मंत्रिमंडळ

पायाभूत ढाचा, मनुष्य बळ आणि इतर संसाधनांच्या सुसूत्रीकरणाद्वारे पाच चित्रपट मिडिया युनिट्सच्या विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

Posted On: 23 DEC 2020 6:29PM by PIB Mumbai

 

वर्षाला 3000 पेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती करणारा भारत हा जगातला मोठा चित्रपट निर्माता देश असून या उद्योगाचे नेतृत्व खाजगी क्षेत्र करत आहे. चित्रपट क्षेत्राला सहाय्य करण्यासाठीच्या   कटिबद्धतेची पूर्तता करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत चित्रपट प्रभाग, चित्रपट महोत्सव महासंचालनालय,भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि चिल्ड्रेन फिल्म सोसायटी या चार चित्रपट  मिडिया युनिट्सचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ ( एनएफडीसी ) लिमिटेड मध्ये विलीनीकरण  करण्याचा निर्णय घेण्यात आला.  यासाठी एनएफडीसीच्या, मेमोरंडम ऑफ  आर्टिकल्स ऑफ असोसीएशनचा विस्तार करण्यात येणार असून या चारही युनिटचे कार्य एनएफडीसी करणार आहे.

एका महामंडळात या मिडियाचे विलीनीकरण केल्याने  कार्य आणि संसाधनात एककेंद्राभिमुखता येण्यासाठी आणि उत्तम समन्वय राखण्यासाठी मदत होणार आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या  फिल्म्स डिव्हिजन, चित्रपट प्रभागाची निर्मिती 1948 मध्ये करण्यात आली. सरकारी कार्यक्रमांच्या प्रसिद्धीसाठी वृत्त मासिके आणि माहितीपटांची निर्मिती करण्यासाठी चित्रपट प्रभागाची निर्मिती करण्यात आली.

चिल्ड्रेन फिल्म सोसायटी, इंडिया या स्वायत्त संस्थेची 1955 मध्ये स्थापना झाली. चित्रपटांच्या माध्यमातून मुले आणि युवकांना मूल्याधारित मनोरंजन पुरवण्याचा यामागचा उद्देश होता.

भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या कार्यालयाची स्थापना भारतीय चित्रपट विषयक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने 1964 मध्ये झाली.

भारतीय चित्रपट आणि सांस्कृतिक आदान-प्रदानाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 1973 मध्ये चित्रपट महोत्सव महासंचालनालय  निर्माण करण्यात आले.

एनएफडीसी हा केंद्रीय सार्वजनिक उपक्रम असून 1975 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. भारतीय चित्रपट उद्योगाचे संघटीत, प्रभावी आणि  एकात्मिक विकासासाठी नियोजन आणि प्रोत्साहन यासाठी याची स्थापना झाली.

हे विलीनीकरण कार्यान्वित करण्यासाठी, मालमत्ता  आणि कर्मचारी हस्तांतरण यासह सर्व पैलू पाहण्यासाठी कायदा सल्लागार आणि व्यवहार सल्लागार यांची नियुक्ती करण्यालाही मंत्री मंडळाने मान्यता दिली.

हे विलीनीकरण करताना संबंधित कर्मचाऱ्यांच्या हिताची पूर्ण काळजी घेतली जाईल आणि कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून कमी केले जाणार नाही.

या विलीनीकरणामुळे ओटीटी आशय, ॲनिमेशन, लघु आणि माहितीपट  अशा सर्व शैलीतल्या भारतीय सिनेसृष्टीचा संतुलित आणि केंद्रित विकास सुनिश्चित होणार आहे.

या विलीनीकरणामुळे चित्रपट मिडिया युनिटच्या कार्यात एकसंधता येण्याबरोबरच पायाभूत ढाचा आणि मानव संसाधनाचा उत्तम आणि प्रभावी उपयोग होणार आहे.  कामाची पुनरावृत्ती टाळली  जाऊन पैशाचीही बचत होणार आहे.

 

M.Chopade/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1683063) Visitor Counter : 236