पंतप्रधान कार्यालय

प्रवासी (अनिवासी) भारतीय दिवस परिषद -2021

Posted On: 07 JAN 2021 10:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जानेवारी 2021

परदेशांत राहणाऱ्या भारतीयांना जोडून आणि सामावून घेण्याच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावणारी प्रवासी (अनिवासी) भारतीय दिवस (पीबीडी) परिषद, हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे. कोरोनाची साथ अद्यापि सुरूच असली तरी, देशोदेशी पसरलेल्या प्रगतिशील आणि चैतन्यमयी अशा भारतीय समुदायाच्या भावना लक्षात घेऊन सोळावी अनिवासी भारतीय दिवस परिषद 9 जानेवारी 2021 रोजी आयोजित केली जाणार आहे. त्याच्या तयारीसाठी झालेल्या पीबीडी परिषदांप्रमाणेच ही परिषद देखील आभासी माध्यमातून आयोजित केली जाणार  आहे. आत्मनिर्भर भारतासाठी योगदान देताना सोळाव्या पीबीडी सोहळ्याची मध्यवर्ती संकल्पना  असेल.

पीबीडी परिषदेचे  तीन भाग असतील. पीबीडी परिषदेचे  उद्‌घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर सुरीनाम प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष श्री.चंद्रिकाप्रसाद संतोखी, या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून मुख्य भाषण करणार आहेत. तरुणांसाठी ऑनलाइन पद्धतीने घेतलेल्या भारत को जानिये या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विजेतेही यावेळी जाहीर करण्यात येतील.

उद्‌घाटन समारंभानंतर दोन पूर्ण सत्रे होतील. पहिल्या पूर्ण सत्राचा विषय आत्मनिर्भर भारतासाठी परदेशातील भारतीय समुदायाची भूमिका हा असून परराष्ट्र व्यवहारमंत्री आणि उद्योग आणि वाणिज्यमंत्री यांची भाषणे या सत्रात होणार आहेत. तर दुसरे पूर्ण सत्र  कोविडोत्तर आव्हानांचा सामना करताना- आरोग्य, अर्थव्यवस्था, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांतील स्थिती या विषयावर आधारित असेल. आरोग्यमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री यांची भाषणे या सत्रात होतील. या दोन्ही पूर्ण सत्रांमध्ये भारतीय समुदायातील तज्ज्ञांच्या चर्चासत्रांचाही समावेश असेल.

अखेरच्या सत्रात अनिवासी भारतीय दिनानिमित्त राष्ट्रपती समारोपाचे भाषण  करणार आहेत. 2020-21 च्या प्रवासी भारतीय विजेत्यांची नावेही याच सत्रात घोषित केली जाणार आहेत. भारतात आणि परदेशातही विविध क्षेत्रांमध्ये अनिवासी भारतीयांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीचा आणि दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात.

युवा पीबीडीचे आयोजन उद्या म्हणजे 8 जानेवारीला आभासी माध्यमातूनच होत असून, भारत आणि परदेशातील यशस्वी तरुणांना एकत्र आणताना अशी या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे. युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय या कार्यक्रमाची धुरा वाहणार आहे. न्यूझीलंडच्या समुदाय आणि सेवाक्षेत्राच्या मंत्री प्रियांका राधाकृष्णन यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

S.Kane/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1686959) Visitor Counter : 189