संरक्षण मंत्रालय
संरक्षण सचिवांकडून डीजीएनसीसी डिजिटल फोरमचा प्रारंभ
Posted On:
24 DEC 2020 5:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2020
संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी आज डीजीएनसीसी डिजिटल फोरमचा प्रारंभ केला. प्रस्तूत डिजिटल फोरम डीजीएनसीसीच्या संकेतस्थळावर आहे. या मंचाच्या माध्यमातून देशभरातले एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र जे विविध उपक्रम राबवतात, त्यांची माहिती आणि अनुभव सामायिक करण्याची सुविधा सर्व छात्रांना मिळणार आहे.
याप्रसंगी बोलताना संरक्षण सचिव म्हणाले, एनसीसीच्या प्रशिक्षण काळामध्ये येणारे अनुभव, प्रशिक्षणाविषयी त्यांच्या प्रतिक्रिया तसेच काही शिफारसी असतील तर सर्व छात्रांना या मंचाच्या माध्यमातून सांगणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय छात्र सेनेच्यावतीने सर्वजण मिळून सामाजिक सेवेचे कार्य करतात, समाज विकासाचे काम करतात, विविध क्रीडाप्रकार, साहसी खेळांचे आयोजन केले जाते, यांच्याविषयी सर्व माहिती सामायिक करण्यासाठी या मंचाची मदत होणार आहे. त्याचबरोबर छात्रांना राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्र निर्माणासंबंधी काही सूचवायचे असेल, तर या डिजिटल मंचाचा उपयोग होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचे लक्ष्य निश्चित केले आहे, त्यादृष्टीने आणि एनसीसीचे डिजिटायझेशन करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पुढे टाकण्याचे काम एनसीसी डिजिटल फोरममुळे झाले आहे. या माध्यमातून इतर छात्र आणि सामान्य लोकांपर्यंत विविध प्रकारची माहिती पोहोचवता येणार आहे.
या कार्यक्रमाला, एनसीसी लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा आणि डीजीएनसीसीच्या मुख्यालयातील इतर वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते.
* * *
S.Thakur/S.Bedekar/D.Rane
(Release ID: 1683347)
Visitor Counter : 264