पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रीय मापन शास्त्र परिषदेच्या बैठकीत पंतप्रधानांचे उद्‌घाटनपर भाषण


राष्ट्रीय अणु कालमापक आणि भारतीय निर्देशक द्रव्य राष्ट्राला केले अर्पण

राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळेची कोनशीला बसविली

भविष्यात वैज्ञानिक होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्याशी संवाद वाढविण्याचे सीएस आय आर ला केले आवाहन

भारतीय निर्देशक द्रव्याची प्रमाणित संदर्भ वस्तू प्रणाली भारतीय उत्पादनांचा दर्जा सुधारण्यास मदत करेल

विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योगांच्या मूल्य निर्मिती चक्राला प्रोत्साहन देण्यासाठी शास्त्रीय समुदायाला केला आग्रह

सशक्त संशोधनाच्या मदतीने सशक्त भारत ब्रँडची निर्मिती होईल : पंतप्रधान

Posted On: 04 JAN 2021 4:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जानेवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मापन शास्त्र परिषद 2021 ला उद्‌घाटनपर भाषणाने संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राष्ट्रीय अणु कालमापक आणि भारतीय निर्देशक द्रव्य प्रणाली राष्ट्राला अर्पण केली तसेच राष्ट्रीय पर्यावरणीय मानक प्रयोगशाळेची कोनशीला बसविली. ही परिषद नवी दिल्लीच्या सीएसआयआर-एनपीएल अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळ -राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा यांनी त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केली होती. ‘देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी मापनशास्त्र’ ही या वर्षीच्या परिषदेची संकल्पना होती. केंद्रीय मंत्री डॉ.हर्ष वर्धन आणि मुख्य शास्त्रीय सल्लागार डॉ.विजय राघवन या प्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना, नव्या वर्षात भारतीय शास्त्रज्ञांनी कोविड संसर्गाशी लढण्यासाठी दोन स्वदेशी लसी विकसित केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. भारतातील कोविड विरोधी लसीकरणाची मोहीम जगातील सर्वात मोठी मोहीम असून ती लवकरच सुरु होणार आहे, असे ते म्हणाले. देशापुढे असलेल्या प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी सीएसआयआर सह देशातील अनेक शास्त्रीय संस्थांनी एकत्र येऊन कार्य केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांना नावाजले.

शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधून सीएसआयआरच्या विविध उपक्रमांबाबत त्यांच्यात जाणीव निर्माण करावी, अशी विनंती त्यांनी केली. यामुळे या विद्यार्थ्यांना भविष्यात शास्त्रज्ञ होण्यासाठीचे प्रोत्साहन आणि चालना मिळेल, असे ते म्हणाले. सीएसआयआर-एनपीएलने देशाच्या  योजनाबद्ध विकासात आणि मूल्यवर्धनात  महत्त्वाची भूमिका बजावली आहे याबद्दल त्यांनी कौतुक केले. आजच्या परिषदेच्या आयोजनामुळे संस्थेला भूतकाळातील सफलतेबाबत चर्चेला वाव मिळेल आणि त्याचा भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयारीला उपयोग होईल. आत्मनिर्भर भारताची उभारणी करण्याच्या दिशेने जाताना  नवी मानके आणि नवे आदर्श उभे करण्यासाठी संस्थेने पुढे येऊन महत्त्वाची भूमिका बजावावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

भारताचा कालरक्षक म्हणून सीएसआयआर-एनपीएलवर भारताचे भविष्य बदलण्याची जबाबदारी आहे अशी टिप्पणी त्यांनी केली. दर्जा आणि मोजमापनासाठी गेली अनेक दशके भारत परदेशी प्रमाणकांवर अवलंबून होता. पण आता भारताचा वेग,प्रगती,उत्थान,प्रतिमा आणि शक्ती आपल्या स्वतःच्या मानकांनी ठरविली जाईल, असे ते म्हणाले. मापनशास्त्र हे मोजमापाचे शास्त्र असले तरी ते कोणत्याही शास्त्रीय यशाचा पाया असते. मोजमापाशिवाय कोणतेच संशोधन पुढे जाऊ शकत नाही. आपले यश देखील नेहमीच एखाद्या मोजपट्टीने मोजावे लागते. कोणत्याही देशाची जगातील विश्वासार्हता ही नेहमीच त्या देशाच्या मापनशास्त्राच्या विश्वसनीयतेवर अवलंबून असते. मापनशास्त्र हा आपण जगात कुठे उभे आहोत आणि आपल्या प्रगतीला किती वाव आहे हे दाखविणारा आरसा आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. आत्मनिर्भर भारताचे ध्येय साध्य करण्यामध्ये दर्जा आणि परिमाण या दोन्हींचा अंतर्भाव होतो, याची त्यांनी आठवण करून दिली. भारतीय उत्पादनांनी जगाची बाजारपेठ भरून टाकण्यापेक्षा भारतीय उत्पादने खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे हृदय जिंकायचे आवाहन त्यांनी केले. स्वदेशी उत्पादने जागतिक मागणी पूर्ण करणारी आहेतच पण त्याचबरोबर ही उत्पादने जगात स्वीकारली गेली आहेत, असे ते म्हणाले.

देशाला अर्पण केलेले ‘भारतीय निर्देशक द्रव्य’ उद्योग जगताला, धातू, औषध निर्मिती आणि वस्त्रोद्योग या क्षेत्रांमध्ये प्रमाणित संदर्भ वस्तू प्रणाली च्या सहाय्याने  दर्जात्मक उत्पादने निर्माण करायला मदत करेल. नियामक केंद्री दृष्टीकोनापेक्षा आता औद्योगिक जग ग्राहक केंद्री दृष्टीकोन स्वीकारत आहे, असे ते पुढे म्हणाले. या नव्या मानकांमुळे, जगभरातील संस्थांना देशाच्या सर्व जिल्ह्यातील स्थानिक उत्पादनांपर्यंत आणण्यासाठीची मोहीम सुरु झाली आहे आणि तिचा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.

देशातील मानके आंतरराष्ट्रीय मानकांच्या बरोबरीची झाल्यामुळे परदेशी उत्पादक स्थानिक पुरवठा साखळी शोधण्यासाठी भारतात येत आहेत. यामुळे भारतातील सामान्य ग्राहकाला उत्तम दर्जाची उत्पादने मिळू शकतील आणि निर्यातदाराच्या अडचणी कमी होतील, असे त्यांनी सांगितले.

ऐतिहासिकदृष्ट्या, कोणत्याही देशाने केलेली प्रगती त्या देशाने विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांवर अवलंबून असते, याकडे पंतप्रधानांनी यावेळी लक्ष वेधले. याला त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्राचे  मूल्य निर्मिती चक्र असे नाव दिले. याबद्दल स्पष्टीकरण देताना पंतप्रधान म्हणाले की शास्त्रीय शोधांमुळे तंत्रज्ञान निर्माण होते आणि तंत्रज्ञानातून  उद्योगांचा विकास होतो तसेच उद्योगक्षेत्र नव्या संशोधनासाठी गुंतवणूक करते, असे ते म्हणाले. हे चक्र सुरु राहते आणि आपल्याला नव्या शक्यतांच्या दिशेने घेऊन जाते. सीएसआयआर-एनपीएलने हे मूल्य चक्र पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी देश प्रयत्नशील असताना हे मूल्य निर्मिती चक्र मोठ्या प्रमाणावर निर्मितीसाठी खूप महत्त्वाचे ठरले आहे. सीएसआयआरला यात त्याचा सहभाग नोंदवावाच लागेल.

सीएसआयआर-एनपीएलचे राष्ट्रीय अणु कालमापक आज देशाला अर्पण केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. भारत आता एका नॅनो सेकंदाच्या कालमापन करण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला आहे, 2.8 नॅनो सेकंदापर्यंतची अचूक वेळ मोजण्यात आपल्याला यश मिळाले आहे ही खूप मोठी गोष्ट आहे, असे ते म्हणाले. आता भारतीय प्रमाण वेळ 3 नॅनो सेकंदापेक्षा कमी अंतराने आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेशी जुळते. ह्याची इस्रो सारख्या अति अचूक तंत्रज्ञानाशी संबंधित  काम करणाऱ्या संस्थांना मोठी मदत होणार आहे. बँकिंग, रेल्वे, संरक्षण, आरोग्य, दूरसंचार, हवामान अंदाज,आपत्ती व्यवस्थापन आणि अशा आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक क्षेत्रांना या सफलतेचा मोठा फायदा होणार आहे.

उद्योग जगत 4.0 मध्ये  भारताची भूमिका सशक्त करण्यात  कालमापनाची भूमिका महत्त्वाची आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. पर्यावरणाच्या क्षेत्रात भारत प्रमुख भूमिकेकडे प्रवास करतो आहे, तरीही हवेचा दर्जा आणि उत्सर्जन तपासण्यासाठीची साधने आणि तंत्रज्ञान यासाठी भारत अजूनही दुसऱ्यांवर अवलंबून आहे. या नव्या सफलतेमुळे आत्मनिर्भर होण्यास मदत होईल, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी जास्त परिणामकारक आणि कमी खर्चिक साधनांची निर्मिती करता येईल. हवेचा दर्जा आणि उत्सर्जन तंत्रज्ञान यांच्याशी संबंधित तंत्रज्ञानामध्ये भारताचा जगातील बाजारातील वाटा देखील वाढेल. आपल्या शास्त्रज्ञांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे साध्य झाले आहे, असे मोदी यांनी पुढे सांगितले.

ज्ञानाच्या अनेक क्षेत्रांमध्ये  संशोधकांच्या भूमिकेची पंतप्रधानांनी विस्ताराने चर्चा केली. कोणत्याही प्रगतीशील समाजात, संशोधन ही नैसर्गिक सवयच नव्हे तर नैसर्गिक प्रक्रिया देखील असते. संशोधनाचे परिणाम आर्थिक किंवा सामाजिक असतात आणि ते आपले ज्ञान आणि समजूत यांचा विस्तार करतात, असे ते म्हणाले. संशोधनाची दिशा आणि उपयोग यांना त्यांच्या विविक्षित ध्येयांचा अंदाज बांधणे शक्य नाही. फक्त हे संशोधन वाया कधीच जात नाही आणि त्याने ज्ञानाचे एक नवे दालन खुले होते. मेंडेल आणि निकोलस टेसला या अनुवंशशास्त्राच्या जनकांचे पंतप्रधानांनी उदाहरण दिले. त्यांच्या कार्याचे महत्त्व कितीतरी कालावधीनंतर लक्षात आले. अनेक वेळा संशोधनातून नजीकची ध्येये साध्य होत नाहीत मात्र त्यामुळे काही इतर क्षेत्रांसाठीचे महत्त्वाचे टप्पे गाठले जातात. पंतप्रधानांनी जगदीशचंद्र बोस यांच्या मायक्रोवेव्ह संकल्पनेकडे लक्ष वेधले. त्यांची ही संकल्पना सध्याच्या जगात पुढे नेता येत नाही मात्र संपूर्ण रेडीओ दूरसंचार प्रणाली त्यावर आधारित आहे.जागतिक युद्धांच्या कालखंडात झालेल्या आणि नंतर अनेक क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक ठरलेल्या संशोधनांकडेही त्यांनी निर्देश केला. उदा. ड्रोनची निर्मिती युद्धांसाठी करण्यात आली, मात्र आज ते फोटोग्राफीसाठी आणि वितरणासाठी वापरले जातात. म्हणून आपल्या संशोधकांनी विशेषतः युवा शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या फलीतांचा शोध घ्यायला हवा. त्यांच्या संशोधनाचा उपयोग त्यांच्या क्षेत्राच्या पलीकडे होण्याची शक्यता लक्षात घ्यायला हवी.

पंतप्रधानांनी विजेचे उदाहरण देत, कुठलेही लहान संशोधन जगाचा चेहरा कसे बदलून टाकेल याचे विवेचन केले. वाहतूक,दूरसंवाद,उद्योग आणि रोजच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट विजेव चालते. तसेच सेमी-कंडक्टर सारख्या शोधामुळे आपल्या जीवनात डिजिटल क्रांती झाली. आपल्या युवा संशोधकांसमोर अशा अगणित शक्यता आहेत. त्यांच्या संशोधनामुळे आणि अभिनव शोधांमुळे खूप वेगळे भविष्य घडणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

भविष्यासाठी तयार असलेल्या आपल्या परीसंस्थेच्या निर्मितीसाठी घेतलेल्या प्रयत्नांची त्यांनी दाखल घेतली. भारताने जागतिक पातळीवर संशोधनात पहिल्या 50 त येण्याचा मान मिळविला आहे, विज्ञान आणि अभियांत्रिकी प्रकाशनाच्या पीयर आढाव्यात भारताचा 3 रा क्रमांक आहे यावरून मूळ संशोधनाचे महत्त्व दिसून येते. उद्योग जगत आणि संशोधन संस्था यांच्यातील नाते दृढ होत आहे. जगातील सर्व मोठ्या कंपन्या भारतातील संशोधन सुविधा बळकट करीत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अशा सुविधांचे प्रमाण बऱ्यापैकी वाढलेले आहे.

पंतप्रधान म्हणाले की, भारतीय युवकांसाठी संशोधन  आणि अभिनव शोधांच्या शक्यता अमर्याद आहेत. म्हणून शोधांसोबतच या शोधांचे संस्थाकारण महत्त्वाचे आहे.आपली बौद्धिक संपदा कशी जपावी याचे ज्ञान भारतीय युवकांना असणे आवश्यक आहे. जितकी जास्त पेटंट आपल्याकडे असतील तितके त्यांचे जास्त उपयोग असतील हे लक्षात ठेवायला हवे. ज्या क्षेत्रात आपले संशोधन सशक्त असेल त्यात आपली प्रतिमा बळकट असेल, यामुळे सशक्त भारत ब्रँड निर्माण होईल असे पंतप्रधान म्हणाले.

आपल्या संशोधकांना कर्मयोगी संबोधत पंतप्रधानांनी प्रयोगशाळेतील त्यांचे ऋषितुल्य प्रयत्न नावाजले आणि ते म्हणाले की हे संशोधक 130कोटी भारतीयांच्या आशेचा आणि अपेक्षांचा स्त्रोत आहेत.

 

U.Ujgare/S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1686006) Visitor Counter : 351