पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभांचे उद्घाटन केले


नव्या करांबाबत तज्ज्ञांची भीती अर्थ्यसंकल्पाने खोटी ठरवली : पंतप्रधान

पूर्वी अर्थसंकल्प केवळ मतांच्या बँकेचे वही-खाते होते, आता देशाचा दृष्टिकोन बदलला आहे: पंतप्रधान

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी अनेक पावले उचलली आहेतः पंतप्रधान

आत्मनिर्भरतेसाठी परिवर्तन ही सर्व स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली आहे: पंतप्रधान

Posted On: 04 FEB 2021 4:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील चौरी चौरा येथे ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले. आजच्या दिवशी ‘चौरी चौरा’ घटनेला 100 वर्षे झाली आहेत,  देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील ही ऐतिहासिक घटना आहे. पंतप्रधानांनी चौरी चौरा शताब्दी कार्यक्रमाला  समर्पित टपाल तिकीटही प्रकाशित केले. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते.

शूर हुतात्म्यांना अभिवादन करताना पंतप्रधान म्हणाले की चौरी-चौरा येथील बलिदानाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. ते म्हणाले की, शंभर वर्षांपूर्वी चौरी चौरा येथे घडलेली घटना ही केवळ जाळपोळीची घटना नव्हती तर चौरी चौराचा संदेश खूप व्यापक होता. कोणत्या परिस्थितीत जाळपोळ झाली, त्यामागे काय कारणे होती हे देखील तितकेच  महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की आपल्या देशाच्या इतिहासातील चौरी चौराच्या ऐतिहासिक संघर्षाला आता महत्त्व देण्यात आले आहे. ते म्हणाले की, आजपासून चौरी-चौरा बरोबरच प्रत्येक गावाला वर्षभर होणाऱ्या  कार्यक्रमामधून धाडसी  बलिदानाची आठवण होईल. ते म्हणाले की देश स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत असताना अशा प्रकारच्या समारंभाचे आयोजन प्रासंगिक ठरेल. चौरी-चौराच्या हुतात्म्यांविषयी फारशी चर्चा न झाल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. ते म्हणाले, इतिहासाच्या पानांमध्ये शहीदांचा ठळकपणे उल्लेख नसेलही मात्र स्वातंत्र्यासाठी त्यांनी सांडलेले रक्त निश्चितच देशाच्या भूमीत आहे.

बाबा राघवदास आणि महामना मदन मोहन मालवीय यांच्या प्रयत्नांचे स्मरण करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी लोकांना  केले, ज्यांच्यामुळे या विशेष दिवशी सुमारे 150 स्वातंत्र्यसैनिकांना फाशी दिली जाण्यापासून वाचवले गेले.  या मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांचाही सहभाग असल्यामुळे स्वातंत्र्यलढ्यातील सर्वश्रुत नसलेल्या अनेक बाबींबद्दल जागरूकता वाढेल असे सांगत त्यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, स्वातंत्र्याची 75  वर्षे पूर्ण होत असताना  शिक्षण मंत्रालयाने तरुण लेखकांना स्वातंत्र्यसैनिकांवर पुस्तक लिहिण्यासाठी आमंत्रित केले आहे. स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली म्हणून स्थानिक कला व संस्कृतीशी जोडण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी  उत्तर प्रदेश सरकारच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

गुलामगिरीच्या बेड्या तोडणारी सामूहिक शक्ती भारताला जगातील महासत्ता बनवून देईल असे पंतप्रधान म्हणाले. ही सामूहिक शक्ती आत्मनिर्भर भारत मोहिमेचा आधार आहे. ते म्हणाले की कोरोनाच्या या काळात भारताने दीडशेहून अधिक देशांतील नागरिकांना मदत करण्यासाठी अत्यावश्यक औषधे पाठवली. भारत अनेक देशांना जीवित हानी टाळण्यासाठी लस पुरवत आहे जेणेकरून आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिमान वाटेल.

नुकत्याच मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, महामारीमुळे उद्भवलेल्या  आव्हानांची पूर्तता करण्याच्या प्रयत्नांना अर्थसंकल्प नवीन बळ देईल. ते म्हणाले, की सर्वसामान्य नागरिकांवर नव्या करांचा बोजा वाढेल अशी भीती अनेक तज्ज्ञांकडून व्यक्त केली गेली, जी या अर्थसंकल्पाने खोटी ठरवली. देशाच्या जलद वाढीसाठी सरकारने अधिक खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. हा खर्च रस्ते, पूल, रेल्वेमार्ग, नवीन गाड्या व बस आणि बाजार आणि मंडईच्या संपर्क व्यवस्थेसारख्या  पायाभूत सुविधांसाठी असेल. अर्थसंकल्पाने आपल्या तरूणांसाठी चांगले शिक्षण आणि चांगल्या संधींचा मार्ग प्रशस्त केला आहे. यातून लाखो तरुणांना रोजगार मिळेल. यापूर्वी अर्थसंकल्प म्हणजे योजनांची घोषणा होती ज्याची पूर्तता कधीही होत नव्हती. “अर्थसंकल्प हा मतपेढीच्या मोजणीचे वही -खाते बनले होते. आता देशाने  एक नवीन पान उघडले आहे आणि दृष्टिकोन बदलला आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, भारताने ज्याप्रकारे महामारी हाताळली, त्याची जगभरात प्रशंसा होत असताना गावे आणि छोट्या खेड्यांमध्ये वैद्यकीय सुविधा बळकट करण्यासाठी देश प्रयत्नशील आहे. आरोग्य क्षेत्राच्या तरतुदीत या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. जिल्हा पातळीवर प्रगत चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत.

शेतकरी राष्ट्रीय प्रगतीचा आधार असल्याचे सांगत मोदी यांनी गेल्या 6 वर्षात त्यांच्या कल्याणासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती  दिली. महामारीच्या कठीण काळातही शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन केले आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी अनेक पावले उचलली  आहेत. शेतकऱ्यांकडून पिकांची विक्री सुलभ करण्यासाठी एक हजार मंडईना ई-नामशी जोडले जात आहे.

ग्रामीण पायाभूत सुविधा निधी 40 हजार कोटींपर्यंत वाढविण्यात आला आहे. या उपायांमुळे शेतकरी आत्मनिर्भर होईल आणि शेती फायदेशीर बनेल. स्वामीत्व योजना गावातील लोकांना जमीन व निवासी मालमत्तेच्या मालकीची कागदपत्र प्रदान करेल. योग्य कागदपत्रांमुळे मालमत्तेची चांगली किंमत येईल आणि बँकेकडून कर्जही मिळू शकेल. तसेच अतिक्रमण करणऱ्यांपासून जमीन सुरक्षित राहील, असे पंतप्रधान म्हणाले.

गिरण्या बंद पडल्यामुळे, रस्ते खराब झाल्यामुळे आणि रूग्णालये सुस्थितीत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या गोरखपूरला या सर्व उपायांचा  लाभ होईल, असे पंतप्रधान म्हणाले. तिथे आता स्थानिक खताचा कारखाना पुन्हा सुरू झाला असून त्याचा फायदा शेतकरी व युवकांना होणार आहे. शहरात एम्सची स्थापना होणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय हजारो मुलांचे प्राण वाचवत आहे. देवरिया, कुशीनगर, बस्ती महाराजनगर आणि सिद्धार्थनगर येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालये बांधली जाणार आहेत. या भागात चौपदरी, सहा पदरी रस्ते तयार करण्यात येत असून गोरखपूर येथून 8 शहरांसाठी उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. आगामी कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ पर्यटनाला चालना देईल याकडे मोदींनी लक्ष वेधले. “आत्मनिर्भरतेसाठीचे हे परिवर्तन सर्व स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

 

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1695154) Visitor Counter : 290