पंतप्रधान कार्यालय

ज्यांना लसीची सर्वाधिक गरज आहे, त्यांना ती सर्वप्रथम मिळेल :पंतप्रधान


भारताचा मानवकेंद्री दृष्टीकोन लसीकरण मोहिमेसाठी मार्गदर्शक: पंतप्रधान

लस मिळाल्यानंतरही खबरदारी घेण्याची आणि लसविषयक नियमांचे पालन करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Posted On: 16 JAN 2021 4:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2021

भारताची कोविड-19 ची लसीकरण मोहीम अत्यंत महत्वाच्या अशा मानवी मूल्यांवर आधारलेली आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ज्यांना लसीची सर्वाधिक गरज आहे, त्यांना ती सर्वप्रथम मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ज्यांना कोविडचे संक्रमण होण्याचा सर्वाधिक धोका आहे, अशा लोकांना आपण आधी संरक्षित करतो आहोत. यात आपले डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयातील सफाई कामगार आणि निमवैद्यकीय कर्मचारी अशा सर्वांना पहिल्यांदा लस घेण्याचा अधिकार आहे, असे पंतप्रधान म्हणाले. हे प्राधान्य सरकारी तसेच खाजगी अशा दोन्ही रूग्णालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी आहे, असे त्यांनी सांगितले. कोविड-19 लसीकरण मोहिमेचा देशभरात दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या नंतर, अत्यावश्यक सेवेतील लोक आणि देशाची सुरक्षा  तसेच कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या सर्वांना लस दिली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. आपली सुरक्षा दले, पोलीस कर्मचारी, अग्निशमन अधिकारी, सफाई कामगार या सर्वांना प्राधान्य दिले जाईल. या सर्वांची संख्या साधारण तीन कोटी इतकी असून त्यांचा लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार वहन करेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

लसीकरण मोहिमेसाठी करण्यात आलेल्या व्यापक आणि जय्यत तयारीची त्यांनी माहिती दिली, तसेच सर्वांनी लसीच्या दोन्ही मात्रा न चुकता घ्याव्यात, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. दोन मात्रांमध्ये (डोसेस) एका महिन्याचे अंतर असेल, असे ते म्हणाले. मात्र कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोविड प्रतिबंधनासाठीची सर्व खबरदारी घेत नियमांचे पालनही सुरु ठेवायचे आहे, कारण ही लस (दोन्ही मात्रा) घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी मानवी शरीरात कोरोनाविरुद्धची रोगप्रतिकारशक्ती विकसित होऊ शकेल, असे पंतप्रधान म्हणाले.

कोरोना विरुधाच्या लढाईत सर्व नागरिकांनी जो संयम आणि एकजूट दाखवली तसाच संयम लसीकारण मोहिमेदरम्यानही दाखवावा, असे आवाहन मोदी यांनी देशवासियांना केले.

 

Jaydevi P.S/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1689084) Visitor Counter : 283