाने अशा गोष्टी बोलल्या पाहिजेत. कारण आपल्या पूर्वजांनी हा वारसा आपल्याला दिला आहे. भारताची शासन व्यवस्था लोकशाहीवादी आहे. फक्त याच कारणामुळे आपल्या देशात लोकशाही आहे, असे नाही. भारताची संस्कृती, भारताचे संस्कार, भारताची परंपरा, भारताचे मन लोकशाहीवादी आहे. आणि म्हणूनच आपली व्यवस्थाही लोकशाहीवादी आहे. ही गोष्ट आहे म्हणून हे सगळे आहे, असे नाही. मूलत: आपण लोकशाहीवादी आहोत. आणि त्याची परीक्षा, कसोटीही देशाने पार पाडली आहे.
आपत्काळातल्या, आणीबाणीच्या त्या अवघड दिवसांना आठवून पहा, न्यायपालिकांची स्थिती कशी होती, प्रसार माध्यमांची काय अवस्था होती, शासनाची अवस्था काय होती, सर्वकाही कारागृहामध्ये परिवर्तित झाले होते. परंतु या देशाचे संस्कारी, देशाचे जनमन, जे लोकशाहीच्या रंगामध्ये रंगले होते, त्याला कोणीही धक्का लावू शकले नाही. संधी मिळताच त्याने लोकशाहीला अधिक प्रभावी बनवले. ही लोकांची ताकद आहे. ही आपल्या संस्कारांची ताकद आहे. ही लोकशाहीच्या मूल्यांची ताकद आहे. येथे त्यावेळी कुणाचे सरकार होते, कोणी सरकार बनवले, याचा इथे मुद्दाच नाही. सरकार कुणी बनवले, याची काही मी इथे चर्चा करीत नाही. आणि अशा गोष्टींमध्ये वेळ मी द्यावा, घालवावा, यासाठी मला काही तुम्ही इथे बसवलेले नाही. आपल्या लोकशाहीवादी मूल्यांचे रक्षण करून पुढे जायचे आहे. आत्मनिर्भर भारतासंबंधीही चर्चा झाली. माझे सहकारी धर्मेंद्र प्रधान यांनी आत्मनिर्भर भारत बनविण्याविषयी आमची दिशा नेमकी काय असणार आहे, याविषयी अतिशय अभ्यासपूर्ण आणि विस्तृत निवेदन त्यांनी दिले आहे. एक गोष्ट खरी आहे की, आर्थिक क्षेत्रामध्ये आज भारताची एक ‘पोहोच’ बनत आहे, वेगळी ओळख होत आहे. कोरोना काळामध्ये संपूर्ण दुनियेतले लोक गुंतवणूक केली जावी यासाठी नेमके काय काय करीत होते, या गोष्टी आता बाहेर येत आहेत. परंतु भारतामध्ये आज विक्रमी गुंतवणूक होत आहे. सगळी माहिती, आकडेवारी, तथ्य पाहिले की, अनेक देशांची आर्थिक स्थिती काही ठीक नाही, अनेक देशांची आर्थिक गाडी लडखडतेय असे दिसून येते . अशावेळी भारताचा वृद्धिदर दोन अंकी होईल, असा अंदाज जगभर वर्तवला जात आहे. एकीकडे निराशेचे वातावरण आहे तर हिंदुस्थानमध्ये आशेचे किरण नजरेस पडत आहेत.
आज भारताच्या परकीय गंगाजळीमध्ये विक्रमी मुद्रा भंडार असल्याचे दिसून येत आहे. आज भारतामध्ये अन्न उत्पादन विक्रमी झाले आहे. भारत आज दुनियेतला दुस-या क्रमांकाचा सर्वात मोठा, इंटरनेट वापरकर्त्यांचा देश आहे. भारतामध्ये आज प्रत्येक महिन्याला 4 लाख कोटी रुपयांचे देवघेवीचे व्यवहार डिजिटल माध्यमातून होत आहेत. दोन - तीन वर्षांपूर्वी या सभागृहामध्ये भाषण ऐकताना, अनेक जण म्हणत होते की, लोकांकडे मोबाइ्रल कुठे आहे, लोक डिजिटल व्यवहार कसा काय करणार? असे प्रश्न उपस्थित केले गेले होते, हे तुम्हा सर्वांना आठवत असेल, मात्र देशाची ताकद कशी आहे पहा. प्रत्येक महिन्याला 4 लाख कोटी रुपयांचे व्यवहार होत आहेत. भारत मोबाईल फोनचा निर्माता म्हणून दुनियेतल्या दुसरा सर्वात मोठा देश बनला आहे. भारतामध्ये विक्रमी संख्येने स्टार्टअपस्, युनिकॉर्न तयार झाले आहेत, त्याचा सगळ्या जगात जय-जयकार होत आहे. याच भूमीवर आमची तरूण पिढी तयार होत आहे. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रामध्ये जगातल्या पहिल्या पाच देशांमध्ये आपण स्वतःचे स्थान निर्माण केले आहे आणि आगामी काळामध्ये आपण अधिक उंची गाठणार आहोत. जल असो, थल असो, नभ असो, अंतराळ असो.... भारताने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या रक्षणासाठी, आपल्या सामर्थ्य निर्माण करून केले आहे. सर्जिकल स्ट्राईक असो अथवा हवाई हल्ले भारताची क्षमता संपूर्ण दुनियेने पाहिली आहे.
आदरणीय सभापती जी,
2014 मध्ये पहिल्यांदा ज्यावेळी मी या सभागृहामध्ये आलो होतो, या परिसरामध्ये आलो होतो आणि ज्यावेळी नेता म्हणून निवडलो गेलो होतो, त्यावेळी पहिल्या भाषणामध्ये मी सांगितले होते की, माझे सरकार गरीबांना समर्पित असणार आहे. मी आज दुस-यांदा आल्यानंतरही हीच गोष्ट पुन्हा सांगत आहे. आणि आम्ही आमची कार्याची दिशा कधी बदलली नाही की आम्ही कामाचा वेग कमी केला नाही किंवा आम्ही आमच्या कामापासून विचलितही झालो नाही. आम्ही पहिल्याप्रमाणेच तितक्याच वेगाने, धडाडीने कार्यरत आहोत. कारण या देशाला पुढे जाण्यासाठी आपल्याला गरीबीतून मुक्त होण्याची आवश्यकता आहे. आपल्याला सतत प्रयत्न करून त्या कड्या जोडत जोडत पुढे जायचे आहे. आधी जे काही प्रयत्न झाले आहेत, त्याला तसेच पुढे नेणे गरजेचे आहे. आपण प्रयत्न आणि पुढे जाणे थांबवू शकत नाही. जितके काही केले आहे, ते खूप आहे.... असे म्हणून थांबू शकत नाही. आपल्याला आणखी खूप काही करावेच लागणार आहे. आज मला आनंद आहे की, ज्या मूलभूत आवश्यकता आहेत, जीवनमान सुकर होण्यासाठी आणि ज्या गोष्टींनी आत्मविश्वास निर्माण होतो. त्या आम्ही करीत आहोत आणि एकदा गरीबाच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला तर गरीब स्वतःच गरीबीला आव्हान देईल आणि गरीबीच्या विरोधात पूर्ण ताकदीने उभा राहील. गरीब कोणाच्याही मदतीवर अवलंबून राहणार नाही. असा माझा अनुभव आहे. देशभरामध्ये 10 कोटींपेक्षा जास्त शौचालये बनली आहेत, 41 कोटींपेक्षा जास्त लोकांची बँकेत खाती उघडली आहेत, याचा मला आनंद आहे. त्याचबरोबर दोन कोटींपेक्षा जास्त गरीबांची स्वतःची घरकुले बनली आहेत. 8 कोटींपेक्षा जास्त लोकांना स्वयंपाकाच्या गॅसची मोफत जोडणी दिली आहे. पाच लाख रूपयांपर्यंत मोफत औषधोपचार केले जात असल्यामुळे गरीबांच्या जीवनात खूप मोठी शक्ती निर्माण झाली आहे. अशा अनेक योजनांमुळे गरीबांच्या जीवनामध्ये परिवर्तन येत आहे. त्यांच्यामध्ये नवीन विश्वास निर्माण करीत आहेत.
आदरणीय सभापती जी,
आव्हाने आहेत आणि आव्हाने नाहीत, असे कधीच कुठं असत नाही. जगामधल्या समृद्ध, अतिसमृद्ध विकसित, देशांकडे पहा, त्यांच्या समोरही आव्हाने आहेत, असतात. त्यांच्यापुढची आव्हाने वेगळ्या प्रकारची आहेत. आपल्याकडचे प्रश्न, आव्हाने वेगळ्या प्रकारची आहेत. मात्र आपल्याला या आव्हानांचा एक भाग बनायचे आहे की या आव्हानांवर उपाय शोधायचा आहे, हे आपणच ठरवायचे आहे. आव्हाने आणि त्यांचा सामना करणे यामध्ये एक अतिशय पातळशी, पुसटशी रेषा आहे. आपण आव्हानांचा भाग बनलो, समस्येचा एक हिस्सा बनलो तर राजकारणात नक्कीच तरून जाणार आहोत. मात्र जर आपण समस्येवर उपाय शोधण्याचे माध्यम बनलो तर राष्ट्रनीती किती तरी उंचावेल, राष्ट्रनीतीला ‘चार चांद’ लागतील. आपली जबाबदारी आहे, आपल्या वर्तमान पिढीसाठीही विचार केला पाहिजे, आपल्या भावी पिढीचाही विचार केला पाहिजे. समस्या आहेत, मात्र मला विश्वास आहे की, आपण सर्वांनी मिळून काम केले, आत्मविश्वासाने काम केले तर आपण परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो आणि आपण इच्छित परिणामही प्राप्त करू शकणार आहोत...असाही मला पूर्ण विश्वास आहे.
आदरणीय सभापती जी,
सभागृहामध्ये शेतकरी आंदोलनाची भरपूर चर्चा झाली आहे. जास्त बोलणे तर आंदोलनाविषयी झाले, आंदोलनाबद्दल बोलण्यात आले. मात्र आंदोलन नेमके कोणत्या गोष्टीवरून सुरू आहे, याविषयी सर्वजण मौन होते. आंदोलन कसे आहे, आंदोलनाविषयी काय केले जात आहे, या सर्व गोष्टी वारंवार खूप वेळा सांगितल्या गेल्या. या गोष्टींना महत्व आहे, मात्र जी मूलभूत गोष्ट आहे... ती विस्ताराने सांगितली असती, त्याविषयी भरपूर चर्चा झाली असती तर फार चांगलं झालं असतं. ज्याप्रमाणे आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जे काही प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नांना उत्तरे तर मिळणार नाहीत, हे मला माहिती आहे. परंतु त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने या विषयाची चर्चा केली आहे. मी आदरणीय देवेगौडाजींचा खूप आभारी आहे. त्यांनी या संपूर्ण चर्चेला एक गांभीर्य प्राप्त करून दिले आणि त्यांनी सरकारने जे चांगले प्रयत्न केले आहेत, त्याचे कौतुकही केले आहे. याचे कारण म्हणजे त्यांनी शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी जीवनभर समर्पित कार्य केले आहे. त्यांनी सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा केली त्याचबरोबर त्यांना चांगले सल्लेही दिले. आदरणीय देवेगौडाजी यांचे मी हृदयापासून आभार व्यक्त करतो.
आदरणीय सभापती जी,
शेतीची मूलभूत समस्या काय आहे? या समस्येची पाळेमुळे कुठे आहेत? मी आज माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांनी जे विस्ताराने सांगितले होते, त्याचा उल्लेख करू इच्छितो..... अनेक लोक आहेत, ते चौधरी चरण सिंह यांचा वारसा अभिमानाने चालवत आहेत. असे लोक नक्कीच ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतील. चौधरी चरण सिंह यांच्या बोलण्यामध्ये नेहमीच 1971 मध्ये झालेल्या कृषी संदर्भातल्या जनगणनेचा विषय, मुद्दा येत असे. त्यांच्या भाषणांमध्येही हा विषय वारंवार येत होता. चौधरी चरण सिंह जी यांनी म्हटले होते की, त्यांचे उद्धरण आहे. शेतक-यांची जनगणना केली तर 33 टक्के शेतकरी असे आहेत की, त्यांच्याकडे दोन बिघांपेक्षाही कमी ,दोन बिघेही नाही, किंवा दोन बिघे इतकीच जमीन आहे. 18 टक्के शेतकरी असे आहेत की, त्यांच्याकडे 2 ते 4 बिघे जमीन आहे, याचाच अर्थ अर्धा हेक्टर ते एक हेक्टर जमीन आहे. या 51 टक्के शेतकरी बांधवांनी कितीही परिश्रम केली तरीही... आपल्याकडच्या तुटपुंज्या जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह इमानदारीने होऊ शकत नाही. हे विधान चौधरी चरण सिंहजी यांचे आहे. लहान शेतकरी बांधवांची दयनीय स्थिती चौधरी चरण सिंह यांच्यासाठी नेहमीच अतिशय पीडा देणारी होती. ते नेहमीच अशा अल्पभूधारक शेतक-यांची चिंता करीत होते. आता आपण पुढचे पाहूया ..... ज्या शेतक-यांकडे एक हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे, असे शेतकरी 1971 मध्ये 51 टक्के होते. आज अशा शेतक-यांचे प्रमाण 68 टक्के झाले आहे. याचाच अर्थ देशामध्ये अल्पभूधारक शेतक-यांची संख्या वाढली आहे. लघु आणि सीमांत शेतक-यांची संख्या एकत्रित केली तर 86 टक्क्यांपेक्षाही जास्त शेतक-यांकडे दोन हेक्टरांपेक्षाही कमी जमीन आहे. आणि अशा शेतक-यांची संख्या 12 कोटी आहे. या 12 कोटी शेतक-यांविषयी आमची काहीच जबाबदारी नाही का? देशाची काही जबाबदारी आहे की नाही? आपल्याला योजना तयार करताना या 12 कोटी शेतकरी बांधवांना केंद्रस्थानी ठेवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे. या शेतक-यांनस केंद्रस्थानी ठेवले पाहिजे की नाही ठेवायचे? असे प्रश्न चौधरी चरण सिंह जी आपल्यासाठी सोडून गेले आहेत..... आपल्यालाच आता या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. चौधरी चरण सिंह जी यांना खरी श्रद्धांजली वाहण्यासाठीही या कामासाठी जे काही योग्य असेल, सूचेल, ज्यांना हे काम करण्याची संधी मिळेल, त्या सर्वांना हे काम करावे लागणार आहे, त्यावेळी कुठे शेतकरी वर्गासाठी काम होऊ शकणार आहे.
आता आधीच्या सरकारांनी लहान शेतकरी वर्गाविषयी काय विचार केला होता? याविषयी जर आपण एकदाच विचार केला तर सर्वांच्या लक्षात येईल. हे सगळे मी टीका करण्यासाठी बोलत नाही. मात्र आपल्याला अगदी प्रामाणिकपणे.... यासाठी आपल्या सर्वांना विचार करण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळी निवडणुका येतात, त्यावेळी आपण एक कार्यक्रम करतो तो म्हणजे कर्जमाफीचा! हा शेतकरी वर्गासाठी कार्यक्रम आहे, की मतांचा कार्यक्रम आहे.... हे तर हिंदुस्तानचा प्रत्येक व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीने जाणून आहे. मात्र ज्यावेळी कर्जमाफी केली जाते... त्यावेळी देशातला लहान शेतकरी त्या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहतो. त्याच्या नशीबामध्ये काहीही दान येत नाही. कारण कर्जमाफी.... ज्यांनी कोणी बँकेकडून कर्ज घेतले आहे, त्यांनाच मिळते... छोट्या शेतकऱ्याचे, बिचाऱ्याचे बँकेत साधे खातेही नसते. मग तो कुठून कर्ज घ्यायला जाणार? आम्ही लहान शेतकऱ्यांसाठी नाही केले.... याला भलेही आम्ही राजकारण केले म्हणा. एक- दोन एकर जमीन असणारे शेतकरी, ज्यांचे बँकेत खातेही नाही, जे कधी कर्जही घेत नाहीत, त्यांना कर्जमाफीचा फायदाही मिळत नाही. त्याच प्रकारे आधी पीक विमा योजना कशी होती.... विमा उतरवून त्याव्दारे एक प्रकारे बँक हमी म्हणून काम केले जाते. आणि अल्प भूधारक बांधवांच्या तर नशीबात तेही नव्हते. ज्या शेतकऱ्यांचे बँकेमध्ये खाते आहे, ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे, अशाच शेतकरी बांधवांच्या पिकांचा विमा उतरवला जात होता. म्हणजे विमा म्हणूनही नुकसान भरपाई छोट्या शेतकरी बांधवांना मिळत नव्हती. जे बँकेचे कर्ज घेत होते, त्यांचा विमा उतरवला जात होता. बँकवाल्याचा त्यांच्यावर विश्वास असायचा, काम चालून जात होते.
2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेले असे किती शेतकरी आहेत हे आज बँकेतून कर्ज घेतात... लहान शेतकर्यासाठी सिंचनाची सुविधा देखील नाही, मोठे शेतकरी मोठे मोठे पंप घेतात, ट्यूबवेल बसवतात, वीज जोडणी घेतात, आणि त्यांच्यासाठी वीज देखील विनामूल्य उपलब्ध व्हायची, त्यांचे काम व्हायचे. छोट्या शेतकर्याला सिंचनाची देखील समस्या होती. ते ट्यूबवेल देखील बसवू शकत नव्हते, कधीकधी त्यांना मोठ्या शेतकऱ्याकडून पाणी घ्यावे लागायचे, आणि तो मोठा शेतकरी जी किंमत सांगायचा ती त्याला द्यावी लागायची. युरिया .... मोठ्या शेतकऱ्याला युरिया मिळवण्यात देखील काहीच अडचण येत नव्हती. छोट्या शेतकर्याला रात्रभर रांगेत उभे रहावे लागायचे. कधीकधी तर लाठ्या खाव्या लागायच्या आणि कधीकधी या गरीब शेतकऱ्याला युरियाशिवाय घरी परत जावे लागायचे. आम्हाला छोट्या शेतकर्यांची परिस्थिती माहित आहे… 2014 नंतर आम्ही काही बदल केले, आम्ही पीक विमा योजनेची व्याप्ती वाढविली जेणेकरून शेतकरी… छोटे शेतकरीही याचा लाभ घेऊ शकतील आणि अगदी थोड्या पैशांनी हे काम सुरू केले आणि मागील 4-5 वर्षात पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90 हजार कोटींहून अधिक रकमेचे दावे मिळाले आहेत. कर्जमाफीपेक्षा देखील हा आकडा मोठा आहे.
किसान क्रेडिट कार्ड पहा. कार्डे, ही किसान क्रेडिट कार्डे मोठ्या शेतकऱ्यांना मिळाली आणि त्यांना... बँकेतून अगदी कमी व्याज दराने काही राज्यांमध्ये तर शून्य टक्के व्याजदराने या मोठ्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हायचे आणि या शेतकऱ्यांचा जो काही व्यवसाय असायचा तर हे पैसे हे शेतकरी त्या व्यवसायासाठी देखील वापरायचे. लहान शेतकऱ्यांच्या नशिबात या सगळ्या गोष्टी नव्हत्या, आम्ही ठरविले की आम्ही भारतातील प्रत्येक शेतकऱ्याला क्रेडिट कार्ड देऊ, एवढेच नाही तर आम्ही याची व्याप्ती मच्छीमारांपर्यंत देखील वाढवली जेणेकरून तेही याचा फायदा घेऊ शकतील. आणि पावणे दोन कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या किसान क्रेडीट कार्ड चा फायदा मिळाला आहे आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी इतर राज्यांनी देखील या योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन देत आहोत. त्याचप्रमाणे, आम्ही अजून एक योजना सुरु केली आहे ….शेतकरी सन्मान निधी योजना. या योजनेमुळे सरकारी मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. गरीब शेतकरी ज्यांना कधीच अशी मदत मिळाली नाही अशा दहा कोटी कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे.
जर बंगालमध्ये राजकारण मध्ये आले नसते, बंगालच्या शेतकऱ्यांचा देखील यात समावेश झाला असता तर हा आकडा आणखी वाढला असता आणि आतापर्यंत 1 लाख 15 हजार कोटी रुपये या शेतकर्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. गरीब लहान शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. आमच्या सर्व योजनांचा केंद्रबिंदू म्हणजे मृदा आरोग्य पत्रिका आहे. आम्ही 100 टक्के मृदा आरोग्य पत्रिकेविषयी बोललो होतो, आमच्या शेतकर्याची जमीन कशी आहे, कोणते उत्पादन घेऊ शकतो. आम्ही 100 टक्के मृदा आरोग्य पत्रिकेसाठी काम केले, त्याच प्रकारे आम्ही 100 टक्के कडुलिंबयुक्त युरियासाठी देखील काम केले. गरीबातील गरीब शेतकऱ्यापर्यंत युरिया पोहोचण्यात कोणताही अडथळा येऊ नये, युरियाचा काळा बाजार होऊ नये, हेच उद्दिष्ट आमचे 100 टक्के कडुलिंबयुक्त युरिया करण्यामागे होते. लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी देखील आम्ही पहिल्यांदाच निवृत्ती वेतन सुविधा योजना सुरु केली; आमचे छोटे शेतकरी देखील हळूहळू या योजनेचा लाभ घेत आहेत. त्याचप्रमाणे पंतप्रधान ग्रामीण रस्ते योजना .... पंतप्रधान ग्रामीण रस्ते योजना हा केवळ एक रस्ताच नाही तर शेतकर्यांचे आयुष्य बदलण्यासाठीचा यशाचा एक मोठा मार्ग आहे. किसान रेल्वे सुरु करण्यावर देखील आम्ही जोर दिला. याआधी लहान शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री होत नव्हती परंतु आता किसान रेल्वेमुळे गावातील शेतकरी आपला शेतमाल, फळ आणि भाजीपाला मुंबईच्या बाजारात विकू लागले. शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. लहान शेतकऱ्यांना फायदा होत आहे. किसान उडान योजना ..... ईशान्येकडील इतक्या उत्कृष्ट गोष्टी, परंतु वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना याचा काहीच लाभ होत नव्हता. आज त्या शेतकऱ्यांना किसान उडान योजनेचा लाभ मिळत आहे. आपण सगळेच लहान शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांशी परिचित आहोत… वेळोवेळी त्यांच्या सबलीकरणाची मागणी देखील झाली आहे.
आमचे आदरणीय शरद पवार जी आणि कॉंग्रेसमधील प्रत्येकाने.… प्रत्येक सरकारने कृषी सुधारणांचे समर्थन केले आहे. यामध्ये कोणीच मागे नाही, प्रत्येकाला असे वाटते की हे यशस्वी होईल की नाही ही वेगळी बाब आहे. परंतु हे घडले पाहिजे, याला प्रत्येकाने दुजोरा दिला आहे. आणि मी सुधारणांच्या बाजूने आहे असे निवेदनही शरद पवार यांनी दिले आहे, त्यांच्या मनात या पध्दतीबाबत प्रश्न आहे पण त्यांनी सुधारणांना विरोध केला नाही. आणि म्हणूनच मला असे वाटते की आमचे सहकारी सिंधिया जी यांनी या कायद्यासंदर्भातील अनेक पैलूवर येथे…. गेल्या दोन दशकांपासून या सर्व गोष्टी सातत्याने चालू आहेत, आम्ही आल्यावर अचानक या गोष्टी सुरु झाल्या असे नाही. प्रत्येकाने म्हटले आहे की आता वेळ आली आहे. स्वल्पविराम आणि पूर्णविराम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत परंतु आमच्या काळात सर्व व्यवस्था उत्कृष्ट होती असा कोणीही दावा करू शकत नाही, दहा वर्षानंतर एखादी नवीन कल्पना येणार नाही, आमच्यावेळी सर्व काही चांगले होते असा दावा मी देखील करू शकत नाही. समाज हा नेहमी परिवर्तनशील असतो.
आजच्या काळात, जे आम्हाला योग्य वाटले त्या सुधारणा आम्ही केल्या....नवीन गोष्टी जोडणे हाच तर प्रगतीचा मार्ग असतो.... अडथळे निर्माण करून प्रगती कशी होईल आणि म्हणून मला अचानक आश्चर्य वाटले असे काय झाले की यूटर्न घेतला? ठीक आहे, आता आम्ही या सरकारला आंदोलनाच्या मुद्यावरून घेराव घालतो, पण त्याचवेळी शेतकऱ्यांना हे देखील सांगा की, हे बदल खूप महत्वाचे आहेत, आता बरीच वर्षे झाली आहेत, नवीन गोष्टी स्वीकाराव्या लागतील तेव्हाच देश प्रगती करेल. पण मला वाटते की राजकारणाचा दबाव इतका असतो की स्वतःचे विचार मागे राहतात. परंतु आत हे जे काही करत आहेत ठीक आहे.... आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंह येथे उपस्थित आहेत, मला त्यांचेच उद्गार आज येथे वाचून दाखवायचे आहेत....हे ऐकून कदाचित ज्यांनी यूटर्न घेतला आहे ते माझे नाही तर मनमोहन सिंह यांचे म्हणणे तरी ऐकतील, ‘देशात सध्या अस्तित्वात असलेली संपूर्ण विपणन व्यवस्था ही 1930 सालची आहे जी आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला जिथे अधिक दर मिळेल तिथे त्यांचा शेतमाल विकण्यापासून मज्जाव करत आहे. एक मोठी सामान्य बाजारपेठ म्हणून विपुल संभाव्यतेची जाणीव करून भारताच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडथळ्यांना दूर करण्याचा आमचा हेतू आहे. हे मनमोहन सिंह यांचे उद्गार आहेत. आदरणीय मनमोहन सिंहजी यांनी शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्याची, भारताला कृषी बाजारपेठ करण्याचा मानस व्यक्त केला होता. आणि हेच आम्ही करत आहोत. आणि तुम्ही लोकांना अभिमान वाटला पाहिजे ... पहा ... आदरणीय मनमोहन सिंह जे म्हणाले होते ... ते मोदींना करावे लागेल. तुम्ही अभिमान बाळगा…. आणि मजेची बाब म्हणजे जे लोकं इथे राजकीय वक्तृत्व करतात त्यांनी देखील त्यांच्या राज्यात संधी मिळाल्यावर यातीलच काही अर्धवट गोष्टी अवलंबल्या आहेत. प्रत्येकाने इथे विरोधात असणारे जितके पक्ष आहेत त्यांनी देखील ज्या राज्यामध्ये त्यांचे सरकार आहे तिथे काहीतरी केलेच आहे. त्यांना देखील याची पूर्ण कल्पना आहे की मार्ग तर हाच आहे. मी पाहिले आहे की या चर्चेत सखोल कायद्याविषयी कोणीच चर्चा करत नाही. तुमची पद्धत योग्य नाही, हा कायदा एकदम लागू केला हीच तक्रार आहे. जेव्हा एखाद्या कुटुंबात लग्नसोहळा संपन्न होतो तेव्हा लग्नाला बोलावलं नाही म्हणून एखादी आत्या नाराज होते...हे तर सुरूच राहणार. एवढ्या मोठ्या कुटुंबात या गोष्टी तर घडतच राहणार.
चला आता आणखी काही गोष्टी जाणून घेऊया......दुग्धोत्पादन....यावर कोणतेच निर्बंध नाहीत. पशुपालकावर कोणतेही बंधन नाही तसेच दुधावर देखील कोणतेही बंधन नाही. परंतु गंमत पहा...दुग्धोत्पादन क्षेत्रात खाजगी किंवा सहकारी संस्थांनी दोघांनीही अशी जोरदार साखळी तयार केली आहे, की दोघेही एकत्र काम करत आहेत. आणि आपल्या देशात एक मोठी पुरवठा साखळी तयार केली आहे. हे माझ्या कार्यकाळात झालेले नाही...तुम्हाला याच गर्व असायला काहीच हरकत नाही. माझ्या कार्यकाळाआधी याची स्थापना झाली आहे. आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. बर्याच बाजारांचा फळ भाजीपाला व्यवसायाशी थेट संपर्क असतो, बाजारपेठांमधील हस्तक्षेप कमी झाला आहे, त्याचा फायदा होत आहे. दुध विक्री करणारे, भाजीपाला विक्री करणारे यांचा शेतकऱ्यांच्या जमिनीवर त्यांच्या पशुधनांवर हक्क असतो का, तर नाही. दुशाची विक्री होते पशुधनाची नाही. आपल्या देशात दुग्धोत्पादन व्यवसायाचे योगदान खूप मोठे आहे. कृषी अर्थव्यवस्थेच्या एकूण मूल्याच्या 28 टक्क्यांहून अधिक योगदान या क्षेत्राचे आहे. म्हणजेच आपण शेतीबद्दल इतकी चर्चा करताना, हा मुद्दा विसरतो. 28 टक्के योगदान आहे. आणि सुमारे आठ लाख कोटींची उलाढाल आहे. धान्य आणि कडधान्य या दोघांच्या एकत्रित किंमतीपेक्षा दुधाचे मूल्य जास्त आहे. आम्ही हा विषय कधीच पाहत नाही. पशुपालकांना संपूर्ण स्वातंत्र्य, धान्य व डाळींचे उत्पादन करणाऱ्या लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना..... जसे पशुपालकांना स्वातंत्र्य मिळाले आहे त्यांना स्वातंत्र्य का मिळू नये? जर आपण या प्रश्नांची उत्तरे शोधली तर आपण योग्य मार्गावर जाऊ.
आदरणीय अध्यक्ष,
आपल्याल घरात देखील काही बदल करायचे असतील तर घरात देखील तणावपूर्ण वातावरण तयार होते हा आपला स्वभावाच आहे. खुर्ची इथे का ठेवली? टेबल इथे का आहे… घरातही या सगळ्या गोष्टी घडतात. हा तर एक मोठा देश आहे आपण ज्या परंपरांसोबत लहानाचे मोठे झाले आहोत ते पाहता हे सगळे खूपच स्वाभाविक आहे. जेव्हा एखादी नवीन गोष्ट स्विकारण्याची वेळ येते तेव्हा थोडाफार संभ्रम निर्माण होऊ शकतो ही गोष्ट तर मी देखील मान्य करतो. ते दिवस आठवा जेव्हा हरित क्रांतीची चर्चा सुरु होती. हरित क्रांतीच्या काळात देखील कृषी सुधारणांबद्दल संभ्रम होता, भीती होती, त्याकाळी जे आंदोलन झाले त्याचे दस्तऐवज आहेत आणि ते पाहण्यासारखे आहे. त्यावेळी शेती सुधारणेसाठी कठोर निर्णय घेताना शास्त्रीजींची परिस्थिती इतकी बिकट झाली होती की त्यांच्याच सहकाऱ्यांपैकी कुणीही कृषिमंत्री होण्यासाठी तयार नव्हते. तेव्हा सगळ्यांना असे वाटत होते की जर परिस्थिती हाताबाहेर गेली आणि शेतकरी संतापले तर त्यांची राजकीय कारकीर्द पूर्णपणे नष्ट होईल. शास्त्रींजींच्या काळातील या घटना आहेत आणि शेवटी शास्त्रीजींनी, सुब्रमण्यमजी यांना कृषिमंत्री केले आणि ते या सुधारणांविषयी बोलले, नियोजन आयोगानेही याला विरोध दर्शविला होता, मजा पहा .... नियोजन आयोगानेही निषेध केला होता, अर्थ मंत्रालयासह संपूर्ण मंत्रिमंडळात निषेधाचा स्वर होता. पण देशाच्या प्रगतीसाठी शास्त्रीजी पुढे आले आणि डावे पक्ष आज जे बोलत आहेत त्यावेळी देखील ते हेच बोलत होते. ते म्हणायचे की शास्त्रीजी हे सर्व अमेरिकेच्या इशाऱ्यावर करत आहेत. कॉंग्रेस हे अमेरिकेच्या इशाऱ्यावर करत आहे. दिवसभर… आज जे माझ्यापाशी आहे ते कधीतरी तुमच्याकडे होते. आमच्या कॉंग्रेसच्या नेत्यांना अमेरिकेचे एजंट म्हटले जायचे. डावे आज जी भाषा बोलत आहेत तेव्हा देखील ते हेच म्हणायचे. कृषी सुधारणांमुळे लहान शेतकरी संपुष्टात येतील असे म्हंटले जायचे. देशभरात हजारो निदर्शने करण्यात आली. मोठी चळवळ उभारण्यात आली. त्याच वातावरणात लाल बहादूर शास्त्रीजी आणि त्यानंतरच्या सरकारांनी केलेल्या सुधारणांमुळेच एकेकाळी देशात पीएल-480 ची आयात करावी लागायची, आज आपल्या देशातील शेतकरी आपल्या मातीतच हे उगवत आहे. विक्रमी उत्पादन येऊनही, आपल्या कृषी क्षेत्रात समस्या आहेत, आणि कोणीही ही गोष्ट नाकारू शकत नाही. परंतु आपण सर्वांनी मिळून या समस्या सोडवायला हव्यात. आणि माझा विश्वास आहे की आता फार वाट पहावी लागणार नाही.
आमचे रामगोपाल जी यांनी एक खूप चांगली गोष्ट सांगितली... ते म्हणाले की कोरोना लॉकडाऊनमध्येही आमच्या शेतकर्यांनी विक्रमी उत्पादन केले आहे. सरकारने देखील कोरोना काळातही बियाणे, खते, सर्व काही वितरित करण्यात कोणतीच कमतरता भासू दिली नाही, कोणतेही संकट येऊ दिले नाहीत. आणि याचाच एकत्रित परिणाम म्हणजे देशात अन्नधान्याचा मुबलक साठा होता. या कोरोना काळात शेतमालाची विक्रमी खरेदीही झाली. नवीन उपाय शोधून आपण पुढे मार्गक्रमण करत राहिले पाहिजे असे मला वाटते आणि मी म्हटल्याप्रमाणे, बरेच कायदे आहेत, प्रत्येक कायद्यामध्ये दोन वर्षांनंतर, पाच वर्षानंतर, दोन महिन्यांनंतर, तीन महिन्यांनंतर, सुधारणा या केल्याच जातात. आपण एकाच परिस्थिती मध्ये जगत नाही ना..जेव्हा चांगल्या सूचना येतात तेव्हा चांगल्या सुधारणाही येतात. सरकारने देखील चांगल्या सूचना स्वीकारल्या आणि केवळ आमच्याच नव्हे, प्रत्येक सरकारने चांगल्या सूचना स्वीकारल्या, हीच तर खरी लोकशाही परंपरा आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी चांगले कार्य करण्यासाठी चांगल्या सूचना घेऊन पुढे यायला हवे. मी तुम्हा सर्वांना आमंत्रण देतो. चला, आपण देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी, कृषी क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी, आंदोलनकर्त्यांना समजावून सांगून आपल्याला देशाची प्रगती करायची आहे. कदाचित, हे आज शक्य नाही पण उद्या जो कोणी येथे असेल त्याला कोणालातरी हे काम करावे लागेल. आज सगळ्या वाईट गोष्टी माझ्या खात्यात जमा करा... परंतु हे चांगले काम करण्यासाठी आज माझ्यासोबत चला. काही वाईट झाले तर त्यासाठी मी जबाबदार आणि जर काही चांगले झाले तर त्याचे श्रेय तुम्हाला...चला एकत्र या मार्गावर चालूया. मी सतत शेतकऱ्यांशी बोलत आहे. वारंवार बैठका होत आहेत आणि अजूनपर्यंत कोणताही तणाव निर्माण झाला नाही. एकमेकांचे मुद्दे समजून घेण्यासाठी आणि समजावून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आम्ही आंदोलनाशी संबंधित लोकांना सतत प्रार्थना करत आहोत की आपण आंदोलन करणे हा तुमचा अधिकार आहे. परंतु अशाप्रकारे वृद्ध लोकांना तिथे बसवू नका. तुम्ही त्या सगळ्यांना इथून घेऊन जा. तुम्ही आंदोलन मागे घ्या...आपण एकत्र बसून चर्चा करू आणि चर्चा केल्यावरच काहीतरी मार्ग निघेल. आम्ही या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत आणि आज पुन्हा एकदा सभागृहाच्या माध्यमातून तुम्हाला आमंत्रित करतो.
आदरणीय सभापतीजी,
एक गोष्ट नक्की की आपली शेती संपन्न करण्यासाठी निर्णय घेण्याची ही वेळ आहे. ही वेळ आपण गमावता कामा नये. आपल्याला पुढे जायला हवे. देशाला मागे घेऊन जायचे नाही. पक्ष असो, विरोधी पक्ष असो, आंदोलन करणारे साथी असोत, या सर्व सुधारणांना आपण एक संधी दिली पाहिजे. आणि एकदा तपासायला हवे की या बदलामुळे आपल्याला फायदा होणार आहे की नाही. काही कमतरता असेल तर सुधारु, कुठे ढिलेपणा वाटत असेल तर चांगली बांधणी करू. सगळे दरवाजे बंद केले आहेत असं नक्कीच नाही. म्हणूनच मी म्हणत आहे, मी विश्वास देतो आहे की मंडया, अधिक आधुनिक बनतील. अधिक स्पर्धात्मक बनतील. यावेळेला बजेटमध्ये सुद्धा आम्ही त्यासाठी तरतूद केली आहे. एवढेच नाही तर एमएसपी होती, एमएसपी आहे, एमएसपी पुढेही राहील. या पदाचे पावित्र्य आपण समजून घेऊ, की ज्यामुळे 80 कोटी हून अधिक लोकांना स्वस्तात रेशन दिले जाते. ते ही कायम राहायला हवे म्हणून कृपा करून भ्रम पसरवण्याच्या कामाला आपण जोडून घेऊ नये कारण आपल्या देशाने एक विशिष्ट जबाबदारी आपल्याला दिली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी जे इतर उपाय आहेत त्यांच्यावरही जोर देण्याची गरज आहे. लोकसंख्या वाढते आहे, कुटुंबातल्या सदस्यांची संख्या वाढते आहे, जमिनीचे तुकडे होत आहेत. अशा परिस्थितीत असे काही ना काही करावेच लागेल त्यामुळे शेतकऱ्यांवरचे ओझे कमी होईल आणि आपल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातल्या लोकांनासुद्धा रोजगार कमावण्यासाठी अजून काही संधी आपण उपलब्ध करून देऊ शकू. यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल, आणि म्हणूनच मला वाटते जर आपण उशीर केला, आपण आपल्याच राजकारणाच्या समीकरणात गुंतून राहिलो तर आपण शेतकऱ्यांना अंधकाराकडे ढकलून दिल्यासारखेच होईल. कृपया आपण शेतकऱ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी यापासून दूर राहिले पाहिजे. मी सर्वांना प्रार्थना करतो की आपल्याला याची काळजी घ्यायला हवी.
आदरणीय सभापतीजी,
आपल्याला कृषीक्षेत्रासोबत डेअरी व पशुपालनालाही प्रोत्साहन देण्याची गरज आहे, जेणेकरून आपला शेतकरी परिपूर्ण होईल. तसेच आम्ही फूट अँड माऊथ डिसीजसाठी एक मोठी मोहिम राबवली. जो पशुपालक, शेतकरी जो शेतीवर अवलंबून असतो त्यालाही फायदा मिळेल. आम्ही मत्स्यव्यवसायालाही एक वेगळे बळ दिले, वेगळे मंत्रालय तयार केले आणि 20 हजार कोटी रुपये मत्स्यसंपदा योजनेच्या कामी लावले. जेणेकरुन, या पूर्ण क्षेत्राला नव्याने बळ लाभेल. स्वीट रेव्होल्युशनमध्ये खूप शक्यता आहेत आणि भारतात त्यासाठी मोठ्या जमिनीची आवश्यकताही नाही. आपल्या शेताच्या एका कोपऱ्यात जरी त्याने केलं तरी वर्षभरात 40-50 हजार, लाख रुपये, दोन लाख रुपये कमवू शकेल तो. म्हणून आम्ही, गोड मधासाठी, मध, त्याच प्रकारे बी वॅक्स. जगात बी वॅक्सला मागणी आहे. भारत बी वॅक्स निर्यात करू शकतो.
यासाठी आम्ही एक वातावरण निर्माण केले आणि शेतकऱ्याच्या शेतातच छोटी शेती असेल तर तो एक नवी कमाई करू शकेल, अशी जोड द्यावी लागेल. आणि मधमाश्या पालनाला शेकडो एकर जमिनीची गरजच नाही. तो आरामात स्वतःहून करू शकेल
सोलर पंप, सोलर. आम्ही म्हणतो, अन्नदाता हा ऊर्जा दाता बनावा, त्याच्या शेतातच सोलर सिस्टिमच्या माध्यमातून त्याने उर्जा निर्माण करावी. सोलर पंप चालवावे, आपली पाण्याची गरज पूर्ण करावी. त्याच्या खर्चाचा भार कमी करायला हवा. आणि जिथे एक पीक घेतो तिथे त्याने दोन पिके घ्यावीत जिथे दोन पिके घेतो तिथे तीन घ्यावीत. पॅटर्नमध्ये थोडा बदल करायचा असेल तर बदल करता येईल. या दिशेने आपण मार्गक्रमण करू शकतो. आणि यात एक बाब अशी आहे, की अशा प्रश्नांवर तोडगा काढणे, नवीन मार्ग शोधणे, ही भारताची ताकद आहे. मार्ग पुढेही सापडतील, परंतु काही लोक जे भारत अस्थिर रहावा, अशांत राहावा यासाठी सतत प्रयत्नशील आहेत त्या लोकांना आपण ओळखता आले पाहिजे.
पंजाबमध्ये काय झाले हे आपण विसरता कामा नये. जेव्हा फाळणी झाली तेव्हा सर्वात जास्त भोग पंजाबला भोगावे लागले, जेव्हा 84 चे दंगे झाले तेव्हा सर्वात जास्त अश्रू वाहिले पंजाबचे, पंजाबला सर्वात जास्त दुःखदायक घटनांना सामोरे जावे लागले. जे जम्मू काश्मीरमध्ये झाले, निर्दोषांना मृत्यूच्या दारात उभे केले गेले. जे ईशान्य भारतात चालत आले. प्रत्येक दिवस बॉम्ब, बंदुका आणि गोळ्यांचा राहिला. या सर्व गोष्टींनी देशाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे खूप नुकसान पोचवले आहे. या सर्वांच्या मागे कोणत्या शक्ती आहेत ते प्रत्येक वेळी प्रत्येक सरकारांनी बघितल्या आहेत, जाणून घेतल्या आहेत. पारखल्या आहेत. आणि म्हणून त्या उद्देशाने या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आम्ही वेगाने पुढे जात आहोत. आणि हे विसरता कामा नये की काही जण आमच्या पंजाबच्या विशेषतः शिख बंधूंच्या डोक्यात चुकीच्या गोष्टी भरत आहेत. प्रत्येक शीख माणसाचा या देशाला अभिमानच वाटतो. देशासाठी यांनी काय नाही केले. त्यांचा आपण जेवढा आदर करू तेवढा कमी आहे. गुरूंच्या महान परंपरेमध्ये..... माझं भाग्य आहे पंजाबची रोटी खाण्याची संधी मला मिळाली. जीवनातील काही महत्त्वपूर्ण वर्षे पंजाबमध्ये घालवली म्हणून मला माहिती आहे. म्हणून त्यांच्या वतीने काहीजण जी भाषा बोलतात, त्यांची दिशाभूल करण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्याने देशाचे कधीही चांगले होणार नाही म्हणूनच आम्ही या दिशेने काळजी घेणे आवश्यक आहे.
आदरणीय सभापती महोदय,
काही शब्द आपल्याला परिचित आहेत. श्रमजीवी, बुद्धीजीवी माहिती आहेत परंतु मला दिसते आहे की गेल्या काही वर्षांपासून देशात एक नवीन जमात निर्माण झाली आहे, एक नवीन भावकी पुढे आली आहे आणि ते आहेत आंदोलनजीवी. ही जमात आपण बघाल, वकिलांचे आंदोलन असेल तर तिथे दिसतील, विद्यार्थ्यांचे आंदोलन असेल तिथे दिसतील, मजुरांच्या आंदोलनाच्या तिथे दिसतील कधी पडद्याच्या पाठी तर कधी पडद्याच्या पुढे. ही एक पूर्ण टोळी आहे. आंदोलनाशिवाय जगू शकत नाही आणि आंदोलनातूनच जीवनासाठी मार्ग शोधत असतात. आम्हाला असे लोक ओळखता आले पाहिजे, जे सगळ्या जागी पोहोचतात आणि चुकीच्या मार्गाने नेतात. नवीन नवीन पद्धती सांगतात. देशाने आंदोलनजीवी लोकांपासून दूर राहायला हवे म्हणून आम्ही सर्वांना.... आणि ही त्यांची ताकद आहे.... काय आहे की स्वतः कोणत्याही गोष्टी उभ्या करू शकत नाही दुसऱ्या कोणाच्या तरी चालत आलेल्या बाबींमध्ये जाऊन बसतात जितके दिवस चालेल तेवढे दिवस चालेल. असे लोक ओळखण्याची गरज आहे. हे सगळे आंदोलनजीवी परजीवी असतात. आणि तिथे सर्व लोकांना माझे सांगणे योग्य अश्यामुळे वाटेल कारण आपण जिथे जिथे सरकार चालवत असाल, आपल्यालाही अशा परजीवी आंदोलनजीवींचा अनुभव येतच असेल आणि म्हणूनच त्याच प्रकारे एक नवीन गोष्ट मला दिसते आहे.
देश प्रगती करतो आहे, आम्ही FDIची गोष्ट करतो आहोत. थेट परदेशी गुंतवणूक. पण या दिवसांत एक नवीन FDI मैदानात उतरला आहे. या नव्या FDI पासून देशाला वाचवले पाहिजे. FDI हवे आहे, Foreign Direct Investment. परंतु हे जे नवीन FDI नजरेस पडत आहे, या नव्या FDI पासून सावध रहायला पाहिजे आणि हे नवीन FDI आहे Foreign Destructive Ideology आणि म्हणून या FDI पासून देशाला वाचवण्यासाठी आम्हाला अधिक सतर्क रहाण्याची गरज आहे.
आपल्या देशाच्या विकासासाठी ग्रामीण अर्थव्यवस्था याचे स्वतःचे एक मूल्य आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजे आपल्या आत्मनिर्भर भारताचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे. आत्मनिर्भर भारत हा फक्त कोणत्या सरकारचा कार्यक्रम होऊ शकत नाही आणि होणारही नाही. हा 130 कोटी देशवासियांचा संकल्प असायला हवा. आपल्याला अभिमान हवा आणि त्या बाबतीत कोणतीही द्विधा मनस्थिती असता कामा नये. महात्मा गांधींसारख्या महापुरुषांनी आम्हाला हाच मार्ग दाखवला होता. सध्या आपण तिथून थोडं तरी बाजूला गेलो असलो तरी पुन्हा तोच मार्ग चोखाळण्याची आवश्यकता आहे. आणि आत्मनिर्भर भारताच्या मार्गावर आपल्याला पुढे जायलाच हवे. गाव आणि शहर यांच्या मधली दरी उल्लंघून जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला आत्मनिर्भर भारताच्या दिशेने जायला हवे आणि मला विश्वास आहे की आपण या गोष्टी घेऊन मार्गक्रमण करत जाऊ तसतसा आपल्या देशातील सामान्यांच्या मनातील विश्वास वाढेल. ज्याप्रमाणे आता प्रश्नोत्तराच्या तासात आत जल-जीवन मिशनची चर्चा होत होती. एवढ्या कमी कालावधीत 3 कोटी कुटुंबांपर्यंत, त्यांचा घरांमध्ये पिण्याचे पाणी पोचवण्याचे, नळाची जोडणी देण्याचे काम पूर्ण झाले आहे. आत्मनिर्भरता तेव्हाच शक्य आहे जेव्हा अर्थव्यवस्थेत सर्वांचा सहभाग असेल. आमच्या भगिनी सोनल यांनी आपल्या भाषणात मुलींच्या सहभागावर लक्ष केंद्रित करण्याबद्दल विस्ताराने चर्चा केली.
आदरणीय सभापतीजी,
कोरोना काळात रेशन असो, आर्थिक मदत असो किंवा मोफत गॅस सिलेंडर सरकारने प्रत्येक तर्हेने आपल्या माता-भगिनींची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनीही आपली शक्ती एकवटून या गोष्टी सांभाळून घेण्यात मदत केली. ज्याप्रकारे या कठीण परिस्थितीमध्ये आपल्या देशातील नारी शक्तीने मोठ्या धैर्याने कुटुंब सांभाळले, परिस्थिती समजून घेतली. कोरोनाच्या या लढाईमध्ये प्रत्येक कुटुंबातील मातृशक्तीची फार मोठी भूमिका होती आणि त्यांचे जेवढे धन्यवाद देऊ तेवढे कमी आहेत. भगिनी-मुलींचा निर्धार आणि आत्मनिर्भर भारतात आमच्या माता भगिनी महत्वाची भूमिका निभावतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आज युद्धभूमीवरसुद्धा आमच्या मुलींचा सहभाग वाढत आहे. नवीन कामगार कायदे तयार झाले आहेत, त्यातसुद्धा मुलींसाठी प्रत्येक क्षेत्रातील कामाला समान वेतनाचा हक्क दिला गेला आहे. मुद्रा योजनेतून 70 टक्के कर्ज घेतले गेले आहे, ते आमच्या भगिनीनी घेतले आहे. म्हणजे ही एक प्रकारे ऑडिशन आहे. 7 कोटी महिलांच्या सहभागातून 60 लाखांहून जास्त सेल्फ हेल्प ग्रुप आज आत्मनिर्भर भारताच्या प्रयत्नांना नवी शक्ती देत आहेत.
भारताची युवाशक्ती, यावर आम्ही जितका भर देऊ, त्या संधी त्यांना देऊ मला वाटते की ते देशासाठी देशाच्या भविष्यासाठी उज्वल भविष्यासाठी एक मजबूत पाया बनतील. राष्ट्रीय एज्युकेशन पॉलिसी आली आहे, त्या राष्ट्रीय एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा आमच्या युवा पिढीसाठी नव्या संधी देण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि मला आनंद वाटतो की भरपूर काळ गेला एज्युकेशन पॉलिसीवर चर्चा करण्यात, पण प्रकारे ती स्वीकारली गेली त्यातून एक नवीन विश्वास निर्माण झाला आहे. आणि मला खात्री आहे की नवीन एज्युकेशन पोलिसी, नवीन राष्ट्रीय शिक्षण नीती आमच्या देशात एका नवीन पद्धतीने अभ्यासाचा, एका नवीन पद्धतीच्या विचारांचा आरंभ आहे.
आपले MSME सेक्टर: रोजगाराच्या सर्वात जास्त संधी MSMEला मिळत आहेत आणि जेव्हा कोरोना काळात जास्त प्रोत्साहनाची बाब होती त्यातही MSME कडे संपूर्ण लक्ष दिले गेले आणि त्याचाच परिणाम आहे की आर्थिक रिकवरी मध्ये आज आमचे एमएसएमई क्षेत्र फार मोठी भूमिका निभावत आहे आणि आम्ही त्यांचा पुढे विकास करत आहोत.
आम्ही सुरूवातीपासूनच सबका साथ सबका विकास सबका विश्वास घेऊन चालत आलो आहोत आणि त्याचाच हा परिणाम आहे कि नॉर्थ-ईस्ट असो किंवा नक्षल प्रभावित क्षेत्र हळूहळू त्याठिकाणी समस्या कमी होत आहेत. पाणी समस्या कमी झाल्यामुळे सुख आणि शांती चे वातावरण तयार झाल्यामुळे या आमच्या सर्व साथीदारांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळत आहे आणि भारताच्या उज्ज्वल भविष्य काळात ईस्ट इंडिया फार मोठी भूमिका निभावणार हे मला स्पष्टपणे दिसत आहे आणि त्यांना आम्ही पूर्ण मजबुतीने आणू.
मी आदरणीय गुलाम नबीजी यांना ऐकत होतो. तसंही मृदुता, सौम्यता आणि कधीही कठोर शब्दांचा वापर न करणे ही गुलाब नबीजीं ची खासियत राहिली आहे. आणि मी असे मानतो की आपण सर्व खासदारांनी यांच्याकडून घेण्यासारखी ही गोष्ट आहे आणि मी त्यांचा आदरही करतो. त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याची तारीफ सुद्धा केली, त्यांनी सांगितलं की बऱ्याच काळापासून... आणि त्यांनी हेही म्हटलं की माझ्या हृदयात जम्मू-काश्मीर साठी खास जागा आहे आणि ते स्वाभाविक आहे संपूर्ण हिंदुस्थानच्या हृदयात जम्मू-काश्मीरला तेच स्थान आहे.
जम्मू-काश्मीर आत्मनिर्भर बनेल, त्याच हेतूने तिथे पंचायत निवडणुका झाल्या, बीडीसीच्या निवडणुका झाल्या, DDC च्या निवडणुका झाल्या आणि आता गुलाम नबींनी या सगळ्याबद्दल प्रशंसा केली आहे. या प्रशंसेसाठी मी आपला खूप आभारी आहे परंतु मला भीती वाटते आहे. आपण प्रशंसा केलीत मला विश्वास आहे की आपण आपल्या पार्टीचे लोक याला योग्य स्पिरिटने घेतील, चुकून जी-23 ची मत असल्यासारखे काही वेगळंच करू नये.
आदरणीय सभापती महोदय,
कोरोनाच्या आव्हानात्मक कालखंडात आपल्या सीमेवरही आव्हान देण्याचे प्रयत्न झाले आपल्या शूर सैनिकांनी धैर्य आणि कौशल्याने त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. प्रत्येक हिंदुस्थानी माणसाला या गोष्टीचा अभिमान आहे. कठीण परिस्थितीत सुद्धा आमचे जवान ठामपणे उभे आहेत. सर्व सुह्रदांनीसुद्धा आपल्या सैनिकांच्या शौर्याची प्रशंसा केली आहे. मी त्यांचा आभारी आहे. नियंत्रण रेषेवर जी परिस्थिती आहे त्याबाबत भारताचे धोरण अगदी स्पष्ट आहे, आणि देश ते व्यवस्थित बघत सुद्धा आहे आणि त्याला अभिमान सुद्धा वाटत आहे. बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर आणि बॉर्डर सिक्युरिटी या बाबतीत आमची बांधिलकी कुठेही शिथिल झालेली नाही, होण्याचा प्रश्नच नाही. जे लोक आमची कामे, आमचे विचार, आमचा उद्देश बघतात ते या विषयांवर आम्हाला कधीही प्रश्न विचारत नाहीत. त्यांना माहित आहे की आम्ही यासाठी याबाबतीत ठामपणे उभे राहणारे आहोत आणि म्हणून आम्ही या विषयांमध्ये कुठेही मागे नाही.
आदरणीय सभापती जी,
या सदनात उत्तम चर्चा झाल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानताना शेवटी एका मंत्राचा उल्लेख करत आपल्या बोलणे थांबवतो. आपल्याकडे वेदातून एक महान विचार प्राप्त होतो, तो आपल्या सर्वांसाठी 36 कोटी देशवासियांसाठी हा मंत्र म्हणजे मोठी प्रेरणा आहे वेदांचा मंत्र म्हणतो,
"अयुतो अहं अयुतो मे आत्मा अयुतं मे, अयुतं चक्षु, अयुतं श्रोत्रम|"
म्हणजे मी एकाकी नाही , मी एकटा नाही माझ्यासोबत कोट्यवधी मानवांना मी बघतो, अनुभवतो म्हणून माझी आत्मिक शकती कोटींची आहे. मी माझ्यासह कोट्यावधी बांधवांना बघतो अनुभव करतो माझी आत्मिक शक्ती कोट्यावधींची आहे माझ्या सोबत कोट्यवधींचा दृष्टीकोन आहे माझ्याबरोबर कोट्यवधींची श्रवणशक्ती, कर्मशक्ती सुद्धा आहे.
आदरणीय सभापतीची
वेदांच्या या भावनेमुळे याच चैतन्यातून 130 कोटींपेक्षा अधिक देशवासीय असलेला भारत सर्वांना एकत्र घेऊन पुढे चालला आहे. 130 कोटी देशवासीयांची स्वप्ने हिंदुस्तानची स्वप्ने आहेत. आज 130 कोटी देशवासीयांच्या आकांशा या देशाच्याच आहे, आज 130 कोटी देशवासीयांचे भविष्य भारताच्या उज्ज्वल भविष्याची हमी आहे. आज देश धोरण तयार करत आहे, प्रयत्न करत आहे तर ते केवळ तत्कालीन हानी फायद्यासाठी नसून दूरगामी आणि 2047मध्ये देश स्वातंत्र्याचे शतक जेव्हा पूर्ण करेल तेव्हा देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याची स्वप्ने घेऊन ही पायाभरणी केली जात आहे आणि मला विश्वास आहे की हे काम पूर्णत्वाला नेण्यात आम्ही अवश्य यश मिळवू.
मी पुन्हा एकदा आदरणीय राष्ट्रपतींच्या संबोधनासाठी त्यांचे आदरपूर्वक आभार मानतो. त्यांचे अभिनंदन करत असताना सुद्धा ज्या तऱ्हेने चर्चा झाली आणि खरोखर चर्चेचा स्तर उत्तम होता, वातावरणही उत्तम होतं.
हे वेगळं की, कोणाला काय फायदा मिळतो. माझ्यावर सुद्धा कितीतरी हल्ले झाले. प्रत्येक प्रकारे जसे लावायचे तसे बोल लावले गेले. परंतु मला हा आनंद झाला की मी कमीत कमी आपल्या कामी तर आलो. हेच बघा आपल्या मनाचं की एकतर कोरोनामुळे कोठे जाणे येणे होत नाही, अडकत असाल आणि घरातही चिचचिड होत असेल. आता एवढा राग येथे काढलात, आपले मन हलके झाले असेल. आपण आपल्या घरात किती आनंदाने आरामशीरपणे वेळ घालवत असाल. जो आनंद आपल्याला मिळत आहे त्यामागे एक कारण मी सुद्धा आहे, हे सुद्धा मी आपले सौभाग्य मानतो आणि मी हा आनंद घेता यावा हेच मागणे सतत करत राहा सतत चर्चा करत राहा .
सदनाला जिवीत राखा. मोदी आहे संधी घ्या. खूप खूप धन्यवाद!
* * *
JPS/ST/SK/SB/SM/VS/PM/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1696785)
Visitor Counter : 1007
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam