संरक्षण मंत्रालय

देशाच्या लष्करी इतिहासाचे ज्ञान मिळवण्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे युवकांना आवाहन

Posted On: 18 DEC 2020 5:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर 2020


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीतून आभासी पद्धतीने चौथ्या लष्करी साहित्य महोत्सवाला संबोधित केले. अशा अभिनव उपक्रमांमधून लोकांना-विशेषतः युवकांना आपल्या सैन्यदलांनी लढलेल्या युद्धांची माहिती मिळते, तसेच ज्येष्ठ सैनिकांकडून युद्धातील पराक्रमाचे  रोमहर्षक अनुभव ऐकून त्यांनाही प्रेरणा मिळते, त्यांच्यात देशभक्तीची जाणीव निर्माण होते.  

लष्करी इतिहासाच्या महत्वावर भर देतांना त्यांनी सांगितले की, संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी एक समिती स्थापन केली, ज्याद्वारे देशाच्या सीमा भागातल्या इतिहास लेखनाच्या कामावर देखरेख ठेवली जात आहे. देशाच्या सीमेवर झालेल्या लढाया, जवानांनी गाजवलेले शौर्य आणि केलेले सर्वोच्च बलिदान, इतिहासाचे सोप्या आणि रसाळ भाषेत लेखन केल्यास, ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचेल असे राजनाथ सिंह म्हणाले.

अनेक ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी संशोधकांनी वेळोवेळी या विषयावर लेखन केले असून त्याद्वारे, सैन्यदलांच्या कारवायांची माहिती जनतेपर्यंत पोहचवली आहे, असेही ते म्हणाले.

यावर्षीचा हा लष्करी साहित्य महोत्सव विशेष आहे कारण यंदाच, 1971 च्या युद्धाला 50 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे, आपण स्वर्णिम विजय दिवस, यावर्षी साजरा करतो आहोत. या युद्धात भारतीय जवानांनी गाजवलेल्या पराक्रमाची उदाहरणे आजही दिली जातात. ज्येष्ठ सैनिकांशी बोलण्याची एकही संधी वाया न घालवता त्यांच्याकडून भारताच्या लष्करी इतिहासाची जास्तीत जास्त माहिती  घेण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी यावेळी युवकांना केले. या महोत्सवात केवळ लष्करीच नाही, तर देशाच्या सांस्कृतिक पैलूंना स्पर्श करणारे कार्यक्रम आणि चर्चासत्रे आयोजित केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.

बदलत्या काळानुसार युद्धाचे स्वरूपही बदलले आहे, यात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. अशावेळी सुरक्षेला असणाऱ्या नव्या धोक्यांबाबत आपण अधिक सजग आणि सतर्क असायला हवे, असे ते म्हणाले. भविष्यात संकल्पना आधारित महोत्सव आयोजित करावे असे आवाहन त्यांनी त्यांनी आयोजकांना केले.

पंजाबचे राज्यपाल विजयेंद्रपाल सिंह आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचीही या कार्यक्रमात भाषणे झाली.


* * *

S.Thakur/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1681736) Visitor Counter : 260