आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड – 19 ची सद्यस्थिती आणि कोविड 19 च्या लसीकरणाचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

आगामी लोहरी, मकरसंक्रांती, पोंगल, माघ बिहू आदी सण झाल्यावर, 16 जानेवारी 2021 रोजी लसीकरण मोहीमेला होणार सुरूवात

साधारणपणे 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर लढणाऱ्या कोविड योध्यांना प्राधान्याने लसीकरण

त्या खालोखाल 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षाखालील काही इतर आजार असलेल्या व्यक्तींना  लसीकरण, ही संख्या अंदाजे 27 कोटी

Posted On: 09 JAN 2021 7:25PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील कोविड – 19 ची सद्यस्थितीबरोबरच कोविड लसीकरणाबाबत राज्य/केंद्रशासित प्रदेशातील तयारीचा आढावा घेण्यासाठी आज एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि अन्य संबंधित वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

कोविड व्यवस्थापन आणि विविध प्रश्नांची दखल घेत पंतप्रधानांनी सविस्तर आणि सद्यस्थितीचा सर्वसमावेशक आढावा घेतला.  सुरक्षितता आणि रोगप्रतिकारक क्षमता स्थापित केलेल्या दोन लसी (कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन) यांना नियामक मंडळाने आपत्कालीन वापरासाठी त्वरित मंजुरी दिली आहे.

नजीकच्या काळात लस देण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या सहकार्याने केंद्राच्या सज्जतेच्या स्थितीबद्दलही पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. जन भागीदारी, निवडणुकांचा अनुभवाचा वापर(बूथ पद्धती) आणि सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (यूआयपी) या बळावर लसीकरणाचा कार्यक्रम आधारित आहे.

विद्यमान आरोग्य सेवेबाबत विशेषत्वाने राष्ट्रीय कार्यक्रम, प्राथमिक आरोग्य केंद्र यामध्ये तसेच वैज्ञानिक आणि नियामक निकषांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाहीअन्य मानक प्रणाली (एसओपी), आणि तंत्रज्ञानाद्वारे सुव्यवस्थितपणे या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि प्रत्यक्ष आघाडीवर कार्यरत असणाऱ्या कोविड योध्यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे, साधारणपणे 3 कोटी इतकी ही संख्या आहे. त्या खालोखाल 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षाखालील काही इतर आजार असलेल्या व्यक्तींना  लसीकरण केले जाईल, ही संख्या अंदाजे 27 कोटी आहे, अशांना  लसीकरण दिले जाईल.

पंतप्रधानांना को-विन लसीच्या वितरणाच्या व्यवस्थापन पद्धतीची यावेळी माहिती देण्यात आली. लसीकरणाचा साठा, त्यांच्या साठवणुकीचे तापमान आणि कोविड – 19 ची लस घेणाऱ्या लाभार्थ्यांचा वैयक्तिक पाठपुरावा अशी सर्व माहिती युनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पुरविली जाणार आहे. हा प्लॅटफॉर्म पूर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांचे स्वयंचलित सत्र वाटप, त्यांची पडताळणी आणि लसीचे वेळापत्रक यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर डिजिटल प्रमाणपत्र तयार करण्यासाठी सर्व स्तरातील कार्यक्रम व्यवस्थापकांना मदत करणार आहे. या फ्लॅटफॉर्मवर 79 लाख लाभार्थ्यांपेक्षा अधिक जणांनी यापूर्वीच नोंद केली आहे.

लस टोचणारे आणि लसीकरण कार्यक्रम राबवणारे हे या व्यवस्थेचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असल्याने, त्यांच्या प्रशिक्षण प्रक्रियेचा तपशील देण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणादरम्यान 2,360 सहभागींना प्रशिक्षण देण्यात आले, ज्यात राज्य लसीकरण अधिकारी, कोल्ड चैन अधिकारी, आयईसी अधिकारी, विकास भागीदार आदींचा समावेश होता. राज्य, जिल्हा आणि गट पातळीवर 61,000 पेक्षा अधिक कार्यक्रम व्यवस्थापक, 2 लाख लस टोचणारे आणि 3.7 लाख लसीकरण गटातील अन्य सदस्य यांना लस देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.

देशभरात झालेल्या लसीकरणाच्या तीन रंगीत तालामीचे देखील पंतप्रधानांनी कौतुक केले. काल तिसरी रंगीत तालीम 33 राज्य, केंद्रशासित प्रदेशांमधील 615 जिल्ह्यातील 4895 सत्र केंद्रांमध्ये पार पडली.

सविस्तर आढावा घेतल्यानंतर, असा निर्णय घेण्यात आला की, आगामी लोहरी, मकरसंक्रांती, पोंगल, माघ बिहू आदी सण झाल्यानंतर 16 जानेवारी 2021 रोजी देशभरात कोविड 19 साठी लसीकरण मोहीमेला प्रारंभ होईल.

 

S.Tupe/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1687348) Visitor Counter : 457