राष्ट्रपती कार्यालय
भारताचे राष्ट्रपती 11 व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या सोहोळ्याला आभासी पद्धतीने उपस्थित
Posted On:
25 JAN 2021 1:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2021
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज, 25 जानेवारी रोजी भारतीय निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या 11 व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या सोहोळ्याला आभासी पद्धतीने उपस्थित राहून सोहोळ्याला शोभा आणली आणि नागरिकांना उद्देशून भाषण केले. या वेळी राष्ट्रपतींनी वर्ष 2020-21 साठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण केले आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या ‘ऑनलाईन डिजिटल रेडीओ सेवा – हॅलो वोटर्स’ नामक वेब रेडीओचे उद्घाटन देखील केले.
या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाले की राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना आठवण करून देऊ इच्छितो की आपण आपल्याला मिळालेल्या मतदानाच्या मौल्यवान अधिकाराचा सन्मान करायला हवा. मतदानाचा हक्क हा साधासुधा हक्क नाही; जगभरातील लोकांना हा हक्क मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आपल्या घटनेने सर्व नागरिकांना गुणवत्ता,धर्म, जात,वंश अशा बाबींवर आधारित कोणत्याही भेद्भावाविना मतदानाचा समान हक्क दिला आहे. यासाठी आपण आपल्या घटनाकारांचे ऋणी आहोत.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब अर्थात डॉ. भीमराव आंबेडकर यांनी मतदानाचा हक्क सर्वात श्रेष्ठ मानला आहे. म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे मतदान करून इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करणे ही आपणा सर्वांची, विशेषतः ज्यांना प्रथमच मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळते आहे अशा युवा वर्गाची जबाबदारी आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले.
कोविड-19 महामारीच्या कठीण परिस्थितीत, गेल्या वर्षी, बिहार, जम्मू-काश्मीर आणि लदाख इथे यशस्वीपणे आणि सुरक्षितपणे निवडणूक घेणाऱ्या भारतीय निवडणूक आयोगाचे राष्ट्रपतींनी कौतुक केले. हे आपल्या लोकशाहीचे असामान्य यश आहे असे ते म्हणाले. अत्यंत सुलभतेने, समावेशी आणि सुरक्षित वातावरणात निवडणुका घेण्यासाठी आयोगाने योग्य वेळी काही कल्पक उपक्रम हाती घेतले आहेत याबद्दल आपण समाधानी आहोत, असे ते म्हणाले.
भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 ला झाली, ह्या दिवसाचे महत्त्व लक्षात ठेवण्यासाठी 2011 सालापासून दर वर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येतो. नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करून, योग्य सुविधा पुरवून विशेषतः नव्या मतदारांची नावनोंदणी वाढविणे हा राष्ट्रीय मतदान दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. हा दिवस मतदारांना अर्पण करून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये पूर्ण माहितीसह त्यांचा सहभाग वाढविणे यासाठी ह्या दिनाच्या निमित्त विविध उपक्रम राबविले जातात.
राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी येथे क्लिक करावे
U.Ujgare/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1692130)
Visitor Counter : 205