वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

पियुष गोयल यांनी ‘प्रारंभ : स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे’  केले उद्घाटन

गेल्या पाच वर्षांत भारतीय स्टार्टअप परिसंस्थेने मोठी प्रगती केली आहे : गोयल;

41 हजारांहून अधिक स्टार्टअप्स आधीपासूनच सरकारकडे  नोंदणीकृत आहेत;

ही शिखर परिषद शेजारी प्रथम धोरणाचे प्रात्यक्षिक आहे

Posted On: 15 JAN 2021 5:33PM by PIB Mumbai

 

'प्रारंभ' या दोन दिवसीय स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेला आज नवी दिल्लीत सुरुवात झाली. उद्घाटन कार्यक्रमाला बिमस्टेक (बे ऑफ बंगाल  इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टोरल टेक्निकल अँड इकोनॉमिक कोऑपरेशन) देशांचे सदस्य सहभागी झाले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट, 2018  मध्ये काठमांडू येथे झालेल्या चौथ्या  बिमस्टेक शिखर परिषदेत केलेल्या घोषणेचा पाठपुरावा म्हणून उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग, वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने या शिखर परिषदेचे आयोजन केले जात आहे.

रेल्वे, वाणिज्य व उद्योग मंत्री, ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी ही  शिखर परिषद सुरु झाल्याचे जाहीर केले. ते म्हणाले की, ही शिखर परिषद शेजारी प्रथम धोरणाचे प्रात्यक्षिक आहे जे सदस्य देशांमध्ये भागीदारी वाढवेल. स्टार्टअप जगाच्या विविध बाबी उलगडून  एक नवी सुरुवात करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, स्टार्टअप इंडिया सुरू झाल्यापासून गेल्या पाच वर्षांत भारतीय स्टार्टअप परिसंस्थेत मोठी प्रगती झाली आहे. या क्षेत्रातील बिमस्टेक देशांमधील भागीदारी नवीन भारत, नवीन जग, नवीन शेजाराच्या आघाडीवर स्टार्ट अप्सना घेऊन जाईल.

गोयल म्हणाले की स्टार्टअप्सकडे कल्पना आहेत, उत्साह आहे, आणि म्हणूनच या महामारीदरम्यान  शिखर परिषदेची वेळ योग्य आहे. आशा आणि उत्तेजनासह ही शिखर परिषद  नव्या क्षितिजाकडे नेणाऱ्या नव्या प्रवासाची सुरुवात करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, सरकार आणि उद्योगसमूहाच्या सहकार्याच्या पलीकडे विस्तारत असलेल्या या परिषदेमुळे समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि या क्षेत्रात समृद्धी आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी नवकल्पनांसह एकत्रितपणे कार्य करण्यासाठी स्टार्टअप्स सहकार्य करतील.

गोयल यांनी आनंद व्यक्त केला की आजचे तरुण उद्योजकतेकडे वळत आहेत , ते आता नोकरी शोधणारे नाहीत तर रोजगार निर्माण करणारे बनले आहेत. भारतात 41,000  पेक्षा जास्त स्टार्टअप्स सरकारकडे नोंदणीकृत आहेत परंतु असे बरेच लोक आहेत जे तळागाळाच्या स्तरावर काम करतात आणि चांगले काम करतात.

कोविड नंतरच्या  जगात सर्व बिमस्टेकच्या देशांसह भारतात निश्चितच अभूतपूर्व वाढ होईल आणि जागतिक विकासाचे क्षेत्र सुरू होईल, अशी आशा त्यांनी  व्यक्त केली. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्टार्टअपला  नाविन्य, शोध आणि उपक्रमांनी परिपूर्ण परिसंस्था  निर्माण करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले.

  बिम्सटेक राष्ट्रांद्वारे दर्शवलेली सामुहिक वचनबद्धता इतर सर्व देशांमधील स्टार्टअपला नक्कीच प्रोत्साहित करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना नागरी उड्डाण आणि  गृहनिर्माण व शहरी व्यवहार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले की स्टार्टअप इंडियाच्या पुढाकाराने केंद्रीय मंत्रालये व राज्यांत मोठा  परिणाम घडविला असून स्टार्टअप्सना समर्थन देण्यासाठी, सुरचित कार्यक्रमासह राज्ये पुढे येत आहेत.

वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री  सोम प्रकाश म्हणाले की, स्टार्टअप्सच्या वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि या संदर्भात विविध सुधारणा व पुढाकार घेण्यात आले आहेत.

बिमस्टेकचे सरचिटणीस  तेन्झिन लेकफेल म्हणाले की या परिषदेने नेते, गुंतवणूकदार, विद्वान, धोरणकर्ते, स्टार्टअप इनोव्हेटर आणि उद्योजकांना एकत्र आणले  आहे. लेक्फेल यांनी असे सुचवले की स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यासाठी अशा परिषदा दरवर्षी घेण्यात याव्यात. बिम्सटेक सचिवालयात एक स्टार्टअप हब सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी  5 वाजता  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिखर परिषदेला संबोधित करतील. 25 हून अधिक देश आणि 200  हून अधिक जागतिक वक्ते यांच्या सहभागाने 2016 मध्ये स्टार्टअप इंडिया उपक्रम  सुरू झाल्यापासून भारत सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेली सर्वात मोठी स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय  शिखर परिषद आहे. स्टार्टअप परिसंस्थेचा सामूहिक विकास आणि त्याला  बळकट करण्यासाठी बहुपक्षीय सहकार्य आणि सहभाग वाढवण्यासाठी या परिषदेत 24   सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1688822) Visitor Counter : 127